-
भारताने ऑस्ट्रेलियाविरोधातील एकदिवसीय मालिका जरी गमावली असली तरी एका भारतीय क्रिकेट चाहत्यााठी मात्र ही मालिका अविस्मरणीय ठरली आहे. मेलबर्नमध्ये राहणाऱ्या दीपेन मनडालिया (Dipen Mandaliya) याने दुसऱ्या वनडे सामन्यादरम्यान गर्लफ्रेंड रोज विंबुश (Rose Wimbush) हिला लग्नाची मागणी घालत प्रपोज केलं आणि तिनेही होकार दिला. प्रपोज केल्यानंतर सोशल मीडियावर त्यांचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला होता. आता दिपेनने स्वतः त्यांची लव्हस्टोरी शेअर केली आहे.
-
दोघांच्या लव्हस्टोरीची सुरूवात दोन वर्षांपूर्वी झाली होती. इंस्टाग्रामवर आपली लव्हस्टोरी शेअर करताना दोघांची भेट कशी झाली याचा खुलासा दिपेनने केलाय.
-
दिपेन मनडालियाने काही फोटो पोस्ट करत, "तू माझ्या आयुष्यात रंग भरले… दोन वर्षांपूर्वी मी मेलबर्नला शिफ्ट झालो होतो आणि एका छोट्याशा अपार्टमेंटमध्ये घर घेतलं. या छोट्याशा घटनेमुळे माझं जीवन बदललं" असं म्हटलंय.
-
त्या घरात दिपेन यांच्या आधी एक महिला राहायची. तिचं नाव रोज विंबुश होतं. दिपेनने सांगितलं की, "तिथे मला रोज विंबुशसाठी पाठवलेले काही पोस्ट-मेल भेटले…आधी राहणाऱ्या भाडेकरुंचे पोस्ट-मेल तुम्हालाही भेटले असतीलच.. त्यावर मी त्यांचा शोध घेतला आणि आमची भेट झाली. पहिल्यांदा आम्ही कॉफीसाठी भेटलो, नंतर डिनरसाठी भेटायला लागलो".
-
दिपेन आणि रोज दोघंही क्रिकेटचे मोठे चाहते आहेत. दिपेन भारतीय क्रिकेट टीमचा तर रोज ऑस्ट्रेलिया टीमची मोठी फॅन आहे."जेव्हा आम्ही पहिल्यांदा भेटलो तेव्हा क्रिकेटबाबतच गप्पा मारत होतो. त्यामुळे प्रपोज करण्याची हिच योग्य संधी असल्याचं मला वाटलं", असं दिपेनने सांगितलं. "स्टेडियममध्ये प्रपोज केल्यानंतर आम्ही इंटरनेटवर व्हायरल झालो असणार आणि लोकांना आनंद साजरा करण्यासाठी काहीतरी मुद्दा भेटला असणार याची कल्पना होती", असंही दिपेन म्हणाला. "लोकांकडून मिळालेल्या शुभेच्छा आणि प्रेमामुळे आम्ही आनंदीत आहोत. तुमच्यापैकी प्रत्येकाचे मला मनापासून आभार मानायचेत. आमच्या प्रेमाला संमती दिल्याबद्दल ग्लेन मॅक्सवेलचेही विशेष आभार.."असंही दिपेनने नमूद केलं. दिपेनने प्रपोज केलं त्यावेळी ग्लेन मॅक्सवेलनेही टाळ्या वाजवल्या होत्या. तसंच दिपेनने त्यावेळी समालोचन करणाऱ्या अॅडम गिलख्रिस्ट आणि ब्रेट ली यांचेही आभार मानलेत. या तिघांनाही त्याने आपल्या पोस्टमध्ये टॅग केलं आहे. तसंच पोस्टच्या अखेरीस, "मी नशिबवान व्यक्ती आहे कारण रोज माझ्यासोबत आहे…आताही आहे आणि कायम असणार आहे. अजून खूप मोठी इनिंग्स खेळायची राहिलीये", असं म्हटलंय.

‘एचएसआरपी’ नंबर प्लेटबाबत हायकोर्टाचे महत्त्वपूर्ण विधान; म्हणाले, “अधिकचे दर…”