-
-
त्यामुळे स्मार्टफोन निवडताना आपली गरज ओळखून ती गरज कोणता स्मार्टफोन उत्तम प्रकारे भागवू शकतो ते पाहूनच निवड करावी. स्मार्टफोनविषयी विक्रेत्यांकडून, ऑनलाइन खरेदीच्या संकेतस्थळांकडून आणि जाहिरातींतून अनेक गोष्टी सांगितल्या जातात. त्यातील महत्त्वाचे घटक कोणते, हे जाणून घेतल्यास आपल्यासाठी योग्य स्मार्टफोन आपण घेऊ शकतो. स्मार्टफोन निवडताना पुढील बाबी तपासून पाहाव्यात..
-
एसओसी (सिस्टीम ऑन अ चिप) : हा कोणत्याही स्मार्टफोनचा प्रमुख घटक आहे. यावरच संपूर्ण फोनचं कार्य अवलंबून असतं. यामध्ये सीपीयू (प्रोसेसर), जीपीयू (ग्राफिकल- प्रोसेसर), मॉडेम, कनेक्टिव्हिटी सपोर्ट असे काही महत्त्वाचे घटक समाविष्ट असतात. फोनमधील प्रोसेसर पाहताना फक्त किती कोअर्स आहेत हे न पाहता त्यांचा वेगही पाहणं महत्त्वाचं ठरतं.
-
आपण सामान्य वापरकत्रे असाल, म्हणजेच आपण मीडिया प्रोसेससिंग, गेमिग किंवा एकाच वेळी भरपूर अॅप्लिकेशन्सचा वापर करत नसाल तर सर्वसामान्यपणे सध्याच्या काळात अॅण्ड्रॉइड स्मार्टफोन्समध्ये आपल्याला क्वाडकोर (४ कोर) असणारा प्रोसेसर पुरेसा ठरेल. आपला वापर जास्त असल्यास ऑक्टाकोर (८-कोर) असणारा स्मार्टफोन घेणं आवश्यक आहे. त्याचप्रमाणे एसओसी हा साधारण एक ते दीड वर्षांपेक्षा जुना नसावा. आपण कोणत्याही सर्च इंजिनवर एसओसीचं नाव टाकल्यास तो बाजारात कधी उपलब्ध झाला आहे, याची माहिती सहज मिळते.
-
रॅम : स्मार्टफोन खरेदी करताना प्रोसेसरखालोखाल रॅम पाहणं गरजेचं आहे. आजकाल जाहिरातींच्या माध्यमातून किंवा ऑनलाइन शॉिपग साइट्सवरसुद्धा रॅमला अधोरेखित केलं जातं. जेवढा जास्त रॅम तेवढा चांगला फोन, हे अर्धसत्य आहे. स्मार्टफोनचा वापर नेमका कशासाठी होत आहे, यावर किती रॅम असावा ते ठरवलं पाहिजे. त्यामुळे आपण नेमक्या कोणत्या गोष्टींसाठी स्मार्टफोन खरेदी करतोय ते आधी पक्कं केलं पाहिजे, नाही तर आपण जास्त रॅम असलेला फोन घेतला, तरी त्याचा वापर पूर्णपणे केला जाणार नाही.
-
आजकाल १२ जीबीपर्यंत रॅम असणारे अँड्रॉइड स्मार्टफोन्ससुद्धा उपलब्ध आहेत, परंतु आयओएस फोन्स अजूनही सहा जीबीपर्यंतच पाहायला मिळतात. याचाच अर्थ रॅमबरोबरच त्यावर केलेलं सॉफ्टवेअर प्रोसेसिंगसुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे. सध्याच्या काळात अगदीच प्राथमिक वापर असेल तर चार जीबी अन्यथा कमीत कमी सहा जीबी रॅम असणारा फोन घेणं फायद्याचं ठरेल.
-
स्टोअरेज : यालाच रॉम असंसुद्धा संबोधलं जात. आपल्या ऑपरेटिंग सिस्टीमच्या फाइल्स, अॅप्लिकेशन्स आणि आपला पर्सनल डेटा हे सर्व अंतर्गत स्टोअरेजवर साठवून ठेवलं जातं त्यामुळे हादेखील एक महत्त्वाचा घटक आहे. आपल्याला स्टोअरेजची जास्त गरज असल्यास इंटर्नल स्टोअरेजबरोबर मेमरी कार्डद्वारे स्टोअरेज वाढवायची सोय आहे का, हे स्मार्टफोन घेताना जरूर तपासून पाहा. किमान ६४ जीबी इन्टर्नल स्टोरेज असणारा स्मार्टफोन घेणं योग्य ठरेल.
-
कॅमेरा : आजच्या घडीला या घटकाला सर्वात जास्त महत्त्व दिलं जातं. नवीन स्मार्टफोन घेताना माझ्या फोनमधून सर्वोत्तम छायाचित्र आली पाहिजेत, असं प्रत्येकाला वाटत असतं, त्यामुळेच स्मार्टफोन निर्मातेदेखील कॅमेराची भरपूर जाहिरात करताना दिसतात. सध्या एकापेक्षा जास्त कॅमेरा असणाऱ्या फोन्सची बाजारात जास्त चलती आहे. स्मार्टफोनचा कॅमेरा पाहताना फक्त मेगापिक्सल नंबरकडे बघून भुलून जाऊ नका. जेवढे जास्त मेगापिक्सल तेवढा कॅमेरा अधिक चांगला हा गरसमज आहे.
