मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी पुण्यातले भाजपाचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारासाठी सभा घेतली. या सभेत त्यांनी काँग्रेसला मतं देण्यासाठी, उद्धव ठाकरेंना मत देण्यासाठी मुस्लिम समाजात, मशिदींमध्ये फतवे काढले जात आहेत असं म्हटलं तसंच हे होणार असेल तर आज मी देखील एक फतवा काढतो म्हणत एक आवाहनच मतदारांना केलं आहे. त्यामुळे राज ठाकरेंचं पुण्यातलं भाषण चर्चेत आलं आहे.

जातीपातीचं विष शरद पवारांनी कालवलं

समाजात जातीपातीचं विष शरद पवारांनी कालवलं. १९९९ पासून म्हणजेच शरद पवारांचा राष्ट्रवादी पक्ष स्थापन झाल्यापासून महाराष्ट्रात जातीपातीचं विष कालवलं गेलं असा आरोप त्यांनी केला. तसंच जेम्स लेन प्रकरणाची आठवण करत तो प्रसंगही भाषणात सांगितला. इतकंच नाही तर ते भाषणात म्हणाले, “पुण्यात राम गणेश गडकरींचा पुतळा हटवण्यात आला. अनेकांना तेव्हा वाटलं होतं नितीन गडकरींचे ते नातेवाईक आहेत म्हणून त्यांचा पुतळा हटवला. राम गणेश गडकरी कोण आहेत ते तरी माहीत आहे का? मात्र या सगळ्या गोष्टी केल्या गेल्या आहेत. जेम्स लेनने सांगितलं होतं की मी कुठल्याही माणसाला महाराष्ट्रात भेटलो नाही. त्याआधी विष कालवून झालं होतं.” असाही आरोप राज ठाकरेंनी केला.

“मुस्लीम मोहल्ल्यांमध्ये फतवे काढले जात आहेत”

“मुस्लीम मोहल्ल्यांमध्ये आणि मशिदींमध्ये मौलवी फतवे काढत आहेत. फतवे काय काढले जात आहेत? काँग्रेसच्या उमेदवाराला मदत करावी, मतं द्यावी. अनेक मुस्लिम लोक आहेत जे सूज्ञ आहेत. ते यांच्या वाट्याला जाणार नाहीत. ते यांच्या वाट्याला जाणार नाहीत. त्यांना समजतं आहे काय राजकारण चाललं आहे. आत्ता निवडणुकीच्या तोंडावर तुम्ही फतवे काढत आहात? मुस्लिम समाज म्हणजे तुमच्या घरची गुरंढोरं आहेत का? त्यांनाही समजतं आहे कोण आपला वापर कसा करुन घेतं आहे ते. निवडणुकीच्या तोंडावर फतवे काढले जात आहेत.” असं राज ठाकरे म्हणाले.

हे पण वाचा- “अजित पवारांनी कधीही जातीपातीचं राजकारण केलं नाही”; राज ठाकरेंनी केलं कौतुक; म्हणाले, “इतकी वर्ष ते…”

“तर आज मीदेखील फतवा काढतो..”

पुढे राज ठाकरे म्हणाले, “काँग्रेसला मतदान करा, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मतदान करा, हे फतवे काढले जात आहेत. मशिदींमधले मौलवी जर यांना मतदान करा हे फतवे काढत असतील तर मग राज ठाकरे फतवा काढतो, माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, मुरलीधर मोहोळ, भाजपाचे इतर उमेदवार, शिंदेंचे, अजित पवारांचे उमेदवार यांना भरघोस मतांनी मतदान करा. अनेकांची चुळबूळ चालू आहे ती कशासाठी? कारण मागच्या दहा वर्षांत यांना तोंड वर काढता आलेलं नाही.” असं राज ठाकरे म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राम मंदिर झालं ते नरेंद्र मोदींमुळेच

तुम्हाला एक गोष्ट सांगतो, नरेंद्र मोदी, केंद्र सरकार यांच्याबाबत माझे मतभेद आहेत ते राहणार. पण चांगल्या गोष्टींचं अभिनंदन करणार. जे चांगले मुस्लिम लोक आहेत त्यांचा विषय नाही. पण जे वाह्यात मुस्लीम आहे ते काँग्रेसच्या माध्यमातून डोकं वर काढू पाहात असल्याने फतवे निघत आहेत. उद्या चुकून यांच्या हातात काही गोष्टी गेल्या रस्त्यावर फिरणं कठीण करुन ठेवतील. ८० आणि ९० चं दशक मला आठवतं. उन्माद सुरु होता. त्या सगळ्याचा शेवट होता तो बाबरीचा ढाचा पडणं. तो पडल्यानंतर मला कधीही वाटलं नव्हतं देशात राम मंदिर घडेल. पण राम मंदिर कुणामुळे होऊ शकलं असेल तर ते नरेंद्र मोदींमुळेच होऊ शकलं. असंही राज ठाकरे म्हणाले.