-
पर्यटक आहे, परंतु जुन्नर माहीत नाही असा एकही माणूस महाराष्ट्रात सापडणार नाही. दुर्दैवाने सापडलाच तर तो कमनशिबीच म्हणावा लागेल. कारण अगदी प्राचीन कालखंडापासून जुन्नर हे वेगवेगळ्या कारणांसाठी प्रसिद्ध आहे. ऐतिहासिक आणि गड-किल्ले, लेणी आणि घाटवाटांनी समृद्ध असलेले जुन्नर सर्वपरिचित आहे. जुन्नरला अष्टविनायक क्षेत्रांपैकी दोन मंदिरे ओझर आणि लेण्याद्री येथे आहेत हे सर्वांना माहीत आहे. पण याच जुन्नरच्या भक्तिसौंदर्यात भर घालणारी ठिकाणे अपरिचित मंदिरांच्या रूपाने उभी आहेत. काहींचं वास्तूस्थापत्य डोळ्यात भरतं, काहींना रंजक कथा चिकटल्या आहेत तर काहींच्या भोवती निसर्गाचं रूप आहे. ही जुन्नरची दुसरी बाजू मात्र थोडी अप्रकाशित आहे. ती आहे भक्तिभावाने रसरसलेल्या धार्मिक स्थळांची. ही बाजूही तितकीच सुंदर आहे. ग्रामीण संस्कृतीशी एकरूप झालेली आणि लोकांच्या श्रद्धेशी जोडलेली काही सुंदर मंदिरे जुन्नरच्या परिघात मोठय़ा दिमाखात उभी आहेत. याच ठिकाणांची सफर….
-
पूरचा कुकडेश्वर – जुन्नरहून आपटाळेमाग्रे नाणेघाटाकडे जाताना पूर नावाचे गाव लागते. गाव अगदी डोंगराच्या कुशीत वसले आहे. कुकडी नदीचा उगम येथूनच होतो असे ग्रामस्थ मोठय़ा भक्तिभावाने सांगतात. याच नदीच्या उगमावर कुकडेश्वर नावाचे देखणे प्राचीन शिवमंदिर उभे आहे. नवव्या शतकात शिलाहार राजा झंज याने महाराष्ट्रात एकूण १२ शिवमंदिरे विविध नद्यांच्या उगमस्थानी बांधली. त्यापकीच एक मंदिर म्हणजे कुकडेश्वर असे इतिहासकार म्हणतात.
-
कालौघात या मंदिराची बरीच पडझड झाली आहे. परंतु स्थानिक रहिवाशांनी संवर्धनाच्या दृष्टीने बऱ्यापैकी पावले टाकलेली दिसतात. मंदिराला सभामंडप असून तो बऱ्यापैकी सुस्थितीत आहे. या सभामंडपात मध्यभागी पूर्णाकृती चार खांब उभे आहेत. या खांबांची रचना आणि नक्षीकामही पाहण्यासारखे आहे. सभामंडपानंतर शिविपिंडी असलेला गाभारा आहे. यात शिवाची अतिशय सुंदर पिंडी आहे. पश्चिमाभिमुख असलेलं हे शिवालय दगडातील कोरीव कामांनी सजलेलं आहे.
-
गणेशपट्टी, कीर्तिमुखे, वराह अवतार, शिवतांडव शिल्प, कोरीव खांब यामुळे हे मंदिर संस्मरणीय ठरते. मंदिराच्या बाहेरही अवशेष विखुरलेले दिसतात. मागील बाजूस गोमुखातून कुकडी नदीचा उगम होतो असे येथील स्थानिक सांगतात. ऐन पावसाळ्यात किंवा हिवाळ्यात तुम्ही या परिसरात आलात तर निसर्गाच्या स्वर्गीय सुखाचा आनंद घेता येईल. या मंदिराच्या जवळच नाणेघाट, दाऱ्या घाट, शिवनेरी, चावंड, जीवधन अशी ठिकाणेही पाहता येतात.
-
आळेगावचा म्हैसोबा – म्हैसोबा या मंदिराचं वेगळेपण हीच त्याची जमेची बाजू आहे. नाव वाचून कदाचित आश्चर्यही वाटेल, पण या मंदिराची निर्मिती आणि त्या संबंधीची कथाही तेवढीच रंजक आहे. संत ज्ञानदेवांनी रेडय़ाच्या मुखातून वेद वदवून घेतले ही आख्यायिका भागवत धर्मामध्ये अत्यंत महत्त्वाची मानली जाते. यामुळे संत ज्ञानदेवांच्या आयुष्याला कलाटणी मिळाली. पठणमधील विद्वानसभेत माऊलींनी म्हैसोबाच्या मुखातून वेद वदवून घेण्याचा हा शब्दरूपी चमत्कार झाल्यानंतर माऊली आणि त्यांची भावंडे म्हैसोबासहित आळंदीकडे निघाली. चालत, मजल-दरमजल करीत डोंगरदऱ्या, घाट पार करीत मोठा पल्ला चालून म्हैसोबा मात्र थकले. झाडाच्या आळ्याच्या आकाराचा डोंगर आणि त्याच्याभोवतीच्या पठारीभागातच म्हैसोबा समाधिस्थ झाले. ते ठिकाण म्हणजेच आळेगाव. याच ठिकाणी ज्ञानदेवांनी म्हैसोबाला मूठमाती दिली. येथे आता एक सुंदर मंदिर बांधले आहे. याच्या गर्भगृहात समाधीचा दगड हा रेडय़ाच्या मुखासारखा आहे. त्याच्या शेजारीच ज्ञानदेवांचा मुखवटा आहे. या मंदिराचे वैशिष्टय़ म्हणजे येथे कित्येक वर्षांपासून अहोरात्र वीणा पहारा चालू आहे. आळेफाटय़ापासून कल्याण-नगर महामार्गावर नगरच्या दिशेने साधारण एक किलोमीटरवर हे मंदिर आहे.
