लोकमानस : आर्थिक विषमता चिंताजनक

‘गरिबीचे गुणोत्तर’ या अग्रलेखात (२६ मे) जागतिक अर्थिक परिषदेच्या बैठकीत मांडण्यात आलेल्या आकडेवारीच्या विश्लेषणातून जगात प्रतितास वाढत जाणारी गरिबांची संख्या आणि त्याच वेळी वाढत असलेली अब्जाधीशांची संख्या, याबाबत चिंता व्यक्त करण्यात आली आहे.

Loksatta readers response letter

loksatta@expressindia.com

‘गरिबीचे गुणोत्तर’ या अग्रलेखात (२६ मे) जागतिक अर्थिक परिषदेच्या बैठकीत मांडण्यात आलेल्या आकडेवारीच्या विश्लेषणातून जगात प्रतितास वाढत जाणारी गरिबांची संख्या आणि त्याच वेळी वाढत असलेली अब्जाधीशांची संख्या, याबाबत चिंता व्यक्त करण्यात आली आहे. श्रीमंत व अतिश्रीमंत यांच्यावर किंचित अधिक करभार टाकल्यास जमा संपतीच्या विनियोगातून अनेक योजनांसाठी निधी उपलब्धता वाढेल, त्यातून वाढत्या गरिबीस आळा बसेल, असा अशावादही व्यक्त करण्यात आला आहे. विसाव्या शतकाअखेर जगात साम्यवादी चळवळीस उतरती कळा लागली. आज प्रत्येक देश, पक्ष मग ते राष्ट्र भांडवलशाही असेल तरीही आर्थिक समानता व कल्याणकारी योजनाचा हवाला देते, पण वास्तव भीषण आहे. भारत तरी त्यास कसा अपवाद ठरेल. गेल्या दोन वर्षांतील- करोना कालखंडातील कामगारांची, सामान्य नागरिकांची फरपट, आरोग्य व्यवस्थेचे विदारक, भयावह चित्र विसरणे असंभव! पण याच काळात जगभराच्या भांडवली बाजारात झालेली वृद्धी चिंताजनक आहे. त्याचे प्रतिबिंब जागतिक आर्थिक परिषदेच्या अहवालात दिसले. जगभरातील मान्यवर राजकीय नेते व विचारवंत त्याकडे कशा दृष्टीने पाहातात यावर जगातील गरिबांचे भवितव्य ठरणार आहे तर!

– लक्ष्मण संगेवार, नांदेड

‘एकत्वाचा धर्म’ हे निव्वळ स्वप्नरंजन

‘ज्ञानवापीकडून ज्ञान-सागराकडे!’ हा राजा देसाई यांचा लेख (२६ मे) वाचला. यातील काही मुद्दे विचार करण्यासारखे आहेत. ‘हिंदु-मुस्लीम समाजात अशा संबंधातही संवादाचा संपूर्ण अभाव ही सर्वात वाईट गोष्ट’ असे लेखात म्हटले आहे. ‘समाजाचे धर्म व सामाजिक सौहार्द या अंगाने प्रबोधन होत नाही.’ – अशी खंतही लेखक व्यक्त करतात. पण मुळात हा ‘संवादाचा संपूर्ण अभाव’ नेमका कशामुळे आहे? त्याचे मूळ कारण अगदी पूर्वीपासूनच दुर्लक्षित राहिले आहे. इसवी सनाच्या सातव्या शतकात अरबस्तानात जन्माला आलेल्या इस्लामची अंगभूत असहिष्णुता हे त्या अभावाचे मूळ कारण आहे. इस्लाम न मानणाऱ्या, मूर्तिपूजक, अनेकेश्वरवादी अशा सर्वाविषयी इस्लाममध्ये असलेली कमालीची तुच्छता, कटुता आणि त्यांच्याशी मुस्लिमांनी कशी वागणूक ठेवावी, याविषयीचे कुराण, हदीथ यांतील अत्यंत कठोर, स्पष्ट निर्देश विचारात घेतल्यास असा संवाद मुळात शक्यच नाही, हे कोणाच्याही लक्षात येईल. खिलाफत चळवळीला पाठिंबा देण्यापासून गांधीजींनी जे मुस्लीम अनुनयाचे राजकारण सुरू केले, त्यामध्ये या संवादाच्या अभावाचे मूळ सापडेल. इस्लाममधील अंगभूत दोषांबद्दल कोणीही, कधीही, काहीही बोलायचे नाही, हे हिंदु- मुस्लीम संबंधांचे पायाभूत तत्त्व/ सूत्र (?) गांधीजींनी घालून दिले! स्वामी श्रद्धानंद यांची हत्या करणाऱ्याला (रशीदला) ‘भाऊ’ म्हणण्यापर्यंत त्यांची मजल गेली. तो रशीद, तसेच केरळातील हिंदुंवर अनन्वित अत्याचार करणारे मोपले-  हे ‘केवळ त्यांच्या धर्मानुसार वागले,’ असे प्रमाणपत्र गांधीजींनी देऊन टाकले. कुठलाही ‘संवाद’ हा मुळात एकमेकांना बरोबरीचे मानण्यावर अवलंबून असतो. कुराणात, इस्लाममध्ये मूर्तिपूजक समाजाविषयी (काफिरांविषयी) असलेली कमालीची तुच्छता विचारात  घेतल्यास, मुस्लिमांशी संवाद शक्य नाही, हे सहज लक्षात येईल.

