जळगाव – जिल्ह्यात लोकसभेनंतर विधानसभेच्या निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांमध्ये यशाची मालिका कायम ठेवण्यासाठी सत्ताधारी महायुतीचे तिन्ही घटक पक्ष सज्ज झाले असताना, तुलनेत महाविकास आघाडीत कमालीचे नैराश्य पसरले होते. मात्र, उशिरा का होईना विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेसकडून (शरद पवार) पराभवाने खचलेल्या कार्यकर्त्यांना उभारी देण्यासाठी आता पक्ष निरीक्षकांच्या उपस्थितीत बैठकांचा सपाटा सुरू करण्यात आला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

लोकसभेच्या निवडणुकीत रावेर आणि जळगाव या दोन्ही जागा जिंकल्यानंतर, विधानसभेच्या निवडणुकीतही सर्व ११ जागा जिंकत महायुतीने जळगाव जिल्ह्यावरील निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना सामोरे जाणाऱ्या महायुतीच्या तिन्ही घटक पक्षांचा आत्मविश्वास त्यामुळे वाढलेला असताना, तुलनेत महाविकास आघाडीमध्ये कमालीची मरगळ दिसत होती. काँग्रेससह राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) तसेच शिवसेनेच्या (उद्धव ठाकरे) कोणत्याच मोठ्या नेत्याने जिल्ह्यास भेट देऊन पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांना हिंमत देण्याचे काम विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर केले नव्हते. यथावकाश ठाकरे गटाने विधानसभेच्या निवडणुकीपासून रखडलेला जिल्हाप्रमुखांच्या नियुक्तीचा विषय कुलभूषण पाटील यांच्याकडे पदभार सोपवत एकदाचा मार्गी लावला. त्यामुळे ठाकरे गटात पुन्हा एकदा चैतन्य निर्माण झाले आहे.

दुसरीकडे, शरद पवार गटानेही आता हालचालींना वेग दिला आहे. त्यासाठी पक्षाचे निरीक्षक भास्करराव काळे आणि जिल्हाध्यक्ष प्रमोद पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत तालुकास्तर कार्यकारिणीच्या आढावा बैठकांचे आयोजन केले जात आहे. त्यामाध्यमातून जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपालिकांच्या आगामी निवडणुकांसाठी राष्ट्रवादीच्या रणनितीकडे लक्ष वेधण्यात येत आहे. तुमच्या मागे पक्षाची ताकद असल्याचे सांगून पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांना पुन्हा नव्याने उभे राहण्याची हिंमत देण्यात येत आहे. याशिवाय बैठका संपल्यानंतर शासनासह जनतेचे लक्ष वेधण्यासाठी शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासह भारतीय कापूस महामंडळाच्या केंद्रांवर सर्व शेतकऱ्यांचा कापूस तसेच हमीभावाने तूर, हरभरा, ज्वारीची खरेदी केंद्रे तात्काळ सुरू करण्याची मागणी तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे केली जात आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sharad pawar group attempt to strengthen party workers in jalgaon print politics news ssb