dying education system and Teachers Day | Loksatta

लपवलेला करोनामृत्यू… शिक्षण व्यवस्थेचा!

या लेखात किस्से बरेच आहेत. पण या किश्श्यांमधून निघणारं तात्पर्य अस्वस्थ करणारं आहे. आजच्या शिक्षकदिनी तरी या अस्वस्थतेला सर्वांनीच सामोरं जावं…

dying education system and Teachers Day
लपवलेला करोनामृत्यू… शिक्षण व्यवस्थेचा!

रसिका मुळ्ये

वर्षानुवर्षाच्या पठडीत मुरलेल्या भारतीय शिक्षण व्यवस्थेला करोना विषाणूच्या साथीने अकल्पित धक्का दिला. त्या धक्क्यातून अद्यापही ना व्यवस्था सावरली, ना विद्यार्थी, ना शिक्षक. दरवर्षीच्या चालीरीती पाळून शिक्षकांना फुले, गजरे देऊन आज शिक्षक दिन साजरा होईल. यंदा भर म्हणून शाळांच्या भिंतीवर शिक्षकांचे छायाचित्र लटकलेले असेल आणि शिक्षक शासकीय अहवालांची कागदी भेंडोळी रंगवण्यात व्यग्र असतील. हे सर्वजण ज्या अध्ययन- अध्यापन, कौशल्य विकास, मूल्यमापन अशा व्यवस्थेचा भाग आहेत ती व्यवस्था शेवटचे उसासे सोडत असेल.

दोन वर्षांनंतर करोनाची साथ ओसरल्यावर सॅनिटायझरचे फवारे मारून शाळा सुरू झाल्या. आता करोनाच्या साथीत दगावलेल्यांमध्ये भारतातील शिक्षणव्यवस्थेचा मृत्यू लपवण्याची धडपड सध्या सुरू आहे. उच्च शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी तंत्रनिकेतनांच्या निकालाच्या अनुषंगाने मांडलेले मुद्दे याचीच साक्ष देतात.

‘ऑफलाइन’चीच धडकी?

दोन वर्षे संगणक, मोबाईलच्या पटलाकडे पाहून पेक्षा कानातून आणि पटलावर उमटलेल्या अक्षरांतून जेवढे मेंदूपर्यंत पोहोचेल तेवढे पोहोचवणे म्हणजेच शिक्षण आणि वेगवेगळ्या क्लृप्त्या वापरून, बहुपर्यायी प्रश्नोत्तरांची उत्तरे देऊन मिळालेले गुण म्हणजेच ‘गुणवत्ता’ असा सवयीने परंतु दृढ समज झालेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा जुन्या चौकटीत बसणे जमेनासे झाले आहे. अगदी इंजीनिअरिंगच्या विद्यार्थ्यांचीदेखील हीच कथा. पटलावर यंत्राची चित्रे पाहून त्याचा वापर, भाग, तंत्र याची रट्टा मारलेली उत्तरे पटापट खुणा करून सोडवणाऱ्या भावी अभियंत्यांना प्रत्यक्ष प्रत्यक्ष कार्यशाळेत नजरेला पडणारे यंत्राचे अवाढव्य रूप अंगावर काटा उभा करते आहे. प्रत्यक्ष समोर कागद आणि हाती पेन आल्यावर परीक्षेत उत्तरे सुचेनाशी झाली आहेत.

दोन वर्षे गुणपत्रिकेत ८०, ९० गुण पाहण्याची सवय झाल्यानंतर आता ४० गुण मिळवताना होणारी दमछाक विद्यार्थ्यांना मेटाकुटीला आणते आहे. त्यामुळे आता परीक्षा देण्याची सवय राहिली नाही म्हणून परीक्षा पद्धत बदलण्याची, निकालात सवलत देण्याची मागणी विद्यार्थी बिनदिक्कत करू लागले आहेत. तंत्रनिकेतनांच्या निकालाचा मुद्दा चर्चेत आला असला तरी जवळपास सर्वच विद्यापीठातील, विद्याशाखांतील विद्यार्थ्यांची हीच परिस्थिती आहे. ही विद्यार्थ्यांची परिस्थिती आहे तर शिक्षकांचीही फार काही वेगळी नाही. अध्यापनाचे माध्यम, बदलेल्या सवयी यांमुळे आता जुन्या साच्याशी जुळवून घेताना शिक्षकांनाही जड जात असल्याचे ते सांगतात.

पूर्वी रोज एक तास एका पाठासाठी किंवा घटकासाठी पुरायचा नाही. वर्षाअखेरीस जादा तास घेण्यावरून शिक्षक खोलीत वादविवाद व्हायचे. आता ४५ मिनिटेही खूप होतात. ऑनलाइन तासिका घेताना पॉवर पॉइंटवरील सादरीकरण करायचे, तेच विद्यार्थ्यांनाही पाठवायचे. त्यातील मुद्द्यांवरून – म्हणजे खरेतर ते पाठ करून – विद्यार्थी परीक्षा देत होते. हीच सवय अधिक लागली आहे, असे मत एका प्राध्यापकांनी व्यक्त केले.

दुसऱ्या एका कला विद्याशाखेच्या प्राध्यापकांनी सांगितलेला अनुभवही असाच काहीसा आहे. विद्यार्थी आणि शिक्षकांमधील संवाद हा वर्गातील अविभाज्य भाग होता. कधीतरी विषयांतर होऊन वर्गात गप्पा होत असत मात्र, त्यातूनही विद्यार्थी शिकत असत. काही विद्यार्थ्यांची कौटुंबिक पार्श्वभूमी, अडचणी हेही आम्हाला माहिती असायचे. आता हा संवाद खूप कमी झाला आहे. नवे विद्यार्थी हळूहळू रुळत आहेत. मात्र, संवाद साधण्याची, म्हणणे मांडण्याची, शंका विचारण्याची सवय फारशी राहिलेली नाही. एक किंवा दोन वर्षे ऑनलाइन वर्गांमध्ये लॉग इन करून हजेरी लावणाऱ्या विद्यार्थ्यांना संवाद साधताच येत नाही, असे त्या प्राध्यापकांनी सांगितले.

