-
युएईत सुरु असलेला आयपीएलचा तेरावा हंगाम आता मध्यावर आला आहे. सर्व संघांमध्ये आता प्ले-ऑफच्या शर्यतीत आपलं स्थान पक्क करण्याची धडपड सुरु झाली आहे. (सर्व छायाचित्र सौजन्य – IPL/BCCI)
-
मुंबई, दिल्ली यासारख्या संघांनी यंदा अपेक्षित कामगिरी केली आहे, तर दुसरीकडे गेले काही हंगाम आपल्या खराब कामगिरीमुळे चर्चेत असलेल्या RCB ने सर्वांना धक्का देत यंदा अव्वल ४ जणांवर येण्याचा चंग बांधला आहे.
-
आतापर्यंत परदेशी खेळाडूंसह भारतीय खेळाडूंनीही तोडीस तोड कामगिरी करत आपली चमक दाखवली आहे.
-
आतापर्यंत पार पडलेल्या सामन्यांवरुन…सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या ११ खेळाडूंची यादी आपण जाणून घेणार आहोत…
-
१) लोकेश राहुल – आपला संघ यंदा चांगली कामगिरी करत नसला तरीही पंजाबचा कर्णधार लोकेश राहुल फलंदाजीत आपली कामगिरी चोख बजावतो आहे. आतापर्यंत ऑरेंज कॅपचा मानकरी असलेल्या राहुलने प्रभावी खेळी केली आहे. ६४ ची सरासरी आणि १३४.८४ चा स्ट्राईक रेटने राहुलने आतापर्यंत ३८७ धावा केल्या आहेत.
-
२) देवदत पडीकल – स्थानिक क्रिकेटमध्ये केलेल्या चांगल्या कामगिरीच्या आधारावर यंदा देवदतला RCB च्या संघात स्थान मिळालं. देवदतनेही मिळालेल्या संधीचं सोनं करत २४३ धावा करत आपली चमक दाखवली आहे. पडीकलच्या येण्यामुळे RCB ला एक नवीन चांगला सलामीवीर मिळालेला आहे.
-
३) विराट कोहली – फलंदाजीत विराटची आतापर्यंतची कामगिरी ही संमिश्र स्वरुपाची राहिलेली असली तरीही ज्या पद्धतीने त्याने आपल्या संघाचं नेतृत्व केलंय ते वाखणण्याजोगं आहे. तेराव्या हंगामात RCB ने अनेक सामने विराटच्या नेतृत्वकौशल्याच्या जोरावर जिंकले आहेत.
-
४) सूर्यकुमार यादव – मुंबई इंडियन्स संघासाठी तिसऱ्या क्रमांकावर खेळायला येणारा भरवशाचा फलंदाज. आतापर्यंत सूर्यकुमारने दोनवेळा आपली चमक दाखवून मुंबई इंडियन्सला अडचणींमधून बाहेर काढलं आहे. राजस्थानविरुद्ध सामन्यात केलेल्या नाबाद ७९ धावा आणि दिल्लीविरुद्ध सामन्यात केलेली ५३ धावांची खेळी हे सूर्यकुमारचं प्रमुख वैशिष्ट्य ठरलं आहे.
-
५) एबी डिव्हीलियर्स – विराट कोहलीच्या RCB संघाचं यंदाच्या हंगामातलं आव्हान कायम ठेवण्यात डिव्हीलियर्सचाही महत्वाचा वाटा आहे. गरजेच्यावेळी धडाकेबाज फलंदाजी आणि यष्टीरक्षण अशी दुहेरी भूमिका निभावत असणारा डिव्हीलियर्स RCB च्या संघाचा आधारस्तंभ बनलेला आहे. आपल्या अखेरच्या सामन्यात डिव्हीलियर्सने ३३ चेंडूत ७३ धावांची खेळी केली होती.
-
६) राहुल तेवतिया – पंजाब विरुद्ध सामन्यात शेल्डन कोट्रेलच्या एकाच षटकात मारलेले ५ षटकार आणि हैदराबादविरुद्ध सामन्यात सलामीचे फलंदाज स्वस्तात माघारी परतलेले असताना रियान परागसोबत केलेली महत्वपूर्ण भागीदारी यामुळे राहुल तेवतियाने आपलं संघातलं स्थान पक्क केलं आहे. याव्यतिरीक्त गोलंदाजीतही तेवतिया महत्वाचे बळी घेऊन दुहेरी भूमिका बजावतो आहे.
-
७) वॉशिंग्टन सुंदर – पॉवरप्लेच्या षटकांत भेदक मारा करुन प्रतिस्पर्धी संघाच्या धावांवर अंकुश लावण्याचं काम वॉशिंग्टन सुंदरने यंदाच्या हंगामात केलं आहे. RCB ला आतापर्यंत झालेल्या महत्वाच्या सामन्यांमध्ये विजय मिळवून देण्यात सुंदरचाही मोलाचा वाटा आहे.
-
८) जोफ्रा आर्चर – राजस्थान रॉयल्सकडून खेळत असताना जलदगती गोलंदाजीने प्रतिस्पर्धी संघावर दडपण ठेवण्यात आतापर्यंत जोफ्रा आर्चर यशस्वी ठरला आहे.
-
९) राशिद खान – सनराईजर्स हैदराबाद संघाची यंदाच्या हंगामातली कामगिरी संमिश्र स्वरुपाची आहे. मात्र राशिद खानने आतापर्यंत संघाने मिळवलेल्या विजयात मोलाची भूमिका बजावली आहे. महत्वाच्या षटकांमध्ये धावगतीवर अंकुश लावून विकेट घेण्याचं आपलं काम राशिदने चोख बजावलं आहे.
-
१०) जसप्रीत बुमराह – मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजीचं ब्रम्हास्त्र अशी ओळख असलेल्या बुमराहने यंदा मलिंगाच्या अनुपस्थितीत संघाचा भार आपल्या खांद्यावर व्यवस्थित पेलला आहे. बोल्ट आणि पॅटिन्सन या प्रमुख गोलंदाजांसोबत खेळत असताना बुमराहने आपलं काम चोख बजावलं आहे. आतापर्यंत झालेल्या सामन्यांत ११ बळी मिळवत बुमराहदेखील पर्पल कॅपच्या शर्यतीत आहे.
-
११) कगिसो रबाडा – १८ बळींसह पर्पल कॅपच्या शर्यतीत आघाडीवर असलेला कगिसो रबाडा हे दिल्लीच्या संघाचं यंदाच्या हंगामातील यशामागचं प्रमुख कारण आहे. कर्णधार श्रेयस अय्यरनेही आतापर्यंत झालेल्या सामन्यांत त्याचा खुबीने वापर करुन घेतला आहे. अखेरच्या षटकांत रबाडा आपल्या भेदक माऱ्याच्या जोरावर सामन्याचं चित्र पालटवत आला आहे.

अखेर दाखवला होणाऱ्या पतीचा चेहरा! थाटात पार पडला प्राजक्ता गायकवाडचा साखरपुडा, जोडीदाराचं नाव आहे खूपच खास…