माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या ‘अर्थसंकल्प सोप्या भाषेत’ पुस्तकाचं बुधवारी प्रकाशन करण्यात आलं. या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानसभाध्यक्ष नाना पटोले, सभापती रामराजे निंबाळकर, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, आशिष शेलार उपस्थित होते. -
फडणवीस यांच्या पुस्तकाच्या निमित्ताने सर्वपक्षीय नेते व्यासपीठावर होते. मात्र सर्वांचं लक्ष फडणवीस, उद्धव ठाकरे आणि अजित पवार यांच्याकडे होतं.
-
रंगपंचमी पुढच्या आठवडय़ात असली तरी विधिमंडळातील नेत्यांनी फडणवीस यांच्या कौतुकाचे निमित्त साधत कोटय़ा करत या कार्यक्रमातच राजकीय रंगपंचमी साजरी केली.
-
"देवेंद्र फडणवीस यांनी राजकारण सोडून लेखक व्हायला हरकत नाही. तेवढेच आम्हाला शांतपणे जगता येईल. राम नाईक आलेले आहेत. त्यांनी देवेंद्रजींच्या या ज्ञानाचा उपयोग दिल्लीत करून घ्यावा. अर्थात तसे झाले तर सर्वात जास्त आनंद हा सुधीर मुनगंटीवार यांना होईल," अशी टोलेबाजी करत अजित पवार यांनी कार्यक्रमात रंगत आणली. "देवेंद्र फडणवीसांचं हे पुस्तक बघितल्यानंतर देवेंद्रजी तुम्ही उत्तम साहित्यिक होऊ शकाल असं आम्हाला जाणवायला लागलं आहे आणि विषयाची जाण जर बघितली तर राजकारण सोडून लेखक बनायला काही हरकत नाही असं आम्हाला वाटतं. तसं झाल्यास आम्हाला पण सुगीचे दिवस येतील. आमचं जरा बरं चालेल," असं अजित पवार यांनी म्हटलं. फडणवीस यांच्या पुस्तकाचं कौतुक करताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी, फडणवीसांनी राजकारण सोडून लेखक बनायला काही हरकत नाही असं म्हटलं. तसं झाल्यास आम्हाला सुगीचे दिवस येतील असा मार्मिक टोलाही लगावला. -
तोच धागा पकडत विधानसभाध्यक्ष नाना पटोले यांनी देवेंद्र फडणवीस यांची कामगिरी विरोधी बाकांवरच जास्त खुलत असल्याने त्यांनी दीर्घकाळ विरोधी पक्षनेतेपदावर राहावे ही शुभेच्छा अशी कोपरखळी लगावली.
पवार यांनी रचलेल्या पायावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कळस चढवला. अशा विषयावर भाष्य करावे लागेल, पुस्तक प्रकाशन करावे लागेल असा विचार केला नव्हता. पण हा प्रसंग तुमच्यामुळेच आला, असा चिमटा ठाकरे यांनी फडणवीस यांना काढला. केवळ मला कळावे म्हणूनच हे पुस्तक लिहिले, असा विनोदही त्यांनी स्वत:वर केला. आपला कार्यक्रम दुसऱ्याच्या खर्चाने कसा करावा हे तुमच्याकडून शिकण्यासारखे आहे, असा टोलाही ठाकरे यांनी लगावला. अजित पवार यांनी तुम्हाला दिल्लीत जाण्याची शुभेच्छा दिली असली तरी मी मात्र फक्त असेच पुस्तक पुढची पाच-दहा वर्षे लिहीत राहा अशा शुभेच्छा देईन, अशी कोपरखळी मारली. अर्थसंकल्प हा अनेकांना क्लिष्ट विषय वाटतो. पण तो सामान्य लोकांनाही समजला पाहिजे या भावनेतून २००५ मध्ये पहिल्यांदा हे पुस्तक लिहिले होते. पण आता योजना खर्च-योजनेतर खर्च असे भाग उरले नाहीत. त्यामुळे नव्या संकल्पनांसह सामान्य माणसाला सोप्या शब्दांत अर्थसंकल्प समजावा या दृष्टीने ते पुन्हा लिहिले आहे. विद्वानांसाठी हे पुस्तक नाही. थोडक्यात माहिती दिली आहे. त्यामुळे पुस्तक वाचायला फारतर ४० मिनिटे लागतात, असे देवेंद्र फडणवीस यांनी मनोगत मांडताना स्पष्ट केले. माझ्यापेक्षा माझ्या पत्नीला जास्त पगार आहे. त्यामुळे तो माझ्या लक्षात राहतो असं देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितलं. "आपल्याला मिळणारा पगार, पत्नीला मिळणारा पगार ही आपली आवक आहे. तर घरचा खर्च जावक आहे. त्याच्याकरिता जे काही वित्तीय व्यवस्थापन आपण करतो आणि तसंच राज्याचं वित्तीय व्यवस्थापन असतं. यामध्ये जास्त फरक नाही. फक्त राज्यात अधिक व्यापकता असते. राज्याला जास्त मोठं काम करावं लागतं. आपण बजेट नीट समजून घेतलं तर भीती निघून जाईल," असं यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. यावेळी त्यांनी माझ्यापेक्षा माझ्या पत्नीला जास्त पगार आहे म्हणून मला तो लक्षात राहतो असं मिश्किल वक्तव्य केलं. बजेटसंबंधी बोलताना त्यांनी म्हटलं की, "जीडीपीचा नेमका अर्थ ५० टक्क्यांहून जास्त लोक सांगू शकत नाही. पण कार्यपद्धती आणि रचना कळली तर केंद्राचा किंवा राज्याचा असो अर्थसंकल्प समजू शकतो. त्याचं विश्लेषण करता येऊ शकतं". हिंदी आणि इंग्रजीतही हे पुस्तक येणार असल्याची माहिती यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी दिली. -
-
'अर्थसंकल्प – सोप्या भाषेत' हे पुस्तक डाऊनलोड करण्यासाठी खालील संकेतस्थळाला भेट देऊ शकता. https://www.devendrafadnavis.in/wp-content/themes/Matrix-Light/images/arthsankalp_sopya_bhashet-marathi.pdf

Asia Cup Trophy: मोठी बातमी! भारतीय संघाचा आशिया चषकाची ट्रॉफी स्वीकारण्यास नकार; मोहसीन नक्वींना बगल