-
करोनानं व्यापून टाकलेलं, विषाणूच्या मुठीत घट्ट आवळल्या गेलेलं हे वर्ष आता मावळतीकडे झुकलं आहे. दोन दिवसात भय, निराशा, दुःख, वेदना, व्यथा, उपासमार, आंदोलनं आणि हालपेष्टांनी भरून राहिलेलं वर्ष जड अंतकरणानं निरोप घेईल. त्यानंतर आशा, उत्साह आणि उमेद घेऊन नव्या वर्षाचा सूर्य उगवेल. पण माळवत्या वर्षानं जाताना काय नोंदी करून ठेवल्या? कॅमेऱ्याच्या नजरेतून या नोदींवर जाता जाता एक नजर टाकायला हवी ना? (सर्व छायाचित्रं/इंडियन एक्सप्रेस)
-
जगभर करोनाची चर्चा चालू होती. तोपर्यंत भारतही या विषाणूच्या नजरेत नव्हता. त्यावेळी दिल्लीतील जवाहरलाल नेहरू अर्थात जेएनयू विद्यापीठात संतप्त घटना घडली. विद्यापीठाच्या परिसरात विद्यार्थ्यांवर हल्ला करण्यात आला. याचे पडसाद देशभर उमटले. मुंबईतही वांद्रे येथील कार्टर रोडवर येत जनसमुदायाने घटनेचा निषेध नोंदवला.
-
विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्याचा रात्रभर निषेध नोंदवल्यानंतर विद्यार्थी आंदोलकांनी गेट वे ऑफ इंडिया परिसरातच नमाज अदा केली.
-
हे दृश्य अंगावर काटे उभं करतं. सुधारित नागरिकत्व कायद्यावरून दिल्लीत आंदोलन उभं राहिलं. त्याच काळात दोन समुदाय आमने-सामने आले. बघता बघता संघर्ष पेटला आणि दंगल उसळली. त्या दंगलीत अनेकांना प्राण गमवावे लागले. याच दंगलीवेळी एक व्यक्तीमागे हात धुवून लागलेल्या जमावाचे रुप दाखवून आपण किती हिंसक होत चाललो आहोत? असा प्रश्नही मावळते वर्ष सोडून जात आहे.
-
राष्ट्रीय राजकारणाचे डावपेच दिल्लीत आखले जातात. त्याच दिल्लीतील विधानसभा निवडणूक प्रचंड चर्चेची ठरली. एकमेकांची उणीदुणी काढण्यापासून ते देशद्रोही आणि जीव घेण्याची भाषाही केली गेली. आश्वासक बाब म्हणजे राष्ट्रवाद विरुद्ध विकास अशी झालेल्या निवडणुकीत नागरिकांनी विकासाच्या मुद्यांवर 'आप'कडे सत्ता सोपवली. केजरीवाल पुन्हा मुख्यमंत्री झाले. त्यानंतर केजरीवालांच्या रुपातील या चिमुकल्यानं सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतलं.
-
निरोप घेणाऱ्या वर्षात फक्त करोनाच होता असं नाही. काही आनंदाचे क्षणही जगायला मिळाले. होळीनंतर पश्चिम बंगालमध्ये हुरांगा नावाचा खेळला जातो. या खेळात सहभागी झालेल्या महिलेचं हे आनंदायी छायाचित्र.
-
करोना आला… काही दिवसांतच सगळीकडे भीतीचे ढग दाटून आले. अनपेक्षितपणे आलेल्या संकटानं अंधारू आल्यासारखंच झालं. त्यावर मात करून पुढची वाट शोधण्यासाठी केंद्र सरकारनं लॉकडाउन लागू केला. अचानक झालेल्या घोषणेनं सगळ्यांचीच भंबेरी उडाली. जो तो घर गाठण्यासाठी आपापल्या वाटेनं धावत सुटला. त्यावेळी दिल्लीतील आनंद विहार बसस्थानकाला धडका देणाऱ्या गर्दीचं हे छायाचित्र.