-
कोरठाणचा खंडोबा – कोरठाणच्या खंडोबाचे हे मंदिर येते पारनेर तालुक्यात. पण ते आहे जुन्नरला खेटून. म्हणूनच हे मंदिर जुन्नरभेटीत आवर्जून पाहावे असेच आहे. हे मंदिरही प्रशस्त आणि खूप सुंदररीत्या जीर्णोद्धारित केले आहे. इतिहासकारांच्या मते मंदिराच्या प्रवेशदाराजवळील शिलालेखावर याचे बांधकाम १५६९ च्या सुमारास म्हणजेच मध्ययुगीन कालखंडात झाले आहे. या कोरठण खंडोबाला ‘बिन टाक्याचा देव’ म्हणून पूर्वी देवाचे ‘कोरं-ठाणे’ असं म्हणत. त्याचाच पुढे अपभ्रंश होऊन कोरठण असं नाव प्रसिद्धीला आलं. स्वयंभू तांदळा रूपात खंडोबा, म्हाळसा आणि बाणाई यांचं दर्शन इथे होतं. याच्याच पुढे स्वयंभू बारा लिंग दिसतात. या मंदिराचे वैशिष्टय़ म्हणजे आवर्जून पाहावी अशीच पितळेपासून बनवलेली मल्हारमूर्ती. खरं तर नळावणे आणि कोरठण ही दोन्ही खंडोबाची मंदिरे म्हणजे या पट्टय़ातील नागरिकांची श्रद्धास्थाने आहेत.
-
बेल्ह्य़ाचा ‘गुप्त विठोबा’ – आळेफाटय़ापासून साधारण १२ किलोमीटर अंतरावर बेल्हे नावाचे गाव लागते. हे गाव तसे ऐतिहासिक. तसे संदर्भ आपल्याला विविध ऐतिहासिक कागदपत्रातून मिळतात. या गावाची बांगरवाडी ही डोंगराच्या कुशीत वसलेली आहे. या वाडीत विठोबाचे फारच सुंदर मंदिर गर्द झाडीत उभे आहे. या विठोबाला ‘गुप्त विठोबा’ असे ओळखले जाते. या विषयीची एक आख्यायिका येथे ऐकवली जाते. ती म्हणजे गावातीलच एका गुराख्याला डोंगराच्या पोटात एक भुयार असल्याचे दिसले. या भुयारात खोदकाम केले तेव्हा तिथे विठोबाची मूर्ती सापडली. अशा रीतीने विठोबाचे गुप्त ठिकाण म्हणजेच हे गुप्त विठोबा मंदिर. आजमितीला येथे देखणे मंदिर बांधले आहे. या भुयारात जाण्यासाठी पायऱ्या आहेत. आत गेलो की खूप प्रसन्न वाटते. आषाढी आणि काíतकी एकादशीच्या दिवशी येथे फार मोठी यात्रा भरते. या मंदिराचे वेगळेपण जाणून घेण्यासाठी एकदा तरी या विठुरायाच्या चरणी लीन व्हायलाच हवे.
-
नळावणेचा खंडोबा – कोरठाण मंदिरासारखेच खंडोबाचे दुसरे मंदिर नळावणे येथे कोरठाण मंदिरापासून अवघ्या ३० किलोमीटरवर अंतरावर आहे. बेल्हे गावच्याच पुढे नळावणे गावातील खंडोबाचे मंदिर डोळ्यांचे पारणेच फेडते. यासाठी बेल्हेवरून १६ किलोमीटर अंतरावर असलेल्या या गावात आलो की दूर डोंगरावर असलेल्या या मंदिराकडे आपले चटकन लक्ष जाते. गाडीने डोंगरावर आलो की आपण क्षणभर स्तंभितच होतो. डोंगरावरच्या पसरलेल्या प्रचंड पठारावर असलेलं हे खंडोबाचं मंदिर खरोखरीच पाहण्यासारखे आहे. नसíगक स्थानामुळे या मंदिराला पठारावरचा खंडोबा असेही म्हटले जाते. गावकऱ्यांनी हे मंदिर खूप सुंदररीत्या जीर्णोद्धारित केले आहे. मंदिराच्या भवताली बगीचा, सुंदर सभागृह यामुळे येथे सहकुटुंब सहलीचा आनंद घेऊ शकतो. मंदिरासमोर दगडी दीपमाळाही दिसते. या दीपमाळेच्या पुढे उभं राहिलो की जुन्नरचा सारा ग्रामीण परिसर डोळ्यांचे पारणे फेडतो. मंदिरातली खंडोबाची मूर्ती मात्र अतिशय देखणी आहे. मंदिर दर्शनासाठी पंचक्रोशीतले नागरिक येथे गर्दी करीत असतात.
-
बऱ्याचदा जुन्नर भेटीत नेहमीचीच आणि प्रसिद्ध ठिकाणे आपण पाहत असतो. परंतु तेवढीच तोलामोलाची, आडवाटेवरची आणि अप्रसिद्ध ठिकाणं आपण पाहावीत यासाठी हा लेखनप्रपंच. व्यवस्थित नियोजन केले तर एका दिवसात ही ठिकाणं आरामात पाहून होतात. जुन्नरची ही आगळीवेगळी वाट तुम्हाला निश्चितच आवडेल.

Manoj Jarange : मनोज जरांगे यांच्या आंदोलनाबाबत उच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय