-
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज सकाळी देशामधील तिसऱ्या टप्प्यातील करोना लसीकरण सुरु झाल्यानंतर दिल्लीमध्ये कोरनाची लस घेतली. मोदींनी सकाळी सात वाजता दिल्लीमधील ऑल इंडिया इन्स्टिट्युट ऑफ मेडिकल सायन्सेस (एम्स) रुग्णालयामध्ये लसीचा पहिला डोस घेतला.
-
मोदींनीच ट्विटरवरुन यासंदर्भातील फोटो पोस्ट केल्यानंतर त्याबद्दलची माहिती समोर आली. या फोटोमध्ये मोदींसोबत दोन नर्सही दिसत आहेत. लस घेताना मोदी हसत असल्याचे या फोटोत दिसत आहे. हा फोटो व्हायरल झाला असून मोदींना लस देणाऱ्या दोन्ही नर्सने डीडी न्यूजला मोदींना दिलेल्या लसीसंदर्भातील माहिती दिलीय.
-
मोदींना लस देणाऱ्या नर्सचे नाव पी. निवेदा असं आहे. निवेदा या मूळच्या पुद्दुचेरीच्या आहेत.
-
"मागील तीन वर्षांपासून मी एम्समध्ये काम करत आहे. सध्या मी करोना लसीकरण केंद्रात कार्यरत आहेत. आज सकाळीच पंतप्रधान नरेंद्र मोदी लसीकरणासाठी येणार असल्याची माहिती आम्हाला मिळाली. पीएम सरांना लस देण्यासाठी मला बोलवण्यात आलं तेव्हा ते लस घेण्यासाठी पोहचल्याचं समजलं," असं निवेदा यांनी सांगितलं.
-
तसेच पुढे बोलताना, "सरांना भेटून खूप छान वाटलं. त्यांनी आमच्याशी खूप छान गप्पा मारल्या. त्यांना भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन ही लस देण्यात आली असून पुढील डोस २८ दिवसांनंतर देण्यात येणार आहे," असंही निवेदा यांनी सांगितलं.
-
भारत सरकारने करोना लसीकरण मोहिमेसाठी सीरम इन्स्टिटयूट ऑफ इंडियाच्या ‘कोव्हिशिल्ड’ आणि भारत बायोटेकच्या ‘कोव्हॅक्सिन’ या लसीच्या आपत्कालीन वापरासाठी परवानगी दिली आहे. त्यापैकी मोदींना कोव्हॅक्सिन ही लस देण्यात आलीय.
-
मोदींनी काय विचारलं असा प्रश्न या नर्सला विचारण्यात आला. "तुम्ही मुळच्या कुठून आहात वगैरे चौकशी पंतप्रधानांनी केली. तसेच करोनाची लस दिल्यानंतर मोदींनी पहिली प्रतिक्रिया देताना, दिली सुद्धा लस कळलंही नाही, (लगा भी दिये, पता भी नही चला) असं म्हटलं," अशी माहिती पी. निवेदा यांनी दिली.
-
तसेच निवेदा यांच्यासोबत असणाऱ्या दुसऱ्या नर्सचे नाव रोसामा अनिल असं असून त्या केरळच्या आहेत. त्यांनी डीडी न्यूजशी बोलताना आज सकाळीच आम्हाला पंतप्रधान मोदी लस घेण्यासाठी येणार असल्याचं समजल्याची माहिती दिली.
-
“एम्स रुग्णालयात करोनाचा पहिला डोस घेतला. करोनाविरोधातील जागतिक लढाईला बळ देण्यासाठी आपल्या डॉक्टर आणि वैज्ञानिकांनी ज्या जलगतीने काम केलं ते कौतुकास्पद आहे,” असं नरेंद्र मोदींनी म्हटलं आहे. त्याचप्रमाणे, “जे जे लोकं लसीकरणासाठी पात्र आहेत त्यांनी लस घ्यावी असं मी आवाहन करतो. आपण मिळून भारताला करोनामुक्त करुयात” असंही मोदी या ट्विटमध्ये म्हणाले आहेत.
-
एम्सचे निर्देशक रणदीप गुलेरिया यांनी पंतप्रधान मोदींनी लस घेत देशाला मोठा संदेश दिल्याचं मत व्यक्त केलं आहे. यामुळे लोकांमध्ये असणारा संभ्रम दूर होण्यास मदत होणार आहे. या फोटोंमुळे भारतीय लसींबद्दल सर्वांच्या मनात विश्वास नक्कीच निर्माण होईल असं रणदीप यांनी म्हटलं आहे. (सर्व फोटो ट्विटरवरुन साभार)

अखेर ‘या’ ३ राशींचा सुवर्णकाळ सुरू! २०२५च्या उत्तरार्धात धनलाभाची संधी; बाबा वेंगांची मोठी भविष्यवाणी