-
देशात करोनाचा प्रसार नियंत्रणात आला असला, तरी धोका पूर्णपणे टळलेला नाही. अजूनही १५ ते २० हजारांच्या दरम्यान दररोज नवीन रुग्णांची भर पडत आहे. त्यात आता केंद्र सरकारने दोन लसींना आपत्कालीन वापरासाठी परवानगी दिल्यानं नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे. पुढील काही दिवसांत लसी बाजारात येणार आहेत. मात्र, भारतात केवळ एक-दोन लसी तयार होत नाहीयेत. तर ९ लसींच्या निर्मितीचं काम सुरू आहे. (छायाचित्रं/इंडियन एक्स्प्रेस)
-
ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने (केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्था) सीरम इन्सिट्यूटच्या कोविशिल्ड आणि भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिन या दोन लसींना आपत्कालीन वापरासाठी परवानगी दिली. कोविशिल्ड पुढील काही आठवड्यात बाजारात येणार असल्याचंही सीरमचे सीईओ अदर पुनावाला यांनी स्पष्ट केलं आहे.
-
कोविशिल्ड व कोव्हॅक्सिनबरोबरच जवळपास नऊ लसींच्या निर्मितीचं काम भारतात सध्या सुरू आहे. काही दिवसांपूर्वीच केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन या लसींबद्दल माहिती दिली होती. यातील काही लसींच्या अंतिम टप्प्यातील चाचण्या सुरू आहेत. कोणत्या आहेत या नऊ लसी? त्याबद्दल घेतलेली माहिती…
-
यातील पहिली लस आहे कोविशिल्ड! कोविशिल्डच्या आपत्कालीन वापराचा मार्ग मोकळा झाला आहे. ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या या लसीचं पुण्यातील सीरम इन्सिट्यूटमध्ये उत्पादन सुरू आहे. काही दिवसांपूर्वीच कोविशिल्डचा आपत्कालीन वापर करण्यासाठी परवानगी देण्याची विनंती करण्यात आली होती. (छायाचित्रं/इंडियन एक्स्प्रेस)
-
दुसरी लस आहे कोव्हॅक्सिन… ही लस मृत विषाणूपासून बनवली जात आहे. ही लस हैदराबाद स्थित भारत बायोटेकने तयार केली आहे. तिसऱ्या टप्प्यातील चाचण्या सुरू असतानाच आपात्कालीन वापर करण्यासाठी अर्ज करण्यात आला होता. अखेर कोव्हॅक्सिनलाही मंजुरी मिळाली आहे.
-
ZyCoV-D कॅडिला कपंनी ही लस तयार करत आहे. कॅडिलाने बायो टेक्नॉलजी विभागाच्या सहकार्यानं ही लस तयार करण्यात काम सुरू केलं होतं. या लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचण्या पूर्णत्वाकडे आल्या आहेत.
-
स्फुटनिक व्ही… करोनावरील ही लस रशियातील गेमलाया नॅशनल सेंटरमध्ये शोधण्यात आली आहे. हैदराबादमधील डॉ. रेड्डी लॅबमध्ये या लसीचं उत्पादन केलं जात आहे. ही लसही चाचण्यांच्या तिसऱ्या टप्प्यात आहे.
-
NVX-CoV2373 -विषाणूच्या प्रोटीनच्या आधारावरून ही लस तयार करण्यात आली आहे. या लसीचं उत्पादनही पुण्यातील सीरम इन्सिट्यूटमध्ये केलं जात आहे. यासाठी सीरमने नोवावॅक्ससोबत करार केला आहे. (छायाचित्रं/इंडियन एक्स्प्रेस)
-
याचबरोबर अमेरिकेतील एमआयटीने शोधलेल्या प्रोटीन एंटीजेन बेस्ड लसीचं उत्पादनही हैदराबादमधील बायलॉजिकल ई लिमिटेड ही औषध निर्माण कंपनी करत आहे. या लसीच्या चाचण्याही प्रगतीपथावर आहेत.
-
HGCO 19 – अमेरिकेतील एचडीटी संस्था एमआरएनवर आधारित एक लस तयार करत आहे. पुणे स्थित जिनोव्हा कंपनी या लसीचं उत्पादन करत आहे. या लसीच्या प्राण्यावरील चाचण्या पूर्ण झाल्या आहेत.
-
अमेरिकेतील थॉमस जेफरस विद्यापीठाच्या सहकार्याने हैदराबादमधील भारत बायोटेक औषध निर्माण कंपनी लसी तयार करत आहे. ही लस सध्या अॅडव्हान्स्ड प्री क्लीनिकल स्तरावर आहे. (छायाचित्र/रॉयटर्स)
-
याचबरोबर ऑरोवॅक्सिन कंपनीच्या सहकार्याने भारतातील ऑरोबिंदो फार्मा ही औषध निर्माण कंपनी करोनावर एक लस तयार करत आहे. ही लस अजून विकसित होण्याच्या टप्प्यावर आहे. (छायाचित्रं/इंडियन एक्स्प्रेस)

PBKS vs MI: “बुमराहला १८ चेंडू शिल्लक असताना…”, हार्दिक पंड्याने मुंबईच्या पराभवाचं खापर नेमकं कोणावर फोडलं? सामन्यानंतर काय म्हणाला?