scorecardresearch

बाळासाहेब थोरातांनी राजीनामा दिला नाही? सुशीलकुमार शिंदेंच्या विधानानंतर संभ्रम वाढला; म्हणाले “राजीनामा आहे की…”

काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेस पक्षाच्या विधिमंडळ नेतेपदाचा राजीनामा दिल्यानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

SUSHILKUMAR SHINDE AND BALASAHEB THORAT
सुशीलकुमार शिंदे, बाळासाहेब थोरात (फोटो- लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेस पक्षाच्या विधिमंडळ नेतेपदाचा राजीनामा दिल्यानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये थोरात यांचे भाचे तथा अपक्ष आमदार सत्यजीत तांबे यांना डावलण्याचा प्रयत्न झाल्यानंतर त्यांनी हा निर्णय घेतला आहे. दरम्यान थोरात यांनी आपल्या राजीनाम्याचे पत्र थेट दिल्लीला पाठवल्याचे म्हटले जात आहे. यावरच आता काँग्रेसचे वरिष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे. थोरात यांनी दिल्लीला पाठवलेले साधे पत्र आहे की राजीनामा आहे, हे अद्याप माहिती नाही; असे शिंदे म्हणाले आहेत.

हेही वाचा >>> ‘गौतम अदाणींकडून २० वर्षांत भाजपाला किती रुपये?’ राहुल गांधींचा सवाल; मोदींचा उल्लेख करत म्हणाले, “अगोदर…”

पटोले यांनादेखील याबाबत माहिती नाही

“बाळासाहेब थोरातांचा विधीमंडळ पक्षनेतेपदाचा राजीनामा आहे की पत्र आहे, हे अजून माहिती नाहीये. त्यांचे कोणाशी बोलणे झालेले नाही. मी काल प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंसोबत पुण्यात होतो. पटोले यांनादेखील याबाबत माहिती नाही,” असे सुशील कुमार शिंदे म्हणाले. तसेच, हे सर्व वाद तात्पुरते असतात सगळं ठीक होईल. काळजी करण्याचं कारण नाही, असा विश्वासही शिंदे यांनी व्यक्त केला.

हेही वाचा >>>बाळासाहेब थोरातांच्या राजीनाम्यानंतर अशोक चव्हाण ॲक्शन मोडमध्ये, मनधरणी करण्याचा प्रयत्न करणार; म्हणाले, “थोरात पक्ष सोडून…”

काँग्रेस पक्षासाठी शक्य ते सर्वकाही करेन

काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी थोरात यांच्या राजीनामा प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. ‘थोरातांनी राजीनामा देणे हे दुर्दैवी आहे. मी त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न करेन. काँग्रेस पक्षासाठी शक्य ते सर्वकाही करेन, असे चव्हाण म्हणाले. तसेच विरोधी पक्षनेते तथा राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी थोरात यांनी राजीनामा दिल्याचे सांगितले. माझी आणि थोरात यांची फोनवरून चर्चा झाली आहे. त्यांनी मला राजीनामा दिल्याचे सांगितले आहे, अशी माहिती अजित पवार यांनी दिली.

बाळासाहेब थोरात यांचा राजीनामा आमच्यापर्यंत आलेला नाही

दरम्यान, बाळासाहेब थोरात यांच्या राजीनाम्यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आमचा हा पक्षांतर्गत प्रश्न आहे. बाळासाहेब थोरात यांचा राजीनामा आमच्यापर्यंत आलेला नाही. थोरात आमच्याशी बोलत नाहीतेय, अशी माहिती नाना पटोले यांनी दिली.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 07-02-2023 at 17:00 IST