दुखापतग्रस्त मोहम्मद शमीच्या जागेवर वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजची वर्णी लागली आहे. बॉक्सिंग डे कसोटी सामन्यात जिराजनं भारतीय संघात पदार्पण केलं आहे. संघानं दाखवलेला विश्वानं सिराजनं पदार्पणाच्या सामन्यातच सार्थ केला आहे. दुसऱ्या कसोटी सामन्यात सिराजनं महत्वाचे दोन बळी घेत कांगारुंच्या अडचणी वाढवल्या. जसप्रीत बुमराह आणि आर. अश्विन यांच्या साथीनं भेदक मारा करत सिराजनं आपलं कर्तुत्व दाखवून दिलं. आयपीएलमुळे २०१७ मध्ये सिराज पहिल्यांदा चर्चेत आला होता. त्याने त्या सत्रात सनरायजर्स हैदराबादकडून खेळताना १० गडी बाद केले होते. तेव्हापासून तो भारतीय क्रिकेटमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे. आज सिराज भारतीय संघात खेळत जरी असला तरी इथंपर्यंत पोहचण्याचा त्याचा प्रवास खडतर होता… एका रिक्षाचालकाचा मुलगा आज भारतीय क्रिकेटमध्ये खेळतोय… ही खरं तर अभिमानाची गोष्ट आहे. यामध्ये सिराज आणि त्याच्या कुटुंबीयांचा मोठा संघर्ष आहे. मोहम्मदचे वडील रिक्षा चालवायचे. आपल्या गरिबीची झळ मोहम्मदच्या बाबांनी मुलाच्या स्वप्नांवर पडू दिली नाही. मुलाचं स्वप्न पूर्ण व्हावं यासाठी वडिलांनी अधिक मेहनत घेतली. परवडत नसतानाही त्याला महागडी क्रिकेट किट आणून दिली. गल्ली क्रिकेटमध्ये सिराजच्या गोलंदाजीची चांगलीच दहशत होती. पण गल्लीसोडून मोठ्या स्तरावर त्याला खेळायला मिळत नव्हते. एके दिवशी सिराजच्या एका मित्राने त्याला आपल्या चारमिनार क्रिकेट क्लबमध्ये खेळायला बोलावले. तेथूनच त्याच्या क्रिकेटला वेगळं वळण मिळालं. २०१५ मध्ये चारमिनार येथे झालेल्या त्या सामन्यात सिराजनं भेदक गोलंदाजी करत पाच विकेट घेतल्या. या कामगिरीमुळे सिराजला हैदराबादच्या २३ वर्षाखालील संघात स्थान मिळालं. त्याच वर्षी सिराजनं आपल्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर रणजी संघातही स्थान मिळवलं. मात्र, त्याला फक्त एकच सामना खेळायला मिळाला. सिराजनं आपल्या गोलंदाजीवर आणखी काम केलं. २०१६ मध्ये सिराज हैदराबादचा सर्वाधिक बळी मिळवणारा गोलंदाज होता. रणजी स्पर्धेत त्यानं ४१ बळी घेतले होते. या अफलातून कामगिरीमुळे सिराज भारतीय क्रिकेटमध्ये प्रकाशझोतात आला. त्यानंतर आयपीएलमध्येही त्याची निवड झाली. २०१७ मध्ये सिराजने सनरायजर्स हैदराबादकडून खेळताना एका सत्रात १० गडी बाद केले होते. आपल्या कठोर कामगिरीच्या जोरावर सिराजनं भारतीय संघातही स्थान मिळवलं. टी-२०, एकदिवसीय आणि आता कसोटी सामन्यात सिराज भारतीय संघाचा सदस्या राहिलाय. सिराजनं आपल्या पहिल्याच ट्वेन्टी-२० सामन्यामध्ये सिराजने न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यम्सनची विकेट मिळवली होती. विशेष म्हणजे सिराजनं आतापर्यंत कधीही क्रिकेटचं प्रशिक्षण घेतलं नाही. गल्ली क्रिकेटमध्ये टेनिस चेंडूवर त्यानं आपली गोलंदाजी शैली विकसीत केली. गरिबीमुळे सिराजला कधीही चांगल्या प्रशिक्षकांकडून गोलंदाजीचे धडे गिरवू शकला नाही. मात्र आज तो मोकळ्या वेळेत गरीब मुलांना मोफत प्रशिक्षण देतो. मोहम्मद सिराजची क्रिकेटमधील पहिली मिळकत फक्त ५०० रुपये होती. एका क्लबच्या सामन्यात सिराजने नऊ गडी बाद केले होते. बॉक्सिंग डे कसोटी सामन्यातील सिराजच्या भेदक गोलंदाजीसमोर ऑस्ट्रेलियाचे फलंदाजांनी नांगी टाकली. सिराजनं पदार्पणाच्या सामन्यात दोन बळी घेतले. कसोटी मालिकेला सुरुवात होण्यापूर्वी सिराजच्या वडिलांचं निधन झालं होतं. वडिलांच्या अंत्यविधीसाठी मायदेशी परतू शकला असता पण भारतातून ऑस्ट्रेलियात गेल्यावर त्याला पुन्हा कठोर क्वारंटीनला सामोरं जावं लागलं असतं. त्यामुळे त्याची भारतासाठी खेळण्याची शक्यता अगदीच धूसर झाली असती. त्यामुळे सिराजनं ह्रदयावर दगड ठेवत ऑस्ट्रेलियातच राहण्याचा निर्णय घेतला होता. सिराजच्या या निर्णायनंतर अनेक दिग्गजांनी कौतुकाची थाप टाकली होती. वडिलांच्या जाण्याचा आघात मोठा असतो. सिराजच्या कारकीर्दीत त्याच्या वडिलांचा पाठिंबा मोलाचा होता. सिराजच्या आयुष्यातला हा सगळ्यात भावनिक क्षण होता. त्यानं यातून सावरुन स्वप्नवत पदार्पण केलं आहे.

Milan Airport: विमानाच्या इंजिनमध्ये अडकून एका व्यक्तीचा मृत्यू; टेकऑफदरम्यान घडली भीषण घटना