-
एका विषाणूनं लोकांची झोपच उडवली होती. दुसऱ्या राज्यांतून, शहरांतून येणाऱ्या लोकांना बहिष्कृत केलं गेलं. सरकारनं अशा लोकांसाठी क्वारंटाईनची सोय केली. उत्तर प्रदेशातील भारीच जिल्ह्यात एका शाळेत क्वारंटाइन करण्यात आलेल्या कामगारांचं हे दृश्य पाहिलं की, त्यावेळची परिस्थिती नजरेसमोर उभी राहिल्याशिवाय राहत नाही.
-
महामारीच्या संकटाला तोंड देत असतानाच उत्तर प्रदेशसह शेजारच्या राज्यांमध्ये टोळ किड्यांनी हैदोस घातला. अचानक आलेल्या टोळधाडीनं पिकांचं प्रचंड नुकसान केलं. उभ्या पिकाचाच सत्यानाश झाल्यानंतर शेतकऱ्याच्या अश्रुंचा कडलोट झाला. उत्तर प्रदेशातील बाराबांकी जिल्ह्यातील हे दृश्य टिपत कॅमेऱ्यानं या संकटांची नोंद करून ठेवली.
-
रस्ते सामसुम. सगळे आपापल्या घरात. करोनाच्या दहशतीत लोक जगत असतानाच अरबी समुद्रात निसर्ग चक्रीवादळ उभं राहिले. या वादळाने महाराष्ट्रातील काही भागासह इतर राज्यातही धुमाकूळ घालत प्रचंड हानी केली.
-
करोनामुळे लोक कोंडली गेली. पण यानिमित्ताने अनेकांना खूप दिवसानंतर घरासाठी, घरातल्या व्यक्तींसाठी वेळ देता आला. पाच वेळा वर्ल्ड आणि एशियन चॅम्पियन ठरलेल्या मेरी कोमनेही आपल्या कुटुंबीयांसोबत वेळ घालवला.
-
माणसं कैद झाली असली, तरी निसर्गाचं चक्र संथपणे सुरूच होतं. भारताचं नंदनवन अशी ओळख असलेल्या काश्मीरात निसर्ग रंग-गंधाची उधळण सुरूच होती. श्रीनगरमधील तुलिप गार्डन यंदाही नेहमीप्रमाणेच बहरून गेलं होतं. पण, एकच उणीव होती, या फुलांना बघण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांची गर्दी मात्र, यावेळी नव्हती.
-
करोनानं फक्त दहशतच निर्माण केली नाही. तर अनेकांच्या पोरकं गेलं. अनेकांच्या घराचा आधार गेला. अनेकांना शेवटची भेट काय अत्यंदर्शनही घेता आलं नाही. काहींना दूरूनच निरोप देता आला, इतकं ह्रदय पिळवटून टाकणारं दृश्य या काळात बघायला मिळालं. करोनामुळे निधन झालेल्या व्यक्तीला अखेरचा निरोप देताना दिल्लीतील हे छायाचित्र.
-
करोनानं सगळं कोलमडून टाकलं. शाळाही अनिश्चित काळासाठी बंद झाल्या. पण हे दृश्य करोनाच्या छाताडावर पाय ठेवून पुढे जाऊ पाहणाऱ्यांसाठी आश्वासक होतं. श्रीनगरमधील ईदगाह मैदानावरच शाळा भरवण्यात आली.
-
लॉकडाउनमुळे माणसं बंदिस्त झाली. सोशल डिस्टन्सिग आलं. माणसांचं जगणं चौकटबद्ध होतं गेलं. पण, पक्षी प्राण्यांचा मात्र मुक्त संचार सुरू होता. नवी मुंबईतील खाडीत मासांहार करणाऱ्या या फ्लेमिगोंना ना सोशल डिस्टन्सिगचं बंधन होत, ना करोनाचं भय. हे दृश्य कुंभमेळ्याची आठवण करून देणारं होतं.
