बिपीन देशपांडे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

औरंगाबाद : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटातील कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या विरोधात मित्र पक्ष भाजपनेच आता उघडली आहे. सत्तार यांच्या अधिपत्याखालील सिल्लोड नगरपालिकेच्या कारभाराच्या विरोधात भाजपने आंदोलन केले असले तरी हा सत्तार यांनाच मोठा शह असल्याचे मानले जाते.

नगरपालिकेने अवाजवी करवाढ प्रस्तावित केल्याच्या आडून सिल्लोडमध्ये सोमवारी भाजपने केलेले आंदोलन हे राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांना त्यांच्या बालेकिल्ल्यातच हादरे देण्यासाठी उघडलेला मोर्चा मानला जात आहे. सत्तार हे एकनाथ शिंदे – देवेंद्र फडणवीस मंत्रिमंडळात कॅबिनेटमंत्री झाल्यापासून सिल्लोडमध्ये तोळामासा संख्येने असलेल्या भाजपकडून करण्यात आलेले हे दुसरे आंदोलन आहे. त्यामुळे शिंदे गटातील नेत्यांविरोधात जनभावना निर्माण करण्यात भाजप अग्रेसर असल्याचे चित्र राजकीय पटलावर निर्माण झाले आहे.

हेही वाचा… कायद्यानुसार सत्यजित तांबे यांना अपक्षच राहावे लागणार

सिल्लोड नगरपालिकेवर अब्दुल सत्तार यांचे मागील २५ वर्षांपासून वर्चस्व आहे. सिल्लोड पालिकेतील एकूण २६ नगरसेवकांपैकी २४ नगरसेवक हे सत्तारांच्या गटाचे आहेत. उपनगराध्यक्षपदी सत्तार यांचे चिरंजीव अब्दुल समीर अब्दुल सत्तार हे असून राजश्री निकम या नगराध्यक्ष आहेत. तर सत्तारांच्या गटाव्यतिरिक्त इतर नगरसेवक असलेल्या दोन्ही नगरसेविका या भाजपच्या आहेत. सिल्लोड विधानसभा मतदार संघ जालना लोकसभेत येत असून केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे हे येथून सलग पाचवेळा निवडून येत प्रतिनिधीत्व करत आहेत. त्यानुषंगाने पाहिले तर सिल्लोडमधील भाजपची दोन ही नगरसेवक संख्या तोळामासाच मानली जाते. त्यातही दोन्ही नगरसेविका या महिलाच आहेत.

हेही वाचा… नागपूरमधील विजयानंतर काँग्रेसच्या विविध गटांमध्ये स्पर्धा

सत्तार हे कॅबिनेटमंत्री झाल्यानंतर भाजप नगरसेविका रूपाली मोरेलू यांनी हिंदू स्मशानभूमीसाठी जागा उपलब्ध करून द्यावी, या मागणीच्या आडून आंदोलन केले होते. सिल्लोडमध्ये सोमवारी केलेल्या आंदोलनाबाबत भाजपच्या किसान मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस मकरंद कोरडे यांनी नगरपालिकेने भांडवली व भाडे मूल्यांच्या आधारे दोन प्रकारे केलेली करवाढ कित्येकपटीने असून अवाजवी आणि अवास्तवही असल्याचा आरोप केला आहे. नगरपालिकेच्या करवाढी विरोधात भाजपने २६ जानेवारी रोजी उपविभागीय अधिकारी कुलदीप जंगम यांना निवेदन दिले होते. निवेदनानुसार करवाढ मागे घेतली नाही तर ६ फेब्रुवारी रोजी आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला होता. त्यानुसार सोमवारी भाजपकडून आंदोलन करण्यात आल्याचे कोरडे यांनी सांगितले. सिल्लोड पालिकेचे १९९२-९३ पासूनचे राजकारण पाहिले असता २५ वर्षापासून अब्दुल सत्तार यांची एक हाती वर्चस्व आहे. मधल्या काळामध्ये शंकरलाल शंकरपल्ली, पांडुरंग दुधे व बने खाँ पठाण यांचा अपवाद वगळता अब्दुल सत्तार यांचेच वर्चस्व आहे. सिल्लोड नगरपालिकेसह पंचायत समिती गण व जिल्हा परिषद गटातूनही त्यांचे समर्थकच निवडून येत असल्याने सत्तार यांचे त्यांच्या मतदार संघात वर्चस्व कायम असले तरी अलीकडच्या काळामध्ये हिंदुत्व भावना टोकदार करण्याच्या रणनीतीचा भाग म्हणून भाजपने सिल्लोडमध्ये सत्तारांच्या विरोधात दंड थोपटल्याचे दिसत आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp is aggressive against minister abdul sattar of eknath shinde group print politics news asj
First published on: 07-02-2023 at 13:38 IST