-
लडाख सीमेवरील धुमश्चक्रीनंतर भारत-चीन यांच्यात निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने सोमवारी टिकटॉक, शेअरइट, ब्युटी प्लस या लोकप्रिय चिनी अॅपसह एकूण ५९ अॅपवर बंदी घातली. अॅण्ड्रॉइड आणि आयओएस दोन्ही प्लॅटफॉर्मवर ही बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळेच आयफोनबरोबरच अॅण्ड्रॉइड युझर्सलाही आता ही अॅप वापरता येणार नाहीत.
-
वापरकर्त्यांची माहितीचोरी, तिचा गैरवापर, राष्ट्रीय सुरक्षेला धोका आणि नागरिकांची मागणी यांच्या आधारे बंदी घालण्यात आल्याचे माहिती तंत्रज्ञान खात्याने निवेदनाद्वारे स्पष्ट केले. नागरिकांतूनही या अॅपबाबत तक्रारी येत होत्या, असेही मंत्रालयाने या आदेशांत म्हटले आहे. मात्र ही बंदी नक्की कशाप्रकारची आहे यासंदर्भात अद्याप अधिक स्पष्टपणे कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. त्यामुळेच हे अॅप्स वापरणाऱ्या युझर्समध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. म्हणूनच सायबर कायदेतज्ज्ञ अॅड. प्रशांत माळी यांनी हे अॅप वापरणाऱ्यांसाठी चार महत्वाचे सल्ले दिले आहेत.
-
प्रशांत माळी यांच्या सांगण्यानुसार बंदी घातलेली अॅप्स ही युझर्सच्या मोबाइलवरुन आपोआप डिलीट किंवा दिसेनाशी होणार नाहीत.
-
पहिला सल्ला: बंदी घालण्यात आलेल्या ५९ अॅप्सपैकी तुमच्या मोबाइलमध्ये कोणतेही अॅप असल्यास प्रत्येक अॅप अनइन्स्टॉल करण्याऐवजी थेट फॅक्ट्री रिसेटचा वापर करावा असा सल्ला अॅड. माळी यांनी दिला आहे.
-
फॅक्ट्री रिसेट केल्यास मोबाइलवर केवळ प्री इन्स्टॉल म्हणजेच मोबाइल विकत घेतल्यानंतर आधीपासूनच असणारी अॅप कायम राहतात. युझर्सने डाउनलोड केलेली अॅप्स फॅक्ट्री रिसेट केल्यावर अनइन्स्टॉल होतात.
-
दुसरा सल्ला: चिनी अॅप एकाच वेळी अनइन्स्टॉल करण्यासाठी फॅक्ट्री रिसेटचा पर्याय वापरत असाल तर आधी डेटा बॅकअप घेऊन ठेवणे फायद्याचे ठरते असा सल्ला अॅड. माळी यांनी दिला आहे.
-
फॅक्ट्री रिसेट मारल्यानंतर अगदी वॉलपेपरपासून ते पासवर्ड, लॉगइन केलेली अकाउंट लॉगआऊट होतात. डाउनलोड केलेल्या अॅप्सच्या दृष्टीकोनातून सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास नवा फोन विकत घेतल्याप्रमाणे जसा असतो त्याचप्रमाणे तो फॅक्ट्री रिसेट मारल्यानंतर दिसतो.
-
तिसरा सल्ला: बंदी घालण्यात आलेली अॅप युझर्सने डिलीट न करता ती वापरण्याचा निर्णय घेतला तर ते धोकादायक ठरु शकते असं अॅड. माळी सांगतात. ही अॅप मोबाइलवर काम करतील मात्र ती वापरण्यात धोका असेल. हॅकर्स या अॅपच्या माध्यमातून युझर्सच्या मोबाइलवर नियंत्रण मिळवून माहिती चोरु शकतो.
-
अपडेट न केलेली अॅप हॅक होण्याची आणि त्या माध्यमातून माहिती चोरली जाण्याची शक्यता अधिक असते. बंदी घालण्यात आलेली अॅपही अपडेट करण्यामध्ये अडचणी निर्माण होण्याची शक्यता असल्याने अशी अॅप फॅक्ट्री रिसेटच्या मदतीने अनइन्स्टॉल केलेली फायद्याचे ठरु शकते.
-
चौथा सल्ला: टिकटॉक वापरणारे कलाकार त्यांची इच्छा असल्यास लोगो रिमुव्हल अॅप वापरुन शूट केलेले व्हिडिओ भारतीय अॅप्सच्या माध्यमातून शेअर करु शकतात, असं अॅड. माळी सांगतात.
-
मात्र वर नमूद केल्याप्रमाणे बंदी घालण्यात आल्याने या अॅपच्या माध्यमातून हॅकर्स माहिती चोरण्याचा धोका अधिक असल्याने ती वापरण्यासंदर्भातील निर्णय घेताना आणि वापरताना जास्त सतर्क राहणं फायद्याचं आहे.

Video : जेव्हा भारतीय तरुणी जपानच्या रस्त्यावर साडी नेसून फिरते…; पाहा, जपानी लोकांच्या प्रतिक्रिया