पुणे : तिथीनुसार सोमवारी (१७ मार्च) किल्ले शिवनेरीवर साजऱ्या होत असलेल्या शिवजयंतीच्या तयारीसाठी रविवारी गडावर आलेल्या शिवभक्तांवर मधमाशांनी हल्ला केला. मधमाशांनी घेतलेल्या चाव्यामध्ये ४७ जण जखमी झाले. पर्यटनासाठी गेलेल्या काही तरुणांनी पोळ्यावर दगड मारल्याने चवताळलेल्या मधमाशांनी पर्यटकांवर हल्ला केला असावा. तर, शिवज्योत घेऊन जाणाऱ्या शिवभक्तांच्या हातातील मशालीच्या धुरामुळे माशा सैरभैर झाल्याने अनेकांवर हल्ला केला, अशी चर्चा सुरू झाली. शिवाई देवी मंदिराकडे जाणाऱ्या मार्गावर सकाळी नऊच्या सुमारास ही घटना घडली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वनविभाग, पुरातत्व विभागाचे कर्मचारी, जुन्नर रेस्क्यू टीमचे सदस्य यांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना जुन्नरच्या छत्रपती शिवाजी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकारी डॉ. जाहीद हसन यांनी जखमींवर उपचार केले. ४७ पैकी दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.

खासदार नीलेश लंके प्रतिष्ठानच्या वतीने किल्ले स्वच्छतेचे नियोजन करण्यात आले होते. त्यासाठी उपस्थित असलेल्या लंके यांनीही   रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली. जखमींमध्ये घाटकोपर, राहुरी, रत्नागिरी, रायगड, खडकवासला, धुळे, ठाणे आणि मुंबईतील पर्यटकांचा समावेश होता. मधमाशांच्या हल्ल्याची माहिती मिळाल्यावर वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप चव्हाण हे वन कर्मचाऱ्यांच्या पथकासह आणि पुरातत्व विभागाचे गोकुळ दाभाडे हे त्यांच्या पथकासह जखमींच्या मदतीसाठी पुढे आले.

मधमाशांचा हल्ला कशामुळे?

– अगरबत्ती, धूप, अत्तर, सौंदर्यप्रसाधनांच्या उग्र वासामुळे मधमाशा आकर्षित होतात.

– पोळे असलेल्या परिसरात मोठा गोंगाट करण्याचे प्रकार घडतात.

– पोळ्याजवळ सिगारेट ओढल्याने मधमाशा त्रस्त होतात.

– मधमाशांना दगड मारून डिवचले जाते.

– अनेकदा पोळ्याजवळ शेकोटी, चूल पेटविली जाते.

– पोळ्याजवळ जाऊन सेल्फी स्टिकने छायाचित्र टिपण्याचा त्रास होताे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bees attack tourists at shivneri fort pune print news vvk 10 amy