स्वामी विवेकानंद आणि योगी अरिवद हे दोघेही ज्याला ‘भारताची आध्यात्मिकता’ (र्सव खल्विदं ब्रह्म:) किंवा ‘आत्मशक्तीच्या चिरंतन सत्याचा प्रभाव’ असे म्हणतात, ते सर्व अगदी निश्चितपणे वेदांत/ सनातन हिंदु तत्त्वज्ञानाशीच संबंधित आहे. कुराण, हदीथमधील इस्लामची शिकवण किंवा बायबलमधील ख्रिश्चन विचारधारेशी त्याचा सुतराम संबंध नाही, हे उघड आहे. त्यामुळे या दोन महापुरुषांचा उल्लेख करून उगीचच भारतीय संस्कृतीला  ‘आधुनिक विविधता’ चिकटवण्याचा प्रयत्न करू नये. त्याची गरज नाही.

लेखाचा शेवटचा परिच्छेद – ‘झाले गेले, गंगेला मिळाले.. इतिहासाची ओझी उतरवून ठेवणे वगैरे..’ ही केवळ ‘हिंदु मानसिकता’च आहे. कुराणात एका अक्षराचा बदल जोपर्यंत संभवत नाही, तोपर्यंत त्यातील प्रत्येक वाक्य, प्रत्येक आदेश प्रमाण मानून चालणाऱ्या मुस्लीम मानसिकतेत बदल संभवत नाही. ‘हळूहळू मानसिकता बदलून वाद विरून जातील. एकत्वाचा खरा धर्म दृढ होईल..’  हे निव्वळ स्वप्नरंजन आहे, जे थेट गांधीजींच्या काळापासून हिंदु करत आले आहेत.

– श्रीकांत पटवर्धन, मुंबई

मुस्लिमांबद्दलच्या धारणा पूर्वग्रहांवर आधारीत

‘ज्ञानवापीकडून ज्ञान-सागराकडे!’ हा राजा देसाई यांचा लेख (२६ मे ) वाचला. राम मंदिर-बाबरी मशीद वाद न्यायालयीन निर्णयाने मिटला तोच देशात, ‘मथुरा, काशी बाकी हैं’चा नारा निनादू लागला. भारतावर झालेली अनेक परकीय आक्रमणे आणि त्यातून बहुसंख्याक समुदायाच्या आस्थेच्या वास्तूंवर झालेली अतिक्रमणे यांचा विचार केला तर, हा खेळ न संपणारा आहे. हे वादग्रस्त मुद्दे उकरून काढण्यात देशातील बहुसंख्याक समुदायाला काहीही आक्षेपार्ह वाटत नाही. जगण्याशी निगडित ज्वलंत प्रश्नांवरून जनता धार्मिक कट्टरतावादाकडे मार्गक्रमण करत आहे का? असेल तर यामागील कारणे कोणती? आणि मुस्लीम समाजाबद्दल बहुसंख्याक समुदायाच्या मनात का शंका उपस्थित होत आहेत याचा विचार करणे क्रमप्राप्त ठरते.

मुस्लिमेतर भारतीयांच्या मुस्लीम धर्म आणि समाजाबद्दल असलेल्या धारणा पूर्वग्रहावर आधारित आहेत. यातून सर्व मुस्लीम धर्मीयांना एकाच चष्म्यातून पाहण्याची प्रथा पडत चालली आहे. भारतात इस्लाम धर्म कैक दशके असूनदेखील आणि आजच्या घडीला देशातील एकूण लोकसंख्येच्या जवळपास २० टक्के लोकसंख्या मुस्लीम धर्मीयांची असली तरी, या धर्माच्या आणि समाजाच्या बाबतीत वस्तुनिष्ठ माहिती इतर धर्मीयांना नसल्याचे, नपेक्षा चुकीची किंवा अपुरी माहिती असल्याचे दिसून येते. कित्येक मुस्लिमेतर- विशेषत: हिंदु- मुस्लीम समाजाकडे फाळणीच्या चष्म्यातून बघतात.