-
आपल्यासाठी कॅमेरा हा प्रमुख घटक असल्यास त्याच्या सेन्सरकडे सर्वाधिक लक्ष दिले गेले पाहिजे. प्रायमरी म्हणजेच प्रमुख कॅमेऱ्यामध्ये ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायझेशन असेल, तर ते फायदेशीर ठरतो. कॅमेरा हार्डवेअरबरोबरच फोटो काढल्यानंतरचं सॉफ्टवेअर प्रोसेसिंगसुद्धा महत्त्वाचं आहे, त्यामुळे याबाबत इंटरनेटवर उपलब्ध असणारे रिव्ह्यूज तपासून खात्री करून घ्यावी.
-
बॅटरी आणि चार्जिंग : बॅटरीबद्दल बोलायचं झाल्यास आपल्याला दिवसभरात स्मार्टफोनचा किती वापर करावा लागतो याचा अंदाज घ्यावा आणि त्यानुसार बॅटरीची क्षमता असणारा स्मार्टफोन निवडावा. जेवढी जास्त बॅटरी क्षमता तेवढंच स्मार्टफोनचं वजनदेखील वाढतं, त्यामुळे असा स्मार्टफोन हाताळताना नंतर त्रास होऊ शकतो.
-
साधारणपणे चार ते पाच हजार एमएएच बॅटरी क्षमता असणारा फोन सकाळी पूर्ण चार्ज करून वापरायला सुरुवात केल्यास रात्रीपर्यंत बॅटरी पुन्हा चार्ज करावी लागत नाही. फास्ट चार्जिंग बाबतदेखील कमीतकमी ३० वॉट क्षमतेचा चार्जर असणं आवश्यक आहे. बॅटरीची क्षमता आणि चार्जरची क्षमता याचाही समतोल तेवढाच महत्त्वाचा आहे, अन्यथा आपल्या स्मार्टफोनच्या चार्जिंगवर त्याचा परिणाम होऊ शकतो.
-
डिस्प्ले : स्मार्टफोन डिस्प्लेमध्ये देखील सध्या भरपूर पर्याय पाहायला मिळतात. सध्याचे अप्लिकेशन्स आणि त्याची गरज पाहता शक्यतो एमोलेड डिस्प्ले असणारा फोन घेणं योग्य ठरेल. यामध्ये आपल्याला रंगसंगती अधिक चांगल्या प्रकारे दिसू शकते. डिस्प्ले रिझोल्युशनच्या बाबतीत बोलायचं झाल्यास आजकाल ९० टक्क्यांहून अधिक स्मार्टफोन्स हे चांगल्या प्रकारे रिझोल्युशन देतात. डिस्प्लेचे तपशील पाहताना रिफ्रेश रेट पाहून घेणं देखील तेवढंच महत्त्वाचं आहे. तो साधारणपणे किमान ६० हट्र्झ असावा.
-
कनेक्टिव्हिटी : फाइव्ह जी तंत्रज्ञान भारतात येऊ घातलेलं असल्यामुळे स्मार्टफोन कनेक्टिव्हिटी हा देखील स्मार्टफोनच्या बाजारातील तुल्यबळ घटक झाला आहे. सध्या बहुतेक फोन्समध्ये आपल्याला फोर जी तंत्रज्ञान पाहायला मिळत असलं, तरी देखील आता हळूहळू फाइव्ह जी सपोर्ट असणारे फोनदेखील बाजारात उपलब्ध होऊ लागले आहेत.
-
आपण आज घेतलेला स्मार्टफोन पुढील तीन-चार र्वष वापरायचा विचार करत असाल तर फाइव्ह जी सपोर्ट असणाऱ्या फोनचा जरूर विचार करावा. त्यामुळे येऊ घातलेल्या वेगवान तंत्रज्ञानाचा आपल्याला लाभ घेता येईल. परंतु आपला कल एक-दोन वर्षांत फोन बदलण्याकडे असेल, तर सध्या फाईव्ह जीला महत्त्व देण्याची गरज नाही.
-
ऑपरेटिंग सिस्टीम आणि युजर इंटरफेस : भारतात सध्या सामान्यपणे अॅण्ड्रॉइड आणि आयओएस या दोन सिस्टीमवर आधारित फोन बाजारात पाहायला मिळतात. अॅण्ड्रॉइडबाबत बोलायचं तर सध्या सर्वच स्मार्टफोन निर्मात्यांनी अत्यंत चांगल्या दर्जाच्या अॅण्ड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टीमवर आधारित युजर इंटरफेस उपलब्ध करून दिले आहेत.
-
ऑपरेटिंग सिस्टीम निवडताना तिची अद्ययावत आवृत्ती आपण निवडलेल्या स्मार्टफोनमध्ये आहे काय हे तपासून पाहा. त्याचप्रमाणे आपल्याला किती र्वष सिक्युरिटी पॅचेस किंवा अपडेट्स मिळणार आहेत हे स्मार्टफोन निर्मात्यांच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन तपासून पाहा. सर्वसाधारणपणे असे अपडेट्स आपल्याला किमान एक-दोन र्वष मिळतील याची खात्री करून घ्या.

पोटात मल कुजत असेल तर फक्त ‘या’ गोष्टी खा! पोट आणि आतड्यांतील घाण लगेच होईल साफ, पचनही सुधारेल