-
जोडप्यांमध्ये होणारे वाद हा काही नवा विषय नाहीय. असे वाद झाल्यानंतर काही दिवस अबोला असणं वगैरे सामान्य गोष्ट आहे. मात्र काही प्रकरणांमध्ये उगाच वाद घालण्याची सवय जोडप्यांना लागते आणि त्याचे गंभीर परिणाम नात्यांवर होतात. युक्रेनमध्ये राहणाऱ्या एका जोडप्यासोबत असंच काहीतरी घडतं होतं. त्यावर या जोडप्याने अगदीच हटके उपाय शोधला आहे.
-
या जोडप्याने वाद झाला तरी एकमेकांपासून आपण दूर जाऊ नये म्हणून दोघांनी आपला एक हात जोडीदाराच्या हाताशी साखळीने बांधून घेतलाय. सध्या हे जोडपं इंटरनेटवर चर्चेचा विषय ठरत आहे. एक हात जोडीदाराशी बांधून घेतल्याने दोघेही अगदी घरातील लहानसहान कामांपासून बाहेर शॉपिंगपर्यंत सर्वच गोष्टी एकत्र करतात.
-
ऑनलाइन माध्यमातून गाड्यांची विक्री करण्याचा व्यवसाय करणारा अॅलेक्सझॅण्डर कडले आणि मेकअप आर्टीस्ट असणाऱ्या व्हिक्टोरिया पुस्तोवितोवा हे दोघे मागील काही वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत.
-
मात्र काही काळापासून अॅलेक्सझॅण्डर आणि व्हिक्टोरियामधील वाद अचानक वाढल्याचे त्यांना जाणवलं. त्यामुळे आपलं नात टिकवण्यासाठी त्यांनी एकमेकांना धातूच्या साखळीने मदतीने बांधून घेतलं.
-
अॅलेक्सझॅण्डर आणि व्हिक्टोरिया दोघेही आपलं नातं टिकवण्यासाठी आम्ही करत असलेला हा एक प्रयोग असल्याचं सांगतात. या दोघांना सोशल नेटवर्किंगवरही प्रचंड लोकप्रियता मिळाली असून त्यांच्या फॉलोअर्सची संख्या दिवसोंदिवस वाढत असल्याचे रॉयटर्सला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी म्हटलं आहे.
-
आम्हाला आता असं रहायची हळूहळू सवय होऊ लगली आहे असं अॅलेक्सझॅण्डर सांगतो. व्हिक्टोरियाने ब्रेकअप करण्यासंदर्भात चर्चा केली तेव्हा अॅलेक्सझॅण्डरला साखळीने एकमेकांचा हात बांधून घेण्यासंदर्भातील कल्पना सुचली.
-
एकदा भांडणादरम्यान अॅलेक्सझॅण्डरने व्हिक्टोरियाला मी तुला कायमचा माझ्यासोबत बांधून ठेवेन म्हणजे तुला ब्रेकअप शक्यच होणार नाही असं म्हटलं आणि त्यातूनच त्याला ही कल्पना सुचली.
-
पहिल्यांदा अॅलेक्सझॅण्डरची कल्पना ऐकल्यावर व्हिक्टोरियाने नकार दिला होता. मात्र नंतर तिने हा साखळी बांधण्याचा प्रयोग करुन बघुयात म्हणत या गोष्टीला परवानगी दिली.
-
आम्ही आठवड्यात किमान एकदा तर जास्तीत जास्त दोन तीन वेळा वाद करुन तो वाद अगदी ब्रेकअपच्या चर्चांपर्यंत जाईल एवढं भांडायचो असं अॅलेक्सझॅण्डर सांगतो.
-
आता या दोघांना खासगी वेळ फारसा मिळत नाही. कारण हात बांधलेले असल्याने ते एकमेकांसोबतच असतात.
-
अगदी बाजारामध्ये सामान विकत घेण्यापासून ते घरुन काम करताना ब्रेक घेण्यापर्यंत साऱ्या गोष्टी ते एकत्रच करतात.
-
अॅलेक्सझॅण्डर आणि व्हिक्टोरियाने हा प्रयोग व्हॅलेंटाइन्स डेपासून सुरु केलाय. अॅलेक्सझॅण्डर ३३ वर्षांचा असून व्हिक्टोरिया २८ वर्षांची आहे.
-
जोडीदारासोबत साखळीने हात बांधून जगतानाचे अनुभव या दोघांनी सोशल मीडिया आणि एका डॉक्युमेंट्रीच्या माध्यमातून शेअर केले आहेत.
-
या प्रयोगाला एक महिना होत आला असून आमच्यातील वाद कमी झालेले नाहीत असं अॅलेक्सझॅण्डर सांगतो. आम्ही आजही आधीसारखे वाद घालतो. मात्र त्यानंतर एकमेकांपासून दूर जाण्यापेक्षा काही काळ शांत बसतो आणि पुन्हा एकमेकांशी बोलू लागतो असं अॅलेक्सझॅण्डर या प्रयोगाच्या फायद्याबद्दल बोलताना सांगतो.
-
अॅलेक्सझॅण्डर आणि व्हिक्टोरिया हे दोघेही मागील एका महिन्यापासून साखळी बांधून एकमेकांसोबत राहत आहेत. आणि हा प्रयोग आणखीन दोन महिने सुरु ठेवण्याचा त्यांचा मानस आहे. (सर्व फोटो रॉयटर्स आणि युट्यूबवरील Newzee चॅनेलवरील व्हिडीओवरुन साभार)

हार्दिक पंड्याने ८ वर्षांनी मोठ्या बॉलीवूड अभिनेत्रीला केलंय डेट? तिने अनेक वर्षांनी सोडलं मौन; म्हणाली, “हो आम्ही काही महिने…”