बदलापूरः बदलापूर शहरातील एकमेव उड्डाणपुलावर पुन्हा मोठ्या संख्येने खड्डे पडले असून त्यामुळे शहरातील विविध मंडळे आणि घरगुती गणपतींचे आगमन या खड्डे आणि त्यामुळे होणाऱ्या कोंडीतूनच होणार आहे. बदलापूरसह अंबरनाथ आणि उल्हासनगर शहरातही विविध ठिकाणी खड्डे आणि दुरावस्थेमुळे नागरिकांना ऐन उत्सव काळात कोंडीचा सामना करावा लागणार आहे. त्यामुळे नागरिकांत संतापाचे वातावरण आहे.

बदलापूर शहरात पूर्व पश्चिम वाहतुकीसाठी एकमेव उड्डाणपूल महत्वाचा आहे. मात्र गेल्या काही महिन्यांपासून या उड्डाणपुलावर खड्ड्यांचे साम्राज्य पहायला मिळते आहे. जुलै महिन्यात जोरदार पावसामुळे येथे खड्डे पडले होते. त्यामुळे या उड्डाणपुलावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत होती. त्यानंतर खड्डे काही अंशी बुजवल्याने दिलासा मिळाला. मात्र ऑगस्ट महिन्यात पुन्हा उड्डाणपुल खड्ड्यात गेला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वातंत्र्यदिनी शहरात येणार असल्याने त्यापूर्वी हे खड्डे बुजवण्यात आले. मात्र या उड्डाणपुलावर पुन्हा मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले आहे. दुबे रूग्णालयासमोर उड्डाणपुलाच्या प्रवेशद्वारावर भलामोठा खड्डा पडला असून येथे पाणी साचल्याने दुचाकीस्वारांचा तोल बिघडतो आहे. त्यामुळे येथे कोंडीही होते आहे. तर पूर्वेतून पश्चिमेपर्यंतच्या संपूर्ण भागात खड्डे पडले आहेत.

हे ही वाचा…‘ठाणेकर’ होऊन रहाण्याच्या हौसेवर कोंडीचे विरजण

त्यामुळे वाहनचालकांना कोंडीचा सामना करावा लागतो आहे. शनिवारी गणेशाची स्थापना होत असल्याने त्या दिवशी, तसेच गुरूवार आणि शुक्रवारी अनेक मोठ्या मंडळांचे गणपतींचे आगमन होणार आहे. बदलापूर पूर्वेतील स्थानक परिसरात आणि बदलापूर गावात अनेक गणेशमुर्ती कार्यशाळा आहेत. त्यामुळे येथून शहरातल्या विविध भागात गणेशमुर्ती नेल्या जातात. मात्र खड्डांमुळे यंदा गणेशाचे आगमन खड्ड्यातुनच होणार आहे. उड्डाणपुलासह उल्हास नदीपुलाजवळ, रमेशवाडी रस्ता आणि कॉंक्रिट रस्त्यांचे डांबरी जोडभाग खड्ड्यांनी वापले आहेत.

यासोबतच अंबरनाथ आणि बदलापूर शहरांच्या वेशीवर टी जंक्शन, आनंदनगर येथील पेट्रोल पंपासमोरील भाग, उड्डाणपुलाच्या पूर्व भागात, स्वामी समर्थ चौक, चौकातून स्थानकाकडे जाणारा रस्ता तसेच अनेक डांबरी अंतर्गत रस्त्यांवरही खड्डे पडले आहेत. तर उल्हासनगर शहरातील कल्याण बदलापूर रस्त्यावर फॉलोवर लाईन, मध्यवर्ती रूग्णालयाकडे जाणारा रस्ता, धोबी घाट रोड यासह अंतर्गत रस्त्यांवरही खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहतूक कोंडी होते आहे. येत्या दोन दिवसात चौकातले खड्डे पूर्ववत न केल्यास ऐन गणेशोत्सवात गणेशभक्तांना कोंडीत अडकावे लागणार आहे.

हे ही वाचा…घोडबंदरमधील नागरिकांचा मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थान परिसरात ठिय्या

सिग्नलमुळे कोंडी वाढली ?

अंबरनाथ शहरात बसवण्यात आलेल्या सिग्नल यंत्रणेमुळे वाहतूक नियोजन कमी मात्र कोंडीच वाढल्याचे चित्र आहे. सिग्नलची वेळ संपलेली असतानाही वाहनचालक गाडी नेतात, मध्येच पादचारी रस्ता ओलांडतात, तसेच चौकातील खड्डे यामुळे अनेकदा सिग्नल चुकत असून त्यामुळे कोंडी सुटणे कमी मात्र वाढत असल्याचेच समोर आले आहे. या कोंडीवर तोगडा काढण्याऐवजी वाहतूक पोलीस चिंचोळ्या रस्त्यांवर वाहनचालकांचे कागदपत्रे तपासण्यात व्यस्त असल्याचे दिसून येते आहे.
फोटो आहे.