शाळांची निराळीच कथा…

फळा वापरण्याची, फळ्यावर लिहिण्याची सवय मोडल्याची खंत एका कनिष्ठ महाविद्यालयाच्या शिक्षिकेने व्यक्त केली. शाळांमधील विद्यार्थी आणि शिक्षकांची परिस्थिती थोडी वेगळी आहे ते रचनेमुळे. मात्र बदललेल्या सवयी आणि जुन्या, नव्या पद्धतींच्या वापरातील गोंधळ हा तेथेही आहे. शाळांमध्ये एकाच वर्गातील विद्यार्थ्यांच्या कौशल्यांमध्ये खूप फरक आहे. विद्यार्थ्यांच्या सवयी बदलल्या आहेत. त्यांच्या शरीराचे घड्याळ म्हणजेच दिनचर्या बदलली आहे. त्याचाही परिणाम विद्यार्थ्यांची वागणूक, आकलन यावर होत असल्याचे निरीक्षण शिक्षकांनी नोंदवले. दोन वर्षे शिकण्यासाठी हाती मोबाईल मिळणाऱ्या विद्यार्थ्यांनी नव्या माध्यमातील अनेक गोष्टी शिक्षकांपेक्षाही जलद आत्मसात केल्या. आता सर्व पुन्हा सुरू झाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या हाती असलेल्या मोबाईलच्या जागी पुन्हा वही-पेन आले. हा बदल पचवून शिकणेही अनेक विद्यार्थ्यांना कठीण ठरते आहे.

दुसरीकडे ग्रामीण भागांतील शिक्षकांसमोर वेगळाच प्रश्न आहे. डिजिटल शाळांचा उदोउदो होत असताना अनेक प्रयत्नांतीही विद्यार्थ्यांपर्यंत साधने पोहोचली नाहीत. त्यामुळे दोन वर्षे शिक्षणापासून पूर्ण फारकत असलेल्या विद्यार्थ्यांना कसे शिकवायचे या प्रश्नाचे उत्तर अद्यापही अनेक शिक्षकांना मिळालेले नाही. विद्यार्थ्यांच्या बदललेल्या सवयी, झालेले नुकसान याच्याशी जुळवून घेताना शिक्षकांनाही खूप प्रयत्न सध्या करावे लागत आहेत. शिक्षक आणि विद्यार्थी या दोघांसाठीही हे आव्हानात्मक आहे, असे पुणे जिल्हा परिषदेच्या एका शाळेतील मुख्याध्यापकांनी सांगितले.

‘विचार करून शिकण्या’चे भान कोणाला?

या सगळ्यात परीक्षेतून सवलत मागणाऱ्या विद्यार्थ्यांचा दोष नाही, ऑनलाइनची सवय झाल्यामुळे संवाद हरवल्याची तक्रार करणाऱ्या प्राध्यापकांचा नाही किंवा विद्यार्थ्यांचे नुकसान कसे भरून काढायचे हे कळत नाही, असे म्हणणाऱ्या शिक्षकांचाही नाही. शिक्षण विभागाने ही दरी भरून काढण्यासाठी केलेले उपाय कागदोपत्री उत्तम निकाल दर्शवणारे असले तरी प्रश्न सोडवणारे आहेत असे ठामपणे म्हणता येणार नाही. उलटपक्षी शिक्षकांना काय काम असे म्हणून त्यांना भलत्याच उद्योगांत गुंतवून त्यांच्यापुढील प्रश्न व्यवस्थेने अधिकच वाढवले.

परीक्षा घ्याव्यात का, त्यातील निकालाला महत्त्व किती द्यावे या सनातन वादांचाही हा मुद्दा नाही. मुद्दा आहे तो सर्वच पातळीवरील गोंधळ निस्तरण्याऐवजी तो वाढवण्याचा. खरेतर एका वर्षाच्या अनुभवातून काही धडा घेऊन अनेक प्रश्नांवर दूरगामी उपाय योजण्याची संधी शिक्षण विभागाला मिळाली होती. परीक्षा, मूल्यमापन कसे असावे, ते का असावे याचा खोलात विचार करून बदल नक्कीच करता आले असते. शिक्षण नेमके कशासाठी भविष्यातील रोजगारासाठी, समाधानासाठी की आत्मसुखासाठी या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न करता आला असता? शिक्षकांची भूमिका काय? ती कशी असावी, बदलत्या काळानुसार त्यांच्या गरजा काय याचा विचार करून उपाय योजता आले असते. डिजिटल शिक्षण हेच सर्व काही हा समज पडताळून पाहता आला असता.

मात्र, या सगळ्यासाठी आवश्यक असलेला डोळसपणा थोडा कमीच पडला आणि व्यवस्था ठेचकाळून, अडखळून आता उसासे घेऊ लागली आहे. पुढील अगदी मोजक्या वर्षात समस्त शिक्षण व्यवस्थेसाठी अभिमानाचा असलेला ‘शिक्षक दिन’ हा फक्त कर्मकांडापुरता ऊरू नये इतकीच अपेक्षा.

rasika.mulye@expressindia.com

मराठीतील सर्व विशेष लेख ( Features ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 05-09-2022 at 09:55 IST
Next Story
गणरायाचे ईदगाहमध्ये स्वागत…