“चिंचवड हा भाजपाचा बालेकिल्ला आहे. तिथे भाजपा निर्विवाद विजयी होईल. दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांचे अपूर्ण स्वप्न पूर्ण करण्यासाठी अश्विनी जगताप यांना मतदार निवडून देतील,” असा विश्वास भाजपा मंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गिरीश महाजन यांनी आज दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पिंपळे गुरव येथील निवासस्थानी येऊन भेट घेतली. भाजपा कसबा पेठ आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी आग्रही आहे, असे देखील त्यांनी यावेळी नमूद केले. ते पिंपरी-चिंचवडमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते. 

हेही वाचा – चिंचवड पोटनिवडणूक : “मला दीर शंकर जगताप मुलासारखे, आमच्या कुटुंबात वाद नाही”, अश्विनी जगताप यांची प्रतिक्रिया

हेही वाचा – कसबा पेठ पोटनिवडणूक : हेमंत रासने यांनी घेतली शैलेश टिळक यांची भेट

गिरीश महाजन म्हणाले की, तिकीट जाहीर झाल्याने अश्विनी जगताप यांना भेटायला आलो. चिंचवड हा भाजपाचा बालेकिल्ला आहे. भाजपाचा विजय नक्की होईल, यात काही शंका नाही. दिवंगत लक्ष्मण जगताप यांचे अपूर्ण काम आणि अपूर्ण स्वप्न हे पूर्ण करण्यासाठी मतदार त्यांच्या पत्नीला निवडून देतील. शंकर जगताप यांच्याशी माझी तीन- चार वेळेस भेट झाली. जगताप कुटुंबात कुठलाही संघर्ष नाही. दिवंगत लक्ष्मण जगताप होते तसेच अजून हे कुटुंब आहे. उलट शंकर जगताप यांची जबाबदारी वाढलेली आहे. त्यांच्या हातात निवडणुकीची धुरा दिलेली आहे. हे सर्व जण जोरात प्रचाराला लागतील. दरम्यान, बिनविरोध निवडणूक होण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. ही महाराष्ट्राची प्रथा, परंपरा आहे. मुंबई ची जागा आम्ही बिनविरोध दिली. तिथे, आमचा उमेदवार उभा केला नव्हता. ही परंपरा विरोधकांनी जोपासली पाहिजे. काही ठिकाणी अपवाद आहेत. इथं बिनविरोध व्हायला हवी असे मत गिरीश महाजन यांनी व्यक्त केले. 

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chinchwad is bjp stronghold ashwini jagtap victory is certain says girish mahajan in pune kjp