लोकसत्ता प्रतिनिधी
पिंपरी : महाराष्ट्रात अनेक शैक्षणिक संस्था उभ्या आहेत. तालुका, जिल्हा ठिकाणच्या संस्था उत्तम काम करतात. अलीकडे शिक्षण संस्थेतही दोन भाग झाले आहेत. समाजाला उभारण्यासाठी हातभार लावण्याच्या हेतूने एका वर्गाने, तर दुसऱ्या वर्गाने शिक्षण क्षेत्रात गुंतवणूक करायची म्हणून संस्था उभ्या केल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले.
चिंचवड येथील एका खासगी शिक्षण संस्थेच्या कार्यक्रमात पवार बोलत होते. खासदार श्रीनिवास पाटील, श्रीरंग बारणे, माजी महापौर आझम पानसरे, भाऊसाहेब भोईर यावेळी उपस्थित होते. पवार म्हणाले, की रयत शिक्षण संस्थेत ७० हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. कर्मवीर भाऊराव पाटलांनी हे रोपटे लावले. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात संस्थेच्या शाखा आहेत. रयत संस्था चालवितानाही अनेक संकटे आली. वसतिगृहातील विद्यार्थ्यांना जेवण देण्यासाठी अडचण आल्याने कर्मवीरांच्या पत्नीने कानातील मोडून पैसे उपलब्ध केले. त्यामुळे अडचणींवर मात करून ज्ञानदानाचे कार्य केले पाहिजे.
आणखी वाचा-पिंपरी-चिंचवडमध्ये अजित पवार विरुद्ध रोहित पवार यांच्यात संघर्ष
हिंजवडीला साखर कारखान्याऐवजी माहिती-तंत्रज्ञाननगरी सुरू केली. आज हिंजवडीत गेल्यावर इंग्लंड, अमेरिकेत आल्याचा प्रत्यय येतो. एक लाख लोक तिथे काम करत आहेत. या नगरीतून दर वर्षी ११ हजार कोटींची निर्यात होत असते. औद्योगिक, शैक्षणिक नगरीनंतर आता माहिती आणि तंत्रज्ञाननगरी म्हणून या भागाची ओळख झाली आहे. जगात या भागाचे नाव घेतले जाते, असेही पवार म्हणाले.
गणपती विसर्जनाच्या दिवशी मुख्यमंत्र्यांना शेवटचा गणपती गेल्याशिवाय झोपता येत नाही. तुझा पहिला की माझा पहिला, यावरून वाद होतात. मी मुख्यमंत्री असताना परभणीला एका गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीत वाद झाला. ती मिरवणूक संघर्षाच्या टोकाला जाईल काय, याची मला काळजी वाटत होती. चार वाजता शेवटचा गणपती गेल्यानंतर अंग टाकले आणि झोपलो. त्यानंतर पाऊण तासाने लातूरला भूकंप झाल्याचे समजले. सकाळी सात वाजता किल्लारीला पोहोचलो. एक लाखापेक्षा जास्त घरे उद्ध्वस्त झाली होती. मोठे संकट होते. या संकटातून सावरण्यासाठी लोकांनी मोठी मदत केली. कोणतेही संकट आल्यानंतर आपले कर्तव्य समजून महाराष्ट्रातील लोक पुढे येतात. त्यामध्ये जैन समाज कायम पुढे येतो, असेही पवार म्हणाले.