नाशिक – जवळपास सहा महिन्यांच्या प्रतिक्षेनंतर राज्याच्या मंत्रिमंडळात अखेर राष्ट्रवादीचे (अजित पवार) ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांचा समावेश झाला. त्यामुळे पक्षाचे प्रमुख तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी निर्माण झालेला त्यांचा दुरावा कमी होईल का, याची चर्चा पक्षाच्या वर्तुळात आहे. मंत्रिमंडळातून डावलल्यानंतर पक्ष नेतृत्वाविरोधात आक्रमक भूमिका घेणाऱ्या भुजबळांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर मात्र मवाळ आणि पक्षाशी जुळवून घेण्याची भूमिका घेतली. भुजबळ यांच्या मंत्रिमंडळातील समावेशाने अजित पवार गटाचे एकट्या नाशिक जिल्ह्यात तीन मंत्री झाले आहेत.
राष्ट्रवादी दुभंगल्यानंतर शरद पवार यांची साथ सोडून अजितदादांच्या गटात सामील झालेल्या भुजबळांना लोकसभा निवडणुकीपासून कोंडीला सामोरे जावे लागले. तेव्हा राज्यात मराठा-ओबीसी वाद धुमसत होता. भाजपच्या शीर्षस्थ नेत्यांनी सूचवूनही नाशिक लोकसभा मतदारसंघात त्यांना उमेदवारी मिळाली नाही. शिवसेनेने (एकनाथ शिंदे) ही जागा सोडली नाही. परंतु, राष्ट्रवादीच्या (अजित पवार) नेतृत्वाने ऐनवेळी कच खाल्याची भुजबळांची भावना होती. विधानसभा निवडणुकीनंतर अजित पवार यांनी भुजबळांचा मंत्रिपदासाठी विचार केला नव्हता. त्यामुळे नागपूर अधिवेशन अर्ध्यावर सोडून त्यांनी नाशिक गाठले होते. अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या माध्यमातून शक्ती प्रदर्शनही केले होते.
या काळात भुजबळ यांनी पक्षाचे प्रमुख अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल या वरिष्ठ नेत्यांवर आगपाखड करीत भाजपशी जवळीक साधली. पक्षनेतृत्वाने आपली अवहेलना केली, राज्यसभेवेळी संधी डावलली, अशा शब्दांत त्यांनी रोष प्रगट केला होता. अजित पवार गटाच्या शिर्डी येथील अधिवेशनात त्यांनी पक्षात एकाधिकारशाही झाली असून आपण स्पष्ट बोलल्याची शिक्षा मिळाल्याचे जाहीरपणे म्हटले होते. या घटनाक्रमाने पक्षात एकाकी पडलेले भुजबळ भाजपमध्ये प्रवेश करतील, अशी अटकळ बांधली जात होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही त्यांनी भेट घेतली होती. त्यावेळी फडणवीस यांनी त्यांना सबुरीचा सल्ला दिला होता. धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त जागी आपणास संधी मिळू शकेल, याची जाणीव झाल्याने त्यांनी मवाळ धोरण स्वीकारत मोर्चेबांधणीला सुरुवात केली. राज्याच्या अर्थसंकल्पावरून उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांचे कौतुक करुन सर्वांना बुचकळ्यात टाकले होते.
मंत्रिमंडळाच्या पहिल्या विस्तारात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आपल्या मंत्रीपदासाठी आग्रही होते. त्यांनी सांगूनही पक्षनेतृत्वाने डावलल्याचे भुजबळांनी म्हटले होते. यामुळे नव्याने मंत्रिमंडळात समावेश होताना नेमकी कोणाची भूमिका महत्वाची ठरली, यावर महायुतीच्या वर्तुळात चर्चा होत आहे.