-
करोनानं भारतात प्रवेश केल्यानंतर सण उत्सवांवर बंधनं आली. पण, उपजिविकेसाठी मूर्तिकारांचं काम सुरूच होतं. महाराष्ट्रातील हमझापूरमध्ये गणेशमूर्ती उन्हात ठेवणारा मूर्तिकार.
-
ज्यांच्याकडे हक्काचा निवारा होता, ते लॉकडाउननंतर आपापल्या घरात राहिले. पण, जे रस्त्याच्या कडेला आयुष्य काढत आहेत, त्यांचं काय झालं करोनाकाळात? प्रचंड हाल, उपासमार आणि व्याधी. अशा त्रासदायक काळातही मदतीसाठी पुढे येणाऱ्या हातांनी त्यांना जगण्याचं बळ दिलं. पुण्यातील ससून रुग्णालयासमोर संशयित करोना रुग्णाला रुग्णालयात घेऊन जाताना आरोग्य कर्मचारी.
-
या वर्षात सगळ्यांची महत्त्वाची सवय मोडली. ती म्हणजे करमणुकीची आठवड्याच्या अखेरीस चित्रपटगृहात जाणाऱ्यांना तब्बल आठ नऊ महिने दूर राहावं लागलं. त्यानंतर सुरू झालेल्या चित्रपटगृहांमध्ये प्रेक्षकांपेक्षा नियमांचीच गर्दी जास्त झाली. दिल्लीतील वसंत कुंज चित्रपटगृहातील हे दृश्य.
-
करोनाकाळात आपल्याच माणसांपासून दूर राहावं लागलं. करोना योद्धे झालेल्या डॉक्टरांना आरोग्य कर्मचाऱ्यांना तर हॉस्पिटलमध्ये मुक्काम करावा लागला. मग कसला सण अन् काय? मग, हॉस्पिटलमध्ये या डॉक्टरांना नवी नाती मिळाली. ससून रुग्णालयात आरोग्य कर्मचाऱ्याला राखी बांधताना महिला.
-
हे छायाचित्र प्रत्येकाच्या मनात घर करुन गेलं. करोना संकटात नवरात्रोत्सव साजरा झाला, पण उत्साहाला नेहमीची झळाळी नव्हती. लॉकडाउनमुळे बंदिस्त होऊन पडलेले माणसांनी पायीच घराचे रस्ते धरले. स्थलांतरित मजुरांच्या लोंढ्यांनी रस्ते भरून वाहू लागले. अनेकजणांना प्रचंड खस्ता खाव्या लागल्या, तर अनेकजण घरी पोहोचलेच नाही. रस्त्यातच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. स्थलांतरि मजुरांच्या या व्यथा दुर्गा मूर्तीतून दिसली. यावेळी बंगालमध्ये स्थलांतरित मजुरांच्या रुपातील दुर्गा मूर्ती स्थापन करण्यात आली.
-
करोनाचा प्रसारावर नियंत्रण मिळवण्यात काही प्रमाणात यश आल्यानंतर सरकारनं हळूहळू जनजीवन पूर्वपदावर आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले. त्यातील एक महत्त्वाचा भाग म्हणजे महानगरांची जीवन वाहिनी असलेली लोकल रेल्वे सेवा सुरू करण्यात आल्या. त्यामुळे सामसुम झालेले प्लॅटफॉर्म जिवंत होऊन गर्दीने वाहू लागले. सेलदाह स्थानकावरील या गर्दीला सोशल डिस्टन्सिगचंही भान राहिलं नाही. (सर्व छायाचित्रं/इंडियन एक्सप्रेस)

India Postal Service : डोनाल्ड ट्रम्प यांच्या ५० टक्के टॅरिफनंतर भारताचं मोठं पाऊल; अमेरिकेला जाणारी ‘ही’ सेवा स्थगित करण्याची घोषणा