-
वेब सीरिज ‘आर्या’मधून आपल्या दमदार अभिनयाने कमबॅक करणारी अभिनेत्री सुश्मिता सेन लवकरच ट्रान्सजेंडरच्या भूमिकेत दिसणार आहे.
-
आगामी वेब सीरिज ‘ताली’मध्ये सुश्मिता सेन ट्रान्सवूमन गौरी सावंत यांची भूमिका साकारताना दिसणार आहे. या वेब सीरिजमधील सुश्मिता सेनचा फर्स्ट लूक समोर आला आहे.
-
सुश्मिताचा लूक समोर आल्यानंतर ट्रान्सवूमन गौरी सावंत यांच्याबाबत जाणून घेण्यास सर्वांनाच उत्सुकता आहे.
-
तृतीयपंथी समाजाच्या हितासाठी काम करणाऱ्या गौरी सावंत या एक सामाजिक कार्यकर्त्या आहेत.
-
गौरी सावंत यांनी त्यांच्या आयुष्यात खूप संघर्ष केला आहे. बरीच संकटं आणि दुःखांचा सामना त्यांना करावा लागला आहे.
-
एवढंच नाही तर त्यांच्या वडिलांनी जिवंतपणीच त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले होते.
-
गौरी सावंत यांनी त्यांच्या आयुष्यात बरेच चढ- उतार पाहिले आहेत. आज त्या तृतीयपंथी समाजाच्या विकासासाठी आणि हितासाठी काम करतात.
-
गौरी सावंत यांचा जन्म मुंबईच्या दादर येथील एका मराठी कुटुंबात झाला होता. त्यांच्या आई- वडिलांनी त्यांचं नाव गणेशनंदन असं ठेवलं होतं.
-
गौरी यांना त्यांच्या सेक्शुअलिटीबाबत जाणीव होती मात्र त्याबाबत वडिलांना सांगण्याएवढी हिंमत त्यांच्याकडे नव्हती.
-
शाळेत असताना मुलं गौरी यांची खिल्ली उडवत असत. हळूहळू त्या मुलांकडे आकर्षित होत होत्या. त्यावेळी त्यांना गे असण्याचा अर्थ काय हेसुद्धा माहीत नव्हतं.
-
शाळेत असताना गौरी सावंत यांनी सगळी परिस्थिती जेमतेम सांभाळली मात्र जेव्हा त्या कॉलेजमध्ये जाऊ लागल्यावर खरा संघर्ष सुरू झाला.
-
कॉलेजमध्ये असताना त्यांना जास्त समस्या येऊ लागल्या. त्यांच्या कुटुंबाने त्यांची सेक्शुअलिटी कधीच मान्य केली नाही.
-
कुटुंबाला लाजिरवाण्या परिस्थिचा सामना करावा लागू नये यासाठी गौरी यांनी घर सोडलं.
-
त्यावेळी त्याचं वय १५ वर्षं होतं. नंतर त्यांनी वेजिनोप्लास्टी करून घेतली आणि गणेशनंदन ही ओळख पुसून त्या गौरी सावंत झाल्या.
-
२००० साली गौरी सावंत यांनी अन्य दोन लोकांच्या मदतीने ‘सखी चार चौघी’ मंचाची स्थापना केली. तेव्हापासून त्या तृतीयपंथी समजासाठी काम करत आहेत.
-
२००९ मध्ये त्यांनी तृतीयपंथी समाजाला कायदेशीर मान्यता मिळावी यासाठी न्यायालयात याचिका दाखल केली होती.
-
‘नाझ’ फाउंडेशनने या कामात त्यांना पाठिंबा दिला. अखेर गौरी यांच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने सुनावणी करत ट्रान्सजेंडर कायद्याला मान्यता दिली.
-
गौरी सावंत फक्त तृतीयपंथी समाजाच्या हक्कासाठीच लढाई लढल्या नाही तर त्यांनी एका मुलीला वेश्या व्यवसायात ढकललं जाण्यापासून वाचवलं.
-
एवढंच नाही तर या मुलीला त्यांनी कायदेशीररित्या दत्तक घेतलं आणि तिचं संगोपन केलं. ही मुलगी एका हॉस्टेलमध्ये राहून आपलं शिक्षण पूर्ण करत आहे.
-
गौरी सावंत या देशातील पहिल्या ट्रान्सजेंडर इलेक्शन अॅम्बेसिडर आहेत.
-
काही वर्षांपूर्वीच त्या विक्स कंपनीच्या एका जाहिरातीमुळे चर्चेत आल्या होत्या. या जाहिरातीत त्या एका लहान मुलीसह दिसल्या होत्या.
-
या जाहिरातीत दाखवण्यात आलं होतं की, त्या मुलीच्या आई- वडिलांचं निधन होतं आणि त्यानंतर गौरी सावंत तिला दत्तक घेतात. या जाहिरातीमुळे गौरी सावंत चर्चेत आल्या होत्या.
-
(फोटो साभार- गौरी सावंत इन्स्टाग्राम, फेसबुक आणि सुश्मिता सेन इन्स्टाग्राम)

देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य; “मराठा समाजाला १० टक्के आरक्षण दिलं आहे, तरीही…”