तरुणींच्या गळ्यातील ताईत असलेला मराठमोळा अभिनेता सुयश टिळक बॉलिवूडमध्ये दमदार पदार्पण करतोय. इशान खट्टर आणि अनन्या पांडे यांच्या मुख्य भूमिका असलेल्या 'खाली पीली' या चित्रपटात सुयश भूमिका साकारतोय. ही भूमिका कशी मिळाली याबद्दल 'लोकसत्ता ऑनलाइन'ला दिलेल्या मुलाखतीत तो म्हणाला, "कुठल्या तरी मालिकेत त्यांनी मला पाहिलं होतं आणि माझा लूक आवडल्याने त्यांनी मला ऑडिशनसाठी बोलावलं. तीन ऑडिशन्स आणि लूक टेस्ट दिल्यानंतर माझ्या भूमिकेवर शिक्कामोर्तब झाला." या चित्रपटात सुयश नकारात्मक भूमिका साकारत आहे. मंग्या नावाच्या गुंडाची ही भूमिका आहे. "चित्रपटाचं शूटिंग सलग झालं नव्हतं. काही महिने शूटिंग सुरू होती आणि त्या संपूर्ण वेळेत मला माझं वजन आणि लूक तसाच ठेवायचा होता. त्यात साहसदृश्ये खूप होती, खूप धावपळ होती. लूक आणि वजनमध्ये सातत्य ठेवणं गरजेचं होतं. ते सर्वांत जास्त आव्हानात्मक होतं. पण चित्रपटाच्या संपूर्ण टीमने यात मदत केली," असं तो म्हणाला. इशान आणि अनन्यासोबत काम करतानाचा अनुभव कसा होता याविषयी त्याने पुढे सांगितलं, "इशानला अभिनयावर फार प्रेम आहे. सेटवर त्याचं लक्ष पूर्णपणे केंद्रीत असायचं. सर्वांची दृश्ये तो आवर्जून पाहायचा. माझा पहिला सीन शूट होत असताना इशान सेटवर माझं काम पाहण्यासाठी आला होता. मला त्याचं फार अप्रूप वाटतं. शूटिंग संपल्यावर तो मला भेटला आणि काम चांगलं झाल्याचं सांगत कौतुक केलं." पहिलाच बॉलिवूड चित्रपट आणि त्यात भाषेचा फरक यांमुळे सुयशवर थोडं दडपण होतं. मात्र इशानने संपूर्ण शूटिंगदरम्यान फार मदत केल्याचं त्याने सांगितलं. "अनन्या पांडेसोबतही काम करण्याचा अनुभव चांगला होता. कुठलेही टँट्रम नव्हते. जयदीप अहलावत यांच्यासोबत माझी काही दृश्ये होती. एका सीननंतर त्यांनी मला येऊन मिठीच मारली," अशा शब्दांत सुयशने त्याचा अनुभव सांगितला. पहिलाच बॉलिवूड चित्रपट असल्याने तो मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार नाही, याची खंत यावेळी सुयशने व्यक्त केली. "माझा पहिला बॉलिवूड चित्रपट मोठ्या पडद्यावर पाहण्याची खूप इच्छा होती. मोठ्या पडद्यावर पाहण्याची एक वेगळीच मजा असते. ते माझं स्वप्न होतं. त्यासाठी मी खूप उत्सुक होतो. सध्याच्या परिस्थितीत ते शक्य नाही. याची खंत वाटतेय," असं तो म्हणाला. मालिका, चित्रपटानंतर सुयशने वेब सीरिजमध्येही काम करण्याची इच्छा व्यक्त केली. याविषयी तो म्हणाला, "वेब सीरिजमध्ये काम करायला मला नक्की आवडेल. कुठल्याही भूमिकेच्या चौकटीत मला कधीच राहायचं नाहीये. मला सगळ्या पद्धतीच्या भूमिका करायला आवडतील." सुयशची नवीन मालिकासुद्धा प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. 'शुभमंगल ऑनलाइन' या मालिकेतून सुयश आणि सायली संजीव ही नवीन जोडी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. (सर्व छायाचित्र सौजन्य- इन्स्टाग्राम, सुयश टिळक)

दुर्गा मातेला सर्वात जास्त प्रिय आहेत ५ राशी; नवरात्रीमध्ये पूर्ण होईल त्यांची प्रत्येक इच्छा; तुमची रास यात आहे का?