-
आर्यन खान ड्रग्ज प्रकरणावरुन सुरु झालेल्या वादामध्ये अडकलेले अमली पदार्थ तपास यंत्रणेचे अधिकारी समीर वानखेडे यांची पत्नी क्रांती रेडकर आणि वडीलांनी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची भेट घेतली.
-
याचसंदर्भात वानखेडेंवर धर्म लपवून जात प्रमाणपत्रामध्ये फेरफार केल्याचा आरोप करणारे अल्पसंख्यांक मंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
-
रामदास आठवले यांनी समीर वानखेडेंची बाजू घेतल्यावरुन मलिक यांनी नाराजी व्यक्त करणारं वक्तव्य केलं आहे.
-
इतकच नाही तर या सर्व प्रकरणाबद्दल आपण खुलासा करु लागलो तेव्हा घरी काय वातावरण होतं, जीवे मारण्याची भीती निकटवर्तीयांनी व्यक्त केली होती असे खुलासेही मलिक यांनी केले आहेत. ते नक्की काय म्हणालेत पाहूयात…
-
“हा सर्व विषय सामाजिक न्याय विभागाशी संबंधित आहेत. मी पत्राद्वारे यासंदर्भातील तक्रार करणार आहे. मी एकटाच तक्रार करणार नाहीय. बरेच लोक पोलीस स्थानकांमध्ये जात आहेत. तक्रार होणार हे निश्चित,” असं मलिक यांनी म्हटलं आहे.
-
“आमच्या म्हणण्याने तुम्ही निष्कर्षापर्यंत जाऊ नका. जात पडताळणी समिती आहे. खोटं जातप्रमाणपत्र दाखवून यांनी नोकरी मिळवली नसती तर गरीब होतकरु, दलित मुलगा किंवा मुलगी ती या पदावर बसली असती,” असंही मलिक यांनी समीर वानखेडेंवर निशाणा साधताना म्हटलंय.
-
“नावाचा खेळ केलाय. दाऊद वानखेडे की ज्ञानदेव वानखेडे?, यास्मिन की जस्मीन?, काशीफ खान की काशीफ मलिक खान? या चित्रपटामध्ये नावांचा खेळही फार मोठा आहे,” असं मलिक म्हणालेत.
-
“मात्र नाव बदलून तो मी नव्हे असं सांगून चालणार नाही,” असा टोला वानखेडेंनी लगावला आहे.
-
“ते नेत्यांना भेटले तो त्यांचा अधिकार आहे,” असं मलिक यांनी वानखेडेंचे कुटुंबीयांनी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या भेट घेण्यासंदर्भातील प्रश्नावर बोलताना म्हटलं.
-
“वानखेडे साहेब तुमच्यावर नाराज आहे. याचे परिणाम गंभीर होतील असं ते म्हणाल्याचं मला सांगण्यात आलं. मात्र ते अधिकारी असून त्यांची एवढी हिंमत झालीय. त्यांनी त्यांचे आई कोण, वडील कोण, खोट्या जातप्रमाणपत्रावर नोकरी मिळवली याबद्दल सांगावं असं म्हटलं होतं,” अशी माहिती या प्रकरणाला सुरुवात कशी झाली याबद्दल बोलताना मलिक यांनी दिली.
-
मलिक यांच्या सांगण्यानुसार, “या नंतर नवाब मलिकच्या जावायला अडकवण्यात आलं. कारण त्याने काही भांडाफोड केला तर लोकांनी त्यांचं म्हणणं गांभीर्याने घेऊ नये असा होता. आधी जावयाच्या नावाने गोंधळ घालण्यात आला.”
-
“या पूर्वीही ते अनेक नेत्यांना, दलित नेत्यांना भेटले आहेत. आठवले साहेब त्यांच्यासोबत आहेत,” असं म्हणत पुढे मलिक यांनी आठवलेंनी वानखेडे कुटुंबियांची बाजू घेतल्याबद्दल नाराजी व्यक्त केलीय.
