महाविकास आघाडी सरकारची स्थिती दोलायमान असतानाच्या गेल्या आठ दिवसांच्या कालावधीत जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून काहीशे कोटींच्या कामांना ऐनवेळी मंजुरी घेतल्याचे समोर आले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जिल्हा नियोजन विभागाने जिल्हा परिषदेच्या पत्रावर ही कामे मंजूर केल्याने ही कामे नव्या सरकारकडून स्थगित होण्याची शक्यता आहे.
जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेमध्ये कामांचे आराखडे मंजूर केल्यानंतर त्याची शिफारस जिल्हा नियोजन समितीला केली जाते. मात्र, गेल्या आठ दिवसांत याद्या तयार करून काहीशे कोटींची कामे ऐनवेळी मंजूर केल्याचे समोर आले आहे. यामध्ये जनसुविधा आणि नागरी सुविधांची १२५ कोटींची १८०० पेक्षा जास्त कामे असल्याची माहिती मिळत आहे. याशिवाय ग्रामीण रस्ते योजना आणि इतर जिल्हा मार्ग यांची ८० कोटींपेक्षा जास्त खर्चाची कामे आहेत. या कामांना मंजुरी देताना जिल्हा नियोजन विभागाकडून केवळ जिल्हा परिषदेच्या एका पत्राचा दाखला देण्यात येत आहे. याबाबत जिल्हा नियोजन अधिकारी संजय मरकळे यांच्या मोबाइलवर संपर्क करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनी फोन घेतला नाही. तसेच त्यांना केलेल्या लघुसंदेशाला उत्तर दिले नाही.
दरम्यान, महाविकास आघाडी सरकारमध्ये अजित पवार हे उपमुख्यमंत्री, आंबेगाव तालुक्याचे दिलीप वळसे पाटील गृहमंत्री, तर इंदापूरचे दत्तात्रय भरणे हे राज्यमंत्री म्हणून कार्यरत होते. या तीन मंत्र्यांच्या माध्यमातूनच ऐनवेळी कामांना मंजुरी घेतल्याची चर्चा सध्या जिल्ह्यात आणि प्रशासनात आहे.