उमेदवारी अर्ज मागे घेणार का? प्रश्न विचारताच अभिजित बिचुकले भकडले; म्हणाले, "मी राज ठाकरेंपेक्षा..." | abhijeet bichukale filed nomination for kasba peth byelection said aggressive than raj thackeray | Loksatta

उमेदवारी अर्ज मागे घेणार का? प्रश्न विचारताच अभिजित बिचुकले भडकले; म्हणाले, “मी राज ठाकरेंपेक्षा…”

कसबा पेठ जागेसाठी बिग बॉस फेम अभिजित बिचुकले यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

ABHIJEET BICHUKALE AND RAJ THACKERAY
अभिजित बिचुकले, राज ठाकरे (फोटो- लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

कसबा पेठ आणि चिंचवड पोटनिवडणुकीकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. आज या जागांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता. दरम्यान, कसबा पेठ जागेसाठी बिग बॉस फेम अभिजित बिचुकले यांनीदेखील आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर त्यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यापेक्षा जहरिला आहे, असे विधान केले आहे. ते ‘टीव्ही ९ मराठी’शी बोलत होते.

माझ्या रुपात एक चांगला उमेदवार मिळत आहे

“मी जोपर्यंत संसदेत, विधानभवनात जात नाही, तोपर्यंत मला निवडणूक लढणे भाग आहे. आतापर्यंत जे लोक विधानभवन, संसदेत गेले त्यांनी काय दिवे लावले. मला लोक चुकत आहेत की नेते चुकत आहेत, हेच समजत नाही. माझ्या रुपात एक चांगला उमेदवार मिळत आहे. मग मी विधानभवन, संसदेत का जात नाही. कसब्याची पोटनिवडणूक लागली आहे. मी आदित्य ठाकरे यांनादेखील विरोध केलेला आहे,” असे बिचुकले म्हणाले.

हेही वाचा >>> चिंचवडमधील अपक्ष उमेदवार राजू काळेंची चर्चा, डिपॉझिटसाठी आणली १० हजारांची चिल्लर; रक्कम मोजताना अधिकाऱ्यांची दमछाक!

पूर्वी भाजपामध्ये फक्त अटल बिहारी वाजपेयी निवडून यायचे

“मी कसब्यामध्ये राहतो. माझे सध्या येथे मिठाईचे दुकान आहे. मी येथे दोन वर्षे राहात आहे. मग येथील लोकांचे प्रश्न माझे नाहीत का. कसब्याला सजवायला मी येत आहे. पूर्वी भाजपामध्ये अटल बिहारी वाजपेयी यांच्याशिवाय कोणी निवडून येत होते का? काँग्रेसचाही एक काळ होता. आता काँग्रेस नेस्तनाबूत झाला आहे. भाजपाला अगोदर कोणी विचारत नव्हते,” असेही बिचुकले म्हणाले.

अलंकृता बिचाकुले होणार महाराष्ट्रातील पहिल्या मुख्यमंत्री

“येणाऱ्या काळात महाराष्ट्राचे नेतृत्व १०० टक्के अभिजित बिचकुलेच करणार आहे. महाराष्ट्राची पहिल्या महिला मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवार कोणत्याही पुरुषाने जाहीर केलेल्या नाहीत. त्यामुळे मी अलंकृता बिचाकुले यांना महाराष्ट्रातील पहिल्या मुख्यमंत्री करण्याचे ठरवलेले आहे. मी जे ठरवतो ते करतोच,” असे बिचुकले यांनी सांगितले.

हेही वाचा >>> बाळासाहेब थोरातांनी राजीनामा दिला नाही? सुशीलकुमार शिंदेंच्या विधानानंतर संभ्रम वाढला; म्हणाले “राजीनामा आहे की…”

उमेदवार कसा हवा, हे लोकांनी ठरवायला हवे

“मी उभा राहिलेलो आहे. विषय संपलेला आहे. रणनीती काय असणार आहे. उमेदवार कसा हवा, हे लोकांनी ठरवायला हवे. भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत, असे मी मानतो. आतापर्यंत येथून जे निवडून गेले त्यांची रणनीती काय राहिलेली आहे. फक्त पैसे कमवण्याची त्यांची रणनीती आहे,” असे म्हणत त्यांनी लोकप्रतिनिधींवर टीका केली.

मी कधीही माघार घेत नाही, राजकारणात काहीही होऊ शकतं

उमेदवारी अर्ज मागे घेणार का? असा प्रश्न बिचुकले यांना विचारण्यता आला. यावर बोलताना “मी याआधीही कधी उमेदवारी अर्ज मागे घेतलेला नाही. कोणतेही प्रश्न विचारू नयेत. राज ठाकरेही चिडतात. राज ठाकरे माझा दादा आहे. अभिजित बिचुकले त्यांच्यापेक्षा जहरिला आहे. मी कधीही माघार घेत नाही. राजकारणात काहीही होऊ शकतं. माझा पाच नीतींचा अभ्यास आहे,” अशी प्रतिक्रिया बिचुकले यांनी दिली.

हेही वाचा >>> बाळासाहेब थोरातांच्या राजीनाम्यानंतर अशोक चव्हाण ॲक्शन मोडमध्ये, मनधरणी करण्याचा प्रयत्न करणार; म्हणाले, “थोरात पक्ष सोडून…”

मी एक सेलिब्रिटी आहे

दरम्यान, शेवटी बोलताना “माझे आदर्श लोकमान्य टिळक, छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे माझे आदर्श आहेत. माझ्या घरच्यांनी माझी पाचही बोटं तुपात ठेवली होती. मी एक सेलिब्रिटी आहे. लोकांना काय वाटेल याच्याशी मला देणेघेणे नाही. समाजामध्ये जन्माला आल्यानंतर आपण त्यांच्यासाठी काहितरी केले पाहिजे, या मताचा मी आहे,” असेही बिचकुले म्हणाले.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 07-02-2023 at 20:14 IST
Next Story
चिंचवडमधील अपक्ष उमेदवार राजू काळेंची चर्चा, डिपॉझिटसाठी आणली १० हजारांची चिल्लर; रक्कम मोजताना अधिकाऱ्यांची दमछाक!