भारताचे माजी क्रिकेटपटू फारुख इंजिनियर हे आपल्या बेधडक वक्तव्यामुळे चर्चेत असतात. सध्या इंग्लंड क्रिकेट संघात सुरू असलेल्या वादग्रस्त ट्वीटप्रकरणी त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. फारुख इंजिनियर यांनी वेगवान गोलंदाज ओली रॉबिनसनच्या निलंबनाचे समर्थन केले आहे. इतकेच नव्हे तर त्यांनी ''आयपीएलमुळे इंग्लंडचे खेळाडू आमचे तळवे चाटतात, मला त्यांचे रंग माहीत आहेत'', असेही वक्तव्य केले आहे. २०१९मध्ये झालेल्या एकदिवसीय वर्ल्डकप स्पर्धेदरम्यानही फारुख इंजिनियर यांनी एक वक्तव्य केले होते. त्यांनी विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्माबाबत एक विधान केले. या विधानावरून बराच गोंधळ उडाला होता. ''निवडकर्ते स्पर्धेदरम्यान अनुष्काला चहा-पाणी देण्यात व्यस्त होते'', असे म्हटले होते. अनुष्काने या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली होती. अनुष्कासंबधीच्या वादाच्या वेळी फारुख इंजिनियर यांनी एमएसके प्रसाद यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीवरही हल्लाबोल केला होता. ''आमच्याकडे मिकी माउस निवड समिती आहे. निवडकर्त्यांची पात्रता काय आहे? निवड समितीत उपस्थित सर्व माजी खेळाडूंना एकूण १२ कसोटी सामने खेळण्याचा अनुभवही नाही'', असा हल्ला त्यांनी चढवला होता. २०१४च्या इंग्लंड दौर्याला विराट कोहलीने त्याच्या कारकिर्दीतील सर्वात वाईट टप्पा म्हणून सांगितले होते. खराब कामगिरीमुळे आपण नैराश्यात गेल्याचे कोहलीने म्हटले होते. याबद्दलही इंजिनियर यांनी प्रतिक्रिया दिली. ''सुंदर पत्नी असताना तुम्ही डिप्रेशनमध्ये कसे जाऊ शकता. तू बाप झाला आहेस. देवाचे आभार मानण्याची पुष्कळ कारणे आहेत'', असे इंजिनियर यांनी म्हटले होते. मागील वर्षी सुनील गावसकर एका वक्तव्यामुळे ट्रोल झाले होते. विराटने लॉकडाउनमध्ये अनुष्काच्या बॉलिंगचा सराव केला आहे, असे म्हटले होते. गावसकरांच्या बचावासाठी फारुख इंजिनियर पुढे आले होते. भारतीयांकडे सेन्स ऑफ ह्युमर नाही, असे इंजिनियर म्हणाले होते. त्यांच्या या वक्तव्यावरही अनेक प्रतिक्रिया समोर आल्या होत्या.

लिव्हर खराब झालं तर पायांमध्ये दिसतात ‘ही’ ६ लक्षणे! दुर्लक्ष केलं तर होतील वाईट परिणाम