मुस्लीम धर्म वरून एकसंध वाटत असला तरी, धर्मातर्गत मतमतांतरे व भिन्न विचारप्रवाह – यांची मुस्लिमेतरांना सहसा माहिती नसते आणि असलीच तरी जुजबी असते. फाळणीची मागणी उचलून धरणारा वर्ग हा मुख्यत्वे उच्चवर्गीय जमीनदारांचा होता आणि सामान्य मुस्लीम माणूस त्यांच्या चिथावणीला बळी पडला. फाळणीच्या वेळी मोठय़ा प्रमाणात सुशिक्षित/ उच्चवर्गीय मुस्लीम वर्ग पाकिस्तानला गेला;  भारतात राहिलेल्या मुस्लीम समाजास त्यांच्यातील सुशिक्षित लोकांचे स्थलांतर फार महागात पडले, हे आजच्या मुस्लीम समाजाची दुरवस्था बघून अधोरेखित होतेच. भारतातील मुस्लीम समाजाने धर्माचे वेड बाजूस सारून आधुनिकता स्वीकारली पाहिजे. गेली काही दशके देशातील राजकारणाने याबाबतीत जे धोक्याचे वळण घेतले आहे, त्याचा परिणाम जनमानसात ठळकपणे दिसतो आणि समाजमाध्यमांतून त्याचे घातक प्रतिबिंब पडतही आहेत. यावर दीर्घकालीन विचार होणे गरजेचे आहे. 

– बाळकृष्ण शिंदे, पुणे

इतिहासातील वाद वर्तमानात का उकरायचे?

राजा देसाई यांचा ‘ज्ञानवापीकडून ज्ञान-सागराकडे’ हा लेख उद्बोधक आहे. भारतावर सुमारे एक हजार वर्षे मुस्लीम आणि इंग्रज शासकांनी राज्य केले. त्यांनी  इतिहासात केलेल्या अन्यायाचे परिमार्जन ‘क्रियेला-प्रतिक्रिया’ या सूत्राने वर्तमानात करावयाचे म्हटले तर शेकडो वर्षे संपूर्ण देश त्यातच गुंतून पडेल. त्यामुळे समाजात धार्मिक दुही निर्माण होऊन केवळ दंगली होतील.  तात्कालिक राजकीय फायद्यासाठी असे अस्मितेचे राजकारण करणे सर्वस्वी अयोग्य आहे. आज महागाईने गेल्या २२ वर्षांतील उच्चांक गाठलेला असताना संपूर्ण देश ज्ञानवापी मशिदीपुढे डोळे लावून बसला आहे. ही जनतेची दिशाभूल आहे. ताजमहाल, कुतुबमिनार, मथुरा असे अनेक विषय पोतडीतून टप्प्याटप्प्याने काढले जातील. असेच सुरू राहिले तर धार्मिक दुही, वितुष्ट, दंगली याशिवाय काहीही हाती लागणार नाही. या वादविवादाला पूर्णविराम देऊन विकासावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. महागाई, बेरोजगारी, विषमता हे जनतेचे मूळ प्रश्न आहेत.  इतिहासातील चुका वर्तमानात सुधारून भविष्याकडे वाटचाल करणारा समाजच प्रगत होतो. इतिहासातील वाद उकरून वर्तमानात एकमेकांची टाळकी फोडणे ज्ञानी समाजाचे लक्षण नाही.

– डॉ. विकास इनामदार, पुणे 

ते वक्तव्य म्हणजे सत्ता गमावल्याचा सल..

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांना ‘घरी जा, स्वयंपाक करा!’ असा सल्ला दिल्याचे आणि ‘दिल्लीत जा, नाही तर मसणात जा’ असे वक्तव्य केल्याचे वृत्त (२६ मे) वाचले. देशातील एका मोठय़ा पक्षाचे, त्यातही एका प्रगत राज्याचे प्रदेशाध्यक्ष अशी वक्तव्ये करतात, तेव्हा हातातोंडाशी आलेला सत्तेचा घास अनपेक्षितरीत्या हिरावून घेतल्याचे दु:ख किती मोठे असते, हा सल किती दीर्घकाळ राहतो, हे स्पष्टपणे दिसते. शिवाय माणूस कितीही सुशिक्षित, सुसंस्कृत वा मोठय़ा पदावर

असू द्या, अपेक्षाभंगाचे दु:ख पचवणे जडच जाते, हेदेखील पाटील यांच्या वर्तनातून पदोपदी दिसून येतेच.

– बेंजामिन केदारकर, विरार

मातांनी स्वयंपाक करावा, लोकसंख्या वाढवावी

चंद्रकांत पाटील यांनी खासदार सुप्रिया सुळे यांना दिलेला ‘घरी जा आणि स्वयंपाक करा’ हा सल्ला त्यांच्या संस्कारांशी मिळताजुळता आहे. भाषणात बंधुभगिनींनोऐवजी ‘श्रद्धेय माताओ’ ऐकत आल्याने नकळत स्त्रियांनी काय करावे, त्यांचे कार्यक्षेत्र कोणते याविषयी जी विशिष्ट धारणा झालेली असते, तीच या सल्ल्यामागे आहे, हे समजून घ्यायला हवे. मातांनी स्वयंपाक करावा, हिंदुंची संख्या वाढवावी, राष्ट्रसेविका व्हावे एवढेच!

– गजानन गुर्जरपाध्ये, दहिसर (मुंबई)

मराठीतील सर्व लोकमानस ( Lokmanas ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Lokmanas loksatta readers opinion loksatta readers reaction ysh 95

Next Story
लोकमानस : भारताने पुन्हा अलिप्त देशांचे नेतृत्व करावे
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी