-
करोना रुग्णसंख्येत वाढ झाल्याने इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षांबाबत संभ्रमाचे वातावरण निर्माण झाल्याच्या पार्श्वभूमीवर या परीक्षांची सर्व तयारी पूर्ण झाली असून दोन्ही परीक्षा नियोजित वेळापत्रकानुसार होणार आहेत. तसेच दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑफलाइन होणार असल्याचं जाहीर करण्यात आलं आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना ही माहिती दिली आहे. (सर्व फोटो प्रातिनिधिक आहेत सौजन्य पीटीआय)
-
करोनामुळे गेली दोन वर्षे दहावी आणि बारावीच्या परीक्षांवर परिणाम झाला होता. गेल्या वर्षी तर परीक्षा पूर्णपणे रद्द करू सरासरी गुणांनुसार निकाल जाहीर करण्याची वेळ राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळावर आली होती. मात्र गेल्या वर्षीच्या तुलनेत सध्या राज्यातील करोना परिस्थिती नियंत्रणात असल्याने तसेच शाळाही सुरू झाल्याने दहावी आणि बारावीच्या परीक्षा त्याही ऑफलाइन घ्याव्यात अशी मागणी सर्वच क्षेत्रांतून होत होती. त्यानुसार यंदा बारावी आणि दहावीची परीक्षा ऑफलाइन पद्धतीनेच होणार आहे. यासंदर्भातील नवीन नियमावली आणि परीक्षा कशी होणार यासंदर्भातील माहिती बोर्डाने जाहीर केलीय. त्यावरच टाकलेली नजर…
-
परीक्षेसाठी लस बंधनकारक नाही > परीक्षांसाठी लसीकरण बंधनकारक असणार का?, असा प्रश्नही उपस्थित होत असतानाच परीक्षांसाठी लसीकरण बंधनकारक नसल्याची माहिती शरद गोसावी यांनी दिली.
-
दहावी बारावीच्या परीक्षेसाठी करोना लस बंधनकारक नाही. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांचं लसीकरण झालेलं नाही, ते देखील परीक्षेसाठी हजर राहू शकतात.
ऑफलाइन परीक्षा का? > महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना दहावी बारावीच्या परीक्षा ऑफलाइन पद्धतीनेच होतील अशी माहिती दिली आहे. -
३१ लाख एकूण विद्यार्थ्यांची संख्या असल्याने एवढ्या मोठ्या प्रमाणात तांत्रिक सुविधा उपलब्ध करुन देता येणार नसल्याचे गोसावी यांनी स्पष्ट केले. त्यामुळेच परीक्षा ऑनलाइन न होता ऑफलाइन पद्धतीनेच होणार आहेत.
-
“या परीक्षांचा फॉरमॅट पाहिला तर संक्षिप्त, सविस्तर आणि दिर्घोत्तर प्रश्न अशी रचना आहे. त्यात दोन्ही परीक्षांचा विचार केला तर ३१ लाख विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. इतक्या मोठ्या संख्येनं विद्यार्थी असताना ऑनलाइन परीक्षा घेणं शक्य नाही. एवढ्या मोठ्या प्रमाणात तांत्रिक सुविधा पुरवता येणार नाहीत,” असं गोसावी यांनी पत्रकार परिषदेत म्हटलं आहे.
-
ज्या विद्यार्थ्यांना काही कारणास्तव परीक्षा देता येणार नाही त्यांना ३१ मार्च ते १८ एप्रिल या कालावधीत पुन्हा परीक्षा देता येईल, असेही गोसावी यांनी स्पष्ट केले आहे.
-
यंदा दहावीची परीक्षा १५ मार्च २०२२ पासून सुरू होणार असून ४ एप्रिलपर्यंत सुरू राहणार आहे.
-
बारावीची लेखी परीक्षा ४ ते ३० मार्च दरम्यान होणार असून १४ ते ३ मार्च तोंडी परीक्षा होईल.
