नवी मुंबई परिवहन उपक्रमाच्या बस वेळेवर धावत नसल्याने डोंबिवलीतील प्रवासी, विद्यार्थी त्रस्त

वातानुकूलित बस बरोबर नियमित बसची सकाळच्या वेळेतील संख्या वाढवावी अशी मागणी

नवी मुंबई परिवहन उपक्रमाच्या बस वेळेवर धावत नसल्याने डोंबिवलीतील प्रवासी, विद्यार्थी त्रस्त

मागील काही महिन्यांपासून नवी मुंबई परिवहन उपक्रमाच्या बस डोंबिवलीत बस स्थानकात वेळेत येत नसल्याने सकाळच्या वेळेत नवी मुंबईत कामावर जाणारे प्रवासी त्रस्त आहेत. नवी मुंबईतील कार्यालयीन वेळ गाठण्यासाठी येथील बहुतांशी प्रवासी सकाळी आठ ते नऊ वाजताच्या दरम्यान नवी मुंबई परिवहन उपक्रमाच्या बस पकडून प्रवास करतात. या बस गेल्या काही महिन्यांपासून वेळेवर येत नसल्याने प्रवासी, विद्यार्थी त्रस्त झाले आहेत.

डोंबिवली पश्चिमेतील शास्त्रीनगर रुग्णालय जवळील बस थांब्यावरुन नवी मुंबईला जाणाऱ्या बस धावतात. डोंबिवलीतून लोकलने ठाणे येथे लोकल बदलून नवी मुंबईत जाण्यापेक्षा अनेक प्रवासी मधला आणि चढउतराचा त्रास नको म्हणून नवी मुंबई परिवहनच्या बसला प्राधान्य देतात. या बस काही महिन्यांपासून बहुतांशी अनियमित वेळेत येत असल्याच्या प्रवाशांच्या तक्रारी आहेत. नवी मुंबईतील कार्यालयीन वेळ गाठण्यासाठी बहुतांशी प्रवासी डोंबिवलीतून सकाळ आठ ते नऊच्या दरम्यान बसने प्रवास करतात. अलीकडे या बस वेळेवर येण्याचे प्रमाण कमी झाले आहे. वातानुकूलित बस सकाळच्या वेळेत असल्या तरी या बसचे तिकीट दर अधिक असल्याने सर्वच प्रवाशांना या बस परवडत नाहीत. त्यामुळे वातानुकूलित बस बरोबर नियमित बसची सकाळच्या वेळेतील संख्या वाढवावी अशा प्रवाशांची मागणी आहे.

सोमवारी सकाळी आठ ते नऊ वेळेत वेळेवर बस न आल्याने शास्त्रीनगर बस थांब्यावर नवी मुंबईत जाणाऱ्या प्रवाशांची एक किमीहून अधिकची रांग लागली होती. कामाचा पहिला दिवस, त्यात बस उशिरा त्यामुळे प्रवासी नाराजी व्यक्त करत होते. नवी मुंबईतील अनेक महाविद्यालय, विद्यापीठांमध्ये डोंबिवलीतील विद्यार्थी शिक्षणासाठी जातात. त्यांचीही बस वेळेवर धावत नसल्याने कुचंबणा होते. सकाळच्या वेळेत अर्धा ते पाऊण तास एकही बस येत नाही. मात्र अचानक एका‌वेळी दोन ते तीन बस बस थांब्यावर येतात, असा अनुभव चैत्राली महाडिक या प्रवाशाने सांगितला.

वर्गात वेळेवर गेलो नाहीतर अभ्यासक्रम बुडतो –

“डोंबिवली भागातून अनेक विद्यार्थी नवी मुंबईत महाविद्यालयीन शिक्षणासाठी जातात. नवी मुंबई परिवहन उपक्रमाच्या बस थेट महाविद्यालयांच्या दारात थांबत असल्याने विद्यार्थी या बसला प्रवासासाठी प्राधान्य देतात. या बस वेळेवर धावत नसल्याने महाविद्यालयात वेळेवर जाता येत नाही. वर्गात वेळेवर गेलो नाहीतर अभ्यासक्रम बुडतो.” असं ऐश्वर्या कुंडलिक या विद्यार्थीनीने सांगितले आहे.

लोकलच्या पास काढून ठाणेमार्गे प्रवास करण्याचा विचार –

“अनेक महिने नवी मुंबई परिवहनच्या बस वेळेत बस थांब्यावर येत नाहीत. कार्यालयात वेळेवर पोहचता येत नाही. त्यामुळे आता लोकलने लोकलच्या पास काढून ठाणेमार्गे प्रवास करण्याचा विचार करत आहे.” असं भगवान देशपांडे यांनी सांगितलं आहे.

वाहन कोंडीचा फटका –

प्रवाशांना सामान्य, वातानुकूलित बसमधून वेळेवर बस सेवा उपलब्ध होईल असेच नवी मुंबई परिवहन उपक्रमाचे बस परिचलनाचे नियोजन आहे. कल्याण-शिळफाटा रस्त्यावर काँक्रीटीकरणाचे काम सुरू आहे. मुसळधार पावसामुळे पडलेले खड्डे, त्यामुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीचा फटका बसना बसत आहे. शिळफाटा रस्त्यावर दोन-तीन तास बस कोंडीत अडकतात. त्यामुळे बस फेऱ्यांचे नियोजन कोलमडून पडते. चालकाला एकाच जागी बसून व्याधी जडत आहेत. या सर्व व्यवस्थेचा आर्थिक फटका उपक्रमाला बसतोच, त्याच बरोबर प्रवाशांनाही त्रास होतो. प्रवाशांना वेळेत बस उपलब्ध होतील. वेळेत बस धावतील अशा सक्त सूचना चालक, वाहकांना आहेत. अशी माहिती नवी मुंबई परिवहन उपक्रमातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. तर, अधिक माहितीसाठी ‘एनएमएमटी’ उपक्रमाचे महाव्यवस्थापक योगेश कुडुस्कर यांना संपर्क साधला. तो होऊ शकला नाही.

भागीदारीने प्रवास –

शास्त्रीनगर बस थांब्यावर बस वेळेत येत नसल्याने अनेक प्रवासी भागीदारीने रिक्षा, खासगी वाहन करुन नवी मुंबईत कामाच्या ठिकाणी प्रवास करतात. हा प्रवास कधीतरी ठीक, नियमित १०० ते १५० रुपये खर्च करुन हा प्रवास परवडत नाही, असे प्रवाशांनी सांगितले.

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Passengers and students of dombivli are suffering as the buses of navi mumbai transport corporation are not running on time msr

Next Story
ठाणे : खड्ड्यामुळे आणखी एकाचा बळी; जिल्ह्यात आतापर्यंत सहा जणांचा मृत्यू
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी