कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडय़ात पाऊस
पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी रविवारी (१४ जून) संपूर्ण कोकण विभागासह मुंबई, पुणे आणि नाशिक शहर ओलांडून जवळपास सर्व महाराष्ट्र व्यापला. पोषक स्थितीमुळे या वाऱ्यांनी वेगाने प्रगती करीत थेट गुजरात आणि मध्य प्रदेशपर्यंत धडक मारली आहे. राज्यात कोकण विभागासह मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडय़ात काही ठिकाणी पावसाने हजेरी लावली. गेल्या चोवीस तासांत नाशिक, औरंगाबाद, नागपूर आदी जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची नोंद झाली.
कर्नाटकच्या कारवापर्यंत येऊन आठवडाभर रखडलेल्या मोसमी वाऱ्यांनी ११ जूनला राज्यात प्रवेश केला. बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले असल्याने या बाजूने पोषक स्थिती निर्माण झाली होती. परिणामी यंदा अनेक वर्षांतून प्रथमच कोकणात प्रवेश करतानाच मोसमी वाऱ्यांनी विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातही एकाच वेळी धडक मारली होती. पोषक स्थिती कायम राहिल्याने ११ जूननंतर तीनच दिवसांमध्ये मोसमी वाऱ्यांनी संपूर्ण राज्यात प्रगती केली. मुंबईसह राज्याच्या किनारपट्टीच्या काही भागांमध्ये यंदा सर्वात शेवटी मोसमी वारे दाखल झाले.
मोसमी वाऱ्यांनी १४ जूनला कोकण विभाग, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील उर्वरित भागात प्रगती करून राज्य व्यापले आहे. गुजरातच्या सुरत शहरापर्यंत मोसमी वारे दाखल झाले आहेत. मध्य प्रदेशातही त्यांनी प्रवेश केला आहे. देशपातळीवर त्यांनी छत्तीसगड, झारखंड आणि बिहारच्या बहुतांश भागांत प्रवेश केला असून, सद्यस्थितीत निम्मा भारत मोसमी वाऱ्यांनी व्यापला असल्याचे चित्र आहे. स्थिती अनुकूल असल्याने गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, उत्तर प्रदेश, झारखंड, बिहार आदी राज्यांतील उर्वरित भागांत त्यांची प्रगती होणार असल्याचे हवामान विभागाने जाहीर केले आहे.
पाऊस आणि सोसाटय़ाचा वारा
हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार पुढील दोन ते तीन दिवसांमध्ये कोकण, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी जोरदार, तर मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. याच कालावधीत महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर सोसाटय़ाचा वारा वाहणार असल्याचा इशाराही देण्यात आला आहे.