-
४० ते ६० गुणांच्या पेपरसाठी अतिरिक्त १५ मिनिटे आणि ७० ते १०० गुणांच्या पेपरसाठी अतिरिक्त ३० मिनिटांचा वेळ देण्यात येणार आहे.
-
आतापर्यंत परीक्षेसाठी बारावीच्या १४ लाख ७२ हजार ५६२ विद्यार्थ्यांची नोंदणी तर दहावीच्या १६ लाख २५ हजार ३११ विद्यार्थ्यांची नोंदणी झाली आहे.
-
अभ्यासक्रम कसा असणार? > कोविड १९ मुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमात यापूर्वीच २५ टक्क्यांनी घट करण्यात आल्यामुळे परीक्षा या ७५ टक्के अभ्यासक्रमावर होणार आहेत. तर दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी पद्धतीनुसार विशेष सवलती देण्यात येणार आहेत.
-
प्रात्यक्षिक परीक्षा कशा असणार? > प्रात्यक्षिक परीक्षा भविष्यातील अभ्यासक्रमासाठी महत्त्वाचा टप्पा असल्याने त्या घेणे अनिवार्य असल्याचे शिक्षण मंडळाने म्हटले आहे.
-
सध्याच्या परिस्थितीनुसार दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसांठी ४० टक्के गुणांवर आधारीत प्रात्यक्षिक परीक्षा होणार आहेत. प्रात्यक्षिक परीक्षांदरम्यान गर्दी टाळण्यासाठी पुरेशा उपाययोजना करण्यात आल्या असून सबमिशनसाठी विद्यार्थ्यांना गटागटाने बोलवण्यात येणार आहे.
-
विद्यार्थ्यांसाठी विशेष सवलत > कोणताही विद्यार्थी आजारी पडला किंवा अपरिहार्य कारणांमुळे त्याला तोंडी परीक्षा, सबमिशन करता न आल्यास लेखी परीक्षेनंतर संधी मिळणार आहे. लेखी परीक्षेनंतर प्रात्यक्षिक परीक्षा न देऊ शकलेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा संधी देण्यात येणार आहे. तसेच यासाठी वेगळे शुक्ल घेण्यात येणार नाही.
-
परीक्षा केंद्रातील बैठक व्यवस्था > सर्व परीक्षा केंद्रावर कोविड १९मुळे आजारी असलेल्या विद्यार्थ्यांसाठी एक स्वतंत्र परीक्षा कक्ष असणार आहे. जर एखाद्या विद्यार्थ्याला परीक्षेदरम्यान लक्षणे दिसली तर त्याला या स्वतंत्र कक्षात बसण्याची परवानगी देण्यात येणार आहे.
-
जवळच्या शासकीय आरोग्य केंद्रामार्फतस परीक्षा केंद्राला आवश्यक ती वैद्यकीय मदत पुरवण्यात येणार आहे.
-
करोनाच्या पार्श्वभूमीवर एका वर्गात जास्तीत जास्त २५ विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी बसवलं जाणार आहे. परीक्षेला विद्यार्थी झीक झॅक पद्धतीने सुरक्षित अंतर ठेऊन बसतील असे नियोजन करण्यात आले आहे.
-
कोविड १९ च्या नियमांचे पालन आणि मार्गदर्शक सूचनांमुळे विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर किमान दीड तास अगोदर उपस्थित राहण्यास सांगण्यात येणार आहे.
-
विद्यार्थ्यांना १० मिनिटे अगोदर प्रश्नपत्रिका देण्यात येणार आहे. तसेच विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी अर्ध्या तासाचा अधिक वेळ देण्यात येणार आहे.

Paras Hospital Case : पाच जणांची टोळी अन् प्रत्येकाच्या हातात शस्त्र; रुग्णालयात जाऊन घातल्या गोळ्या, हत्येचा लाईव्ह थरार सीसीटीव्हीत कैद