महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारार्थ आज पुण्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची सभा पार पडली. यावेळी बोलताना त्यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांवर जोरदार टीका केली. सुसंस्कृत महाराष्ट्राचं राजकारण नासवण्याचा प्रयत्न काही राजकीय नेत्यांकडून सुरु असल्याचे ते म्हणाले. तसेच या निवडणुकीत कोणतेही मुद्दे नसल्याने प्रत्येक जण शिव्या देत सुटला आहे. या नेत्यांनी महाराष्ट्रातल्या जनतेला वेगळ्याच विषयांमध्ये गुंतवून ठेवलंय, अशी टीकाही त्यांनी केली. विशेष म्हणजे यावेळी त्यांनी अजित पवार यांचे कौतुकही केलं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नेमकं काय म्हणाले राज ठाकरे?

महाराष्ट्रातील काही नेते आज जनतेला जातीपातीच्या राजकारणात गुंतून ठेवत आहेत. मात्र, याबाबतीत अजित पवार यांना मानलं पाहिजे. अजित पवार यांच्याशी माझे अनेक मतभेद असतील. पण या माणसाने कधीही जातीपातीचं राजकारण केलं नाही. मी त्यांना अनेक वर्षांपासून बघतो आहे. इतके वर्ष ते शरद पवार यांच्याबरोबर राहिले. मात्र, ते कधी जातीपातीचं राजकारणात पडल्याचं मी बघितलं नाही, अशी प्रतिक्रिया राज ठाकरे यांनी दिली.

हेही वाचा – शरद पवारांनी एनडीएत येण्याच्या पंतप्रधान मोदींच्या विधानावर देवेंद्र फडणवीसांनी दिलं स्पष्टीकरण; म्हणाले…

यावेळी बोलताना त्यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांनाही लक्ष्य केलं. ही पहिली निवडणूक आहे, ज्यात कोणाताही विषय नाही. या निवडणुकीचा कोणताही अजेंडा नाही. त्यामुळेच प्रत्येकजण शिव्या देत सुटला आहे. या नेत्यांनी जनतेला वेगळ्याच विषयांमध्ये गुंतवून ठेवलंय, अशी टीका त्यांनी केली. तसेच आपला महाराष्ट्र असा कधीच नव्हता. आज तरुण देश सोडून जात आहेत. त्याला कारण म्हणजे आपल्या सभोवतालचं वातावरण आहे. जे काही राजकीय मुद्दे असतात ते खालपर्यंत जातात आणि वातावरण गढूळ बनत जातं. त्यामुळे सभोवतालचं वातावरण चांगलं ठेवणं ही लोकप्रतिनींची जबाबदारी आहे, असेही ते म्हणाले.

हेही वाचा – राज ठाकरेंनी काढला फतवा! म्हणाले, “जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो भगिनींनो आणि मातांनो..”

पुढे बोलताना, १९९९ पासून म्हणजेच शरद पवारांचा राष्ट्रवादी पक्ष स्थापन झाल्यापासून महाराष्ट्रात जातीपातीचं विष कालवलं गेलं असा आरोप त्यांनी केला. तसंच जेम्स लेन प्रकरणाची आठवण करत तो प्रसंगही भाषणात सांगितला. इतकंच नाही तर ते भाषणात म्हणाले, “पुण्यात राम गणेश गडकरींचा पुतळा हटवण्यात आला. अनेकांना तेव्हा वाटलं होतं नितीन गडकरींचे ते नातेवाईक आहेत म्हणून त्यांचा पुतळा हटवला. राम गणेश गडकरी कोण आहेत ते तरी माहीत आहे का? मात्र या सगळ्या गोष्टी केल्या गेल्या आहेत. जेम्स लेनने सांगितलं होतं की मी कुठल्याही माणसाला महाराष्ट्रात भेटलो नाही. त्याआधी विष कालवून झालं होतं.” असाही आरोप राज ठाकरेंनी केला.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Raj thackeray appreciate ajit pawar in pune rally murlidhar mohod spb