पुणे : येरवडा परिसरातील लक्ष्मीनगर परिसरात १२ रिक्षा आणि दोन दुचाकींची तोडफोड करणाऱ्या सराइताला येरवडा पोलिसांनी अटक केली. ज्या भागात गुंडाने वाहनांची तोडफोड केली. त्याच भागात पोलिसांनी त्याची धिंड काढली. सयाजी संभाजी डोलारे (वय २३, रा. लक्ष्मीनगर, येरवडा) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. डोलारेने सहा फेब्रुवारी रोजी येरवड्यातील लक्ष्मीनगर भागात मध्यरात्री १२ रिक्षा आणि दाेन दुचाकींची तोडफोड केली होती. या भागातील एका जेसीबी यंत्राच्या काचेवर दगडफेक केली होती. तोडफोड करुन तो पसार होण्याच्या तयारीत होता. त्या वेळी एका रहिवाशाने त्याला अडविले. डाेलारेने त्याच्याकडील तीक्ष्ण शस्त्राने रहिवाशावर वार केले. त्यानंतर रहिवाशाने याबाबत पोलिसांकडे तक्रार दिली होती. तोडफोड करुन डोलारे पसार झाला होता.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

येरवडा पोलिसांकडून त्याचा शोध घेण्यात येत होता. शनिवारी त्याला अटक करण्यात आली. डोलारेला पकडून पोलिसांनी लक्ष्मीनगर चौक परिसरात नेले. ज्या भागात त्याने वाहनांची तोडफोड केली. त्या भागात त्याची धिंड पोलिसांनी काढली. पोलीस उपायुक्त हिमत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्रकुमार शेळके आणि पथकाने ही कारवाई केली. शहरात गेल्या काही दिवसांपासून तोडफोडीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. वाहन तोडफोडीच्या घटनांमुळे नागरिक दहशतीखाली आहेत. बिबवेवाडी, येरवडा, कसबा पेठेतील कागदीपूरा परिसरात वाहनांची तोडफोड करण्याच्या घटना घडल्या होत्या.

वाहन तोडफोडीच्या घटनेनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाहीर कार्यक्रमात तोडफोड काढणाऱ्या गुंडांविरुद्ध कडक कारवाईचे आदेश पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना दिले होते. ‘गुंडांची हयगय करु नका. ज्या भागात वाहनांची तोडफोड केली. त्याच भागात त्यांची धिंड काढून त्यांना जरब बसवा’, असे स्पष्ट आदेश पवार यांनी पोलिसांना दिले होते. त्यानंतर बिबवेवाडी, कसबा पेठेतील कागदीपूरा भागात गुंडांची धिंड काढण्यात आली. येरवडा भागातील लक्ष्मीनगर भागात तोडफोड करुन पसार झालेल्या डोलारेला पोलिसांनी पकडून त्यांची धिंड काढण्यात आली. पोलिसांच्या कारवाईचे नागरिकांनी स्वागत केले आहे.

तोडफोडीच्या सर्वाधिक घटना उपनगरात

शहर, तसेच परिसरात वाहन तोडफोडीच्या घटनांमुळे नागरिक दहशतीखाली आहेत. गेल्या चौदा महिन्यात शहरातील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात वाहन तोडफोडीचे ९७ गुन्हे दाखल झाले आहे. तोडफोड प्रकरणात १८० जणांना अटक करण्यात आली आहेत. तोडफोडीच्या घटनांमध्ये अल्पवयीन मुले सामील असल्याचे उघडकीस आले आहे. वाहन तोडफोडीचे सर्वाधिक गुन्हे परिमंडळ पाचमध्ये घडले. कोंढवा, बिबवेवाडी, मार्केट यार्ड, हडपसर, वानवडी, लोणी काळभोर, काळेपडळ, फुरसुंगी, मुंढवा परिसरात गेल्या वर्षी तोडफोडीच्या २८ घटना घडल्या. त्यापाठोपाठ परिमंडळ चारमध्ये तोडफोडीचे २३ गुन्हे दाखल झाले. परिमंडळ चारमध्ये चतु:शृंगी, बाणेर, येरवडा, चंदननगर, विमाननगर, खडकी, लोणीकंद, खराडी, वाघोली या पोलीस ठाण्यांचा समावेश होतो. परिमडळ तीनमधील कोथरूड, वारजे माळवाडी, पर्वती, सिंहगड रस्ता, नांदेड सिटी पोलीस ठाण्यांच्या हद्दीत वाहन तोडफोडीचे १७ गुन्हे दाखल झाले. परिमंडळ दोनमध्ये वाहन तोडफोडीच्या ११ आणि परिमंडळ एकमध्ये चार घटना घडल्या.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pune police paraded goon publicly vandalized vehicles at yerawada pune print news rbk 25 css