-
“ते (वानखेडे कुटुंबिय) दलितांचा हक्क हिरावून घेत आहेत आणि दलित नेते त्यांच्यासोबत आहेत याहून दूर्देवी काही असू शकत नाही,” असं मलिक म्हणाले.
-
“मी जेव्हा ही सुरुवात केली. मला अनेक ओळखीच्या लोकांनी म्हटलं की तुमच्या बोलण्यामुळे शाहरुखचा पोरगा अडकत चाललाय,” असं मलिक यांनी सांगितलं.
-
“अनेक जबाबदार लोक, माझ्या जवळची लोक मला हे बोलले. त्याला (शाहरुखला) धमकावण्यात आलं की नवाब मलिकला थांबवं,” असा दावा मलिक यांनी केलाय.
-
“माझा एक मुलगा वकील आहे. काही वकील त्याला ब्रेन वॉश करत होते. तो घरी येऊन मला सांगयचा की बाबा हे पुरे करा. मोठा मुलगाही हेच सांगत होता. पण कोणी धमकावल्याने मी घाबरणाऱ्यांमधला नाहीय,” असं मलिक यांनी म्हटलं आहे.
-
जीवाला धोका असल्याचा इशारा देण्यात आल्याचंही मलिक म्हणाले आहेत. “काही लोक हे सुद्धा सांगत होते की ड्रग्जची प्रकरण मोठी असतात, यात फार पैसा अडकलेला असतो. तुमच्या जीवालाही धोका निर्माण होऊ शकतो,” असंही मलिक यांनी म्हटलंय.
-
“माझं तोंड दाबण्याचा प्रयत्न करण्यात आला. पण मी आधीच सांगितलेलं की मी हे लॉजिकल एण्डपर्यंत घेऊन जाणार,” असं मलिक म्हणाले आहेत.
-
“कोणी म्हणत असेल की नवाब मलिकला मारुन टाकू, तर ज्या दिवशी मला मरायचंय त्या दिवशी मी मरणार,” असं म्हणत मलिक यांनी आपल्याला घाबरवायचा प्रयत्न करु नये असं सुचित केलं आहे.
-
“पोकळ धमक्यांना आम्ही घाबरत नाही,” असंही मलिक यांनी म्हटलं आहे.
-
“मी विधानसभेमध्ये जे प्रकरण समोर आणणार आहे त्यानंतर भाजपा कार्यकर्ते जनतेसमोर जाऊ शकणार नाही हे मी आज पुन्हा एकदा सांगतो,” असंही मलिक यांनी म्हटलं आहे.
-
आर्यन खान प्रकरणासंदर्भात मलिक यांनी समीर वानखेडे यांनी या मुलांना जाणूनबूजून अडकवलं असल्याची टीका यापूर्वीच केलेली आहे.
-
हे सर्व प्रकरण फर्जीवाडा असून मुद्दाम अशा लोकांना या प्रकरणात गोवण्यात आलं असल्याचा आरोप मागील अनेक दिवसांपासून नवाब मलिक करत आहेत.
-
समीर वानखेडे यांचं पहिलं लग्न मुस्लीम रितीरिवाजांप्रमाणे झाल्याचा दावा करतानाच वानखेडेंनी मुस्लीम असल्याचं लपवून नोकरी मिळवल्याचा आरोपही मलिक यांनी केलाय.
-
या प्रकरणामध्ये मागील काही दिवसांपासून समीर यांचे कुटुंबियही त्यांच्या बाजूने प्रसारमाध्यमांशी बोलत असून मलिक यांनी केलेले सर्व आरोप फेटाळून लावताना दिसत आहेत.

Air India Plane Crash: “एअर इंडियाचे विमान पायलटने जाणूनबुजून क्रॅश केले असावे”, भारतातील आघाडीच्या विमान वाहतूक तज्ज्ञाचा दावा