-
पुण्यात आयोजित सहजीवन व्याख्यानमालेत ‘नवीन काहीतरी’ या विषयावर बोलताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यपालांनी गुजराती-मारवाड्यांबाबत केलेलं विधान, विधासभेतील गोंधळ ते राज्यातील सद्याची राजकीय परिस्थिती यासह विविध मुद्यांवर आपलं मत व्यक्त केलं. तसेच युवकांनी राजकारणात यावं, असं आवाहनही त्यांनी केलं.
-
“आजचे राजकारण तुम्हाला माहिती आहे. राजकीय नेत्यांचं बोलणं, बघितलं तर ते बघूच नये असं वाटतं. यात काही टेलिव्हिजन चॅनलचाही वाटा असतो. त्यामुळे मुख्य विषय बाजुला राहतात आणि याला काय वाटतं, त्याला काय वाटतं, तेच दिवसभर सुरू राहतं. ज्या महाराष्ट्राने देशाला विचार दिला, हिंद प्रांतावर मराठेशाहीने राज्य केलं, त्या महाराष्ट्राची राजकीय अवस्था पाहिली की वाईट वाटतं”, अशी प्रतिक्रिया राज ठाकरे यांनी दिली
-
यावेळी बोलताना त्यांनी राज्यपालांनी गुजराती मारवाडी समाजाबाबत केलेल्या विधानाचाही समाचार घेतला. गुजराती मारवाडी त्यांच्या राज्यात काही होत नाही म्हणून महाराष्ट्रात आले आहेत. महाराष्ट्राची सांस्कृतिक किंवा जी काही जडणघडण झाली आहे, त्यामुळेच महाराष्ट्रात अनेक लोक बाहेरून आले, उद्योजक झाले, मोठे झाले. हे आपल्याला कसं नाकारता येईल?”, असं राज ठाकरे म्हणाले.
-
आज काल विधानसभेतल्या चर्चा ऐकावं वाटत नाही. कधी कधी असं वाटतं, की जे आमदार सभागृहात आहेत, ते बाहेरच येऊ येऊ नये. कारण ते बाहेर येऊन, परत ते माध्यमांसमोर नको त्या गोष्टी बरळत असतात. मुळात राजकारण वाईट नाही. मात्र, ते नासवलं जातं आहे. राजकारण हे चुकीच्या माणसांच्या हाती गेल आहे, असेही ते म्हणाले.
-
यावेळी त्यांनी देशातील तरुणांना राजकारणात येणाचं आवाहनही केले. देशातील तरुणांनी राजकारणात यावं. राजकारणात येण्यासाठी वयाचं कोणतंही बंधन नसतं, त्यासाठी वारसा असणं वगैरे सुद्धा लागत नाही, असं ते म्हणाले.
-
निवडणूक म्हणजेच राजकारण आहे, असं नाही. अनेक गोष्टी आहेत. ज्या राजकारणात आल्यानंतर करता येतात. आपल्या लोकांनी शांत राहून चालणार नाही. तरूणांनी राजकारणात आलं पाहिजे. अनेक विविध गोष्टी आहेत. ज्या करता येऊ शकतात त्यामुळे तरूणांनी राजकारणाकडे पाठ फिरवायला नको. असंही राज ठाकरेंनी म्हटलं.
-
पुढे बोलताना ते म्हणाले, “तुमचं संपूर्ण आयुष्य सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत राजकारणाला बांधलेलं आहे. तुमच्या घरी येणारं दुध, पाणीपट्टी, वीज या सर्वांचे दर राजकीय नेते ठरवत असतात आणि ते तुम्ही निमूटपणे भरता. कोणालाही काही प्रश्न विचारत नाहीत. राजकारण गलिच्छ आहे असं आपण म्हणतो. त्यामुळे अनेक तरूण मुलं, मुली परदेशात जातात. इथे राहातच नाहीत. तुमचं शांत आणि गप्प राहणं, तुमचं सहकार्य या राजकारणात नसणं यामुळे आपल्या आजूबाजूचा परिसर बरबाद होतो आहे हे आपण शांतपणे पाहतो आहोत”
-
“कधी कधी माझ्या मनात ‘१९९५च्या आधीचा महाराष्ट्र नंतरचा महाराष्ट्र’ असा एक लेख लिहावा असं विचार येतो. आज तुम्ही मुंबईची अवस्था बघा, तसेच तुम्ही ज्या पुण्यात राहता, त्या पुण्याची अवस्था बघा, चार-चार पुणे शहरं वसली आहेत. त्यामुळे मुंबई बरबाद व्हायला काही काळ गेला, मात्र, पुणं बरबाद व्हायला वेळ लागणार नाही”, असं सुचक विधानही त्यांनी केलं.
-
यावेळी बोलताना त्यांनी पुणे मेट्रोबाबतही प्रतिक्रिया दिली. लांब पल्ल्यासाठी मेट्रोचा वापर केला जातो. त्यामुळे पुण्यात मेट्रोची गरज खरंच आहे का? प्रत्येक शहराची वेगवेगळी मानसिकता असते. शहराचा वेग वेगळा असतो. त्या मानसिकतेप्रमाणे शहर घडवलं पाहिजे, असं ते म्हणाले.
Bihar Election Result 2025 Live Updates : “काँग्रेस एक असा परजीवी पक्ष आहे, जो…”, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा दिल्लीतून हल्लाबोल!