पुणे जिल्ह्यात दोन ठिकाणी घडलेल्या घटनांमध्ये नऊ जणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. यात चार विद्यार्थ्यांचा, तर पाच महिलांचा समावेश आहे. या घटनेमुळे पुणे जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. पुण्याच्या चासकमान आणि भाटघर धरणात या दोन्ही घटना घडल्या आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रितीन डी. डी, नव्या भोसले, परीक्षित आगरवाल आणि तनिष्का देसाई अशी चासकमान धरणात बुडून मृत्यू झालेल्या विद्यार्थ्यांची नावे आहेत. भाटघर धरणात बुडून मृत्यू होणाऱ्यांमध्ये खुशबू संतोष रजपूत (वय १९), मनिषा लखन रजपूत (वय २०), चांदणी शक्ती राजपूत (वय २१), पूनम संदीप रजपूत (वय २२, तिघी राहणार हडपसर), मोनिका रोहित चव्हाण (वय २३, रा. नऱ्हे) यांचा समावेश आहे.

रितीन डीडी, नव्या भोसले, परिक्षित आगरवाल आणि तनिष्का देसाई हे सर्व जण परराज्यातून शिक्षणासाठी आले होते. गुंडाळवाडी परिसरात गुरुवारी दुपारी साडेचारच्या सुमारास ही घटना घडली. यानंतर सायंकाळी साडेपाचच्या सुमारास हा लक्षात समोर आला. या घटनेनंतर चौघांचेही मृतदेह धरणातून बाहेर काढण्यात आले.

चासकमान धरणालगतच्या बुरसेवाडी हद्दीत कृष्णामूर्ती फाउंडेशनची सह्याद्री इंटरनॅशनल स्कूल ही निवासी शाळा आहे. या शाळेला शुक्रवारपासून (२० मे) सुटी लागणार असल्याने शिक्षकांसह ३४ विद्यार्थी सायंकाळी साडेचार वाजता चासकमान धरणाजवळ गेले आणि पाण्यात उतरले. शिक्षकांच्या म्हणण्यानुसार काही विद्यार्थी कमरेइतपत पाण्यात उभे असताना एक मोठी लाट आली आणि त्यात सहा ते सात विद्यार्थी लाटेसोबत पाण्यात ओढले गेल्याने बुडाले.

यावेळी शिक्षकांनी त्यातील काही मुलांना पाण्यातून बाहेर काढले. मात्र, चौघे पाण्यात बुडाले. ग्रामस्थांच्या मदतीने चारही मुलांना पाण्यातून बाहेर काढण्यात आले. उपचारासाठी त्यांना चाकण येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच चौघांचाही मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. रात्री उशिरापर्यंत पंचनामा करण्याचे काम सुरू होते.

दुसऱ्या घटनेमध्ये नऱ्हे गाव हद्दीतील (ता. भोर) पाच युवतींचा भाटघर धरणामध्ये बुडून मृत्यू झाला. लंकेश रजपूत (वय १९, रा. बावनधन), मनीषा लखन रजपूत (वय २०), चांदणी शक्ती रजपूत (वय २१), पूनम संदीप रजपूत (वय २२, तिघीही रा. संतोषनगर, हडपसर) आणि मोनिका रोहित चव्हाण (वय २३ रा. नऱ्हे) अशी या पाच जणींची नावे आहेत.

नऱ्हे येथील मोनिका चव्हाण हिच्याकडे तिच्या नातेवाईक असलेल्या खुशबू, मनीषा, चांदणी, पूनम आल्या होत्या. भाटघर धरणावर फिरण्यासाठी गेल्या असताना दुपारी बाराच्या सुमारास त्या धरणात पोहण्यासाठी उतरल्या. मात्र, पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने पाच जणी पाण्यात बुडाल्या. दुपारच्या वेळी त्याठिकाणी कोणीही नसल्याने ही घटना समजू शकली नाही. सायंकाळी पाच वाजता एक जण धरणावर गेला असता हा प्रकार उघडकीस आला.

हेही वाचा : तलावात बुडणाऱ्या मुलाला वाचवण्याचा वडिलांचा प्रयत्न, जालन्यात पिता-पुत्राचा बुडून मृत्यू

प्रांताधिकारी राजेंद्र कचरे, तहसीलदार सचिन पाटील, राजगडचे पोलीस निरीक्षक सचिन पाटील, साहाय्यक पोलीस निरीक्षक मनोजकुमार नवसरे, नितीन खामगळ हे सहकाऱ्यांसमवेत घटनास्थळी दाखल झाले. सह्याद्री सर्च अँड रेस्क्यू फोर्सच्या जवानांनी शोधकार्य सुरू केले. दरम्यान, रात्री उशिरापर्यंत खूशबु, चांदणी, पूनम आणि मोनिका या चौघींचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले असून मनीषाचा शोध सुरू आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nine people died by drowning while swimming in chaskaman and bhatghar dam pune kjp pbs
First published on: 19-05-2022 at 22:31 IST