कल्याण : ऑक्टोबरमधील शरीराला घायाळ करणारी उष्णता सुरू झाली आहे. उकाडा, त्यात घामाच्या धारा अशा परिस्थितीत सामान्य लोकलमधून चेंगराचेंगरीत, घामाच्या धारा पुसत प्रवास करण्यापेक्षा बहुतांशी प्रवासी अलीकडे वातानुकूलित लोकलला पसंती देत आहेत. कल्याण, टिटवाळा, बदलापूर रेल्वे स्थानकांमधून सकाळच्या वेळेत सुटणाऱ्या वातानुकूलित लोकलना तुफान गर्दी असते. या गर्दीमुळे वातानुकूलित लोकलचे दरवाजे बंद होत नाहीत. या रेल्वे स्थानकांवरील महिला, पुरूष रेल्वे सुरक्षा बळाचे जवान, विशेष जवान यांना प्रवाशांना लोकल डब्यात लोटण्याची जबाबदारी दररोज पार पाडावी लागते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वातानुकूलित लोकलचे दरवाजे जोपर्यंत बंद होत नाहीत, तोपर्यंत लोकल सुरू होत नाहीत. वेळेत या लोकलचे दरवाजे बंद व्हावे म्हणून जवानांना वातानुकूलित लोकलच्या दरवाजात लटकत असलेल्या प्रवाशांना डब्यात कोंबण्यासाठी जवान सगळी ताकद लावत आहेत. वातानुकूलित लोकल सुरू होईपर्यंत जवानांची दमछाक होत आहे.

हेही वाचा : बाबा सिद्दिकी यांच्या हत्येनंतर आव्हाडांचे कार्यकर्ते सावध, एप्रिल महिन्यात आव्हाड यांनाही आली होती बिष्णोई टोळीची धमकी

वातानुकूलित लोकलमध्ये गर्दी असली तरी घामाच्या धारांचा त्रास, कपड्यांचा चिकचिकाट होत नाही. उकाडा होत नाही. किमान गार वातावरणात सुखाने प्रवास करता येतो, असा विचार करून प्रवासी गारेगार लोकलला पसंती देत आहेत. वातानुकूलित लोकलमधील वाढत्या गर्दीमुळे, डब्यातील चेंगराचेंगरीमुळे तिकीट तपासणीस सकाळ, संध्याकाळच्या वेळेत या लोकलमध्ये तिकीट तपासणीसाठी फिरकत नाहीत. त्यामुळे सामान्य लोकलमधील प्रवासीही या लोकलमध्ये घुसखोरी करून प्रवास करतात, अशा प्रवाशांच्या तक्रारी आहेत.

डोंबिवली रेल्वे स्थानकातून एकदा नऊ वाजताच्या दरम्यान सीएसएमटीकडे वातानुकूलित लोकल गेली की त्यानंतर थेट सव्वा दहा वाजता कल्याणकडून सीएसएमटीकडे जाणारी वातानुकूलित लोकल आहे. डोंबिवली रेल्वे स्थानकातून साडे आठ ते नऊ वाजताच्या दरम्यान मुंबईच्या दिशेने प्रवास सुरू केला की कार्यालयीन वेळेत मुंबईत पोहचता येते. त्यामुळे नऊच्या वेळेतील वातानुकूलित लोकलला प्रवाशांची तुडुंब गर्दी असते. प्रत्येक प्रवाशाची नऊची वातानुकूलित लोकल पकडण्याची धडपड असते. त्यामुळे या लोकलचे दरवाजे बंद होतात की नाही याची पर्वा न करता प्रवासी वातानुकूलित लोकलमध्ये जीवतोड करून चढतात.

हेही वाचा : नौपाड्यात इमारतीतील सदनिकेला आग

अनेक प्रवासी दरवाजात लटकून राहतात. अशा प्रवाशांमुळे वातानुकूलित लोकलचा दरवाजा बंद होत नाही. दरवाजे बंद होत नाहीत तोपर्यंत वातानुकूलित लोकल सुरू होत नाही. त्यामुळे कल्याण, डोंबिवली रेल्वे स्थानकांवरील रेल्वे सुरक्षा बळाचे जवान, विशेष जवान प्रत्येक डब्याजवळ उभे राहून दरवाजात लटकत राहणाऱ्या महिला, पुरूष प्रवाशांना डब्यात ढकलण्याचे काम करत आहेत. हा त्रास आम्हाला मे, जूनपर्यंत सहन करावा लागतो. एकदा पाऊस सुरू झाला वातावरणात थोडा थंडावा आला की हा त्रास कमी होतो, असे एका जवानाने सांगितले.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kalyan dombivli railway station ac local trains crowded with passengers due to heat css