-
राज्यात करोनाचा पहिला रुग्ण सापडलेल्या पुण्यात परिस्थिती पुन्हा एकदा चिंताजनक होताना दिसत आहे. पुण्यात दिवसेंदिवस रुग्णसंख्येत वाढ होताना दिसत असून प्रशासनानं करोनाचा प्रसार नियंत्रित करण्यासाठी आज (२१ फेब्रवारी) महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. (सर्व छायाचित्रं प्रातिनिधीक/इंडियन एक्स्प्रेस)
-
मुंबईसह राज्यातील पुणे, नागपूर या शहरात करोनाचा पुन्हा उद्रेक होण्याची चिन्हं दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी सर्व अधिकाऱ्यांची आज बैठक घेतली. या बैठकीत काही महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत.
-
-
पुण्यात उद्या सोमवारपासून नाईट कर्फ्यूचे नियम लागू केले जाणार आहेत. रात्रीच्या वेळी संचारबंदीचे नियम लागू करण्यात येणार असले, तरी त्याला संचारबंदी न म्हणता नियंत्रित संचार असं संबोधण्यात येईल, असं प्रशासनानं म्हटलं आहे. तसेच हॉटेल, रेस्टॉरंट आणि मंगल कार्यालयांसाठी सूचनाही जारी करण्यात आल्या आहेत.
-
पुणे जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालये, कोचिंग क्लासेस २८ फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
-
स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासिका ५० टक्के क्षमतेने सुरू ठेवण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला आहे. खासगी, राजकीय कार्यक्रमांसह विवाह सोहळ्याला २०० लोकांच्या उपस्थितीला परवानगी देण्यात आली आहे.
-
विवाह सोहळ्यासाठी पोलिसांची परवानगी घेणं बंधनकारक असणार आहे. परवानगीसाठी सिंगल विंडो सिस्टिम सुरू करण्यात येणार आहे.
-
हॉटेल, लॉज, बार रेस्टॉरंट रात्री ११ वाजेपर्यंत सुरु राहणार आहेत. हॉटेल, रेस्टॉरंट आणि बारसाठी उद्यापासून निर्बंध लागू करण्यात येणार आहेत. अत्यावश्यक सेवा वगळता रात्री ११ ते सकाळी ६ वाजेपर्यंत इतरांना रात्रीच्या वेळी फिरण्यास मज्जाव करण्यात आला आहे.
-
पुणे जिल्हा करोनाच्या रुग्ण वाढीत राज्यात १२व्या क्रमांकावर आहे. तरीही खबरदारीचा उपाय म्हणून जिल्ह्यातील हॉटस्पॉट शोधण्यात येणार असून, कॉन्टॅक्ट ट्रेसिंगवर भर देण्यात येणार आहे. पुणे शहर आणि जिल्ह्यात वाढत्या करोना रुग्णांची संख्या लक्षात घेता, नागरिकांच्या अधिकाधिक तपासण्या करण्यावर भर दिला जाणार आहे. त्यानुसार तालुकानिहाय कोविड सेंटर उभारले होते, ते आता पुन्हा कार्यान्वित केले जाणार आहेत. पुणे शहरात भविष्यात रुग्ण संख्या वाढल्यास जम्बो कोविड सेंटर सुरू केले जाणार आहेत.
-
अजित पवार यांनी काउन्सिल हॉलमध्ये घेतलेल्या आढावा बैठकीला कामगार मंत्री दिलीप वळसे-पाटील, खासदार वंदना चव्हाण, विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, पुणे मनपा आयुक्त विक्रमकुमार, पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांच्यासह जिल्ह्यातील सर्व खासदार उपस्थित होते.

Devendra Fadnavis : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर देवेंद्र फडणवीसांची रोखठोक भूमिका; म्हणाले, “राजकारण चुलीत गेलं, पण…”