-
राजापूर येथील वीजवितरण विभागाचे सहाय्यक अभियंता सी.एस. चिवटे, वायरमन संदेश गुरव, किशोर चंदुरकर आणि रमेश केंगार यांनी पुराच्या पाण्यामध्ये पोहत जाऊन शहरातील वीजपुरवठा कार्यान्वित करण्यात महत्वाची भूमिका बजावली.
-
शहरातील मच्छी मार्केट परिसरातील वीजपुरवठा सोमवारी सायंकाळी खंडीत झाला होता. त्यामुळे त्या परिसरातील पुराच्या पाण्याखाली असलेल्या डीपीच्या ठिकाणी जाऊन बिघाड झालेल्या लाईनची दुरूस्ती करणे गरजेचे होते.
-
या परिसरात पुराचे पाणी असल्याने तेथे सहजासहजी जाणे शक्य नव्हते. पण लाईनची दुरूस्तीही करणे गरजेचे होते.
-
अशा स्थितीमध्ये चिवटे आणि गुरव एकमेकांच्या पायाला दोरी बांधून पोहत पाण्याखाली असलेल्या डिपीच्या ठिकाणी पोचले आणि तेथील बिघाड काढत पुरवठा पूर्ववतपणे सुरू केला. वायरमन केंगार यांनीही रात्री उशीरा कोंढेतड परिसरातील वीजपुरवठा अशाच प्रकारे सुरू केला.
-
तालुक्यातील मोसम येथील वीजखांबही पूराच्या पाण्याने पूर्णपणे वेढलेला होता. त्या ठिकाणचा खटका ओढल्याशिवाय भवतालच्या गावातील वीजपुरवठा कार्यान्वित होणार नव्हता.
-
अशा स्थितीमध्ये वायरमन रुपेश महाडीक गळाभर असलेल्या पूराच्या पाण्यातून काहीकाळ चालत तर, काहीवेळ पोहत त्या ठिकाणी गेले आणि त्या ठिकाणचा खटका ओढला. त्यामुळे मोसम आणि त्या परिसरातील गावे प्रकाशित झाली.
-
सहाय्यक अभियंता चिवटे यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, वीजपुरवठा कार्यान्वित करण्यासाठी पुराच्या पाण्यात पोहत जाणे धोक्याचे होते. कदाचित जीवावरही बेतले असते.
-
तरीही वीजपुरवठा सुरू करण्याची आपली जबाबदारी आहे, या जाणीवेने आणि कर्तव्यपालनाच्या भावनेतून पुराच्या पाण्यात उडी मारण्याचे धाडस केले. अन्य सहकाऱ्यांनीही मदत केली.
-
वारंवार खंडीत होणारी वीज, धोकादायक उभे असलेले वीजखांब, भरमसाठ येणारी वीजबिले आदी विविध कारणांमुळे वीजवितरण विभागाला सर्वसामान्यांच्या रोषाला नेहमीच सामोरे जावे लागले.
-
पण सोमवारी वीज वितरण विभागाच्या कर्मचाऱ्यांनी स्वत:चा जीव धोक्यात घालून वीज पुरवठा सुरू करण्यासाठी बजावलेल्या साहसी कामगिरीमुळेचिवटे व त्यांचे सहकारी राजापुरकरांच्या कौतुकाचा विषय झाले.

दादरमध्ये झाड कोसळून ‘सलमान खान’ जखमी…