सकाळी मोकळ्या वातावरणात फिरायला गेलेल्या एका महिलेचे तोंड पाठीमागून येऊन दाबून त्यांना जमिनीवर पाडले. महिलेला फरफटत नेत तिच्या गळंयातील सोन्याचे चाळीस हजार रुपयांचे सोन्याचे मंगळसूत्र चोरुन नेणाऱ्या डोंबिवली पश्चिमेतील फुलेनगर झोपडपट्टीतील एका ३० वर्षाच्या चोरट्याला विष्णुनगर पोलिसांनी घटना घडल्याच्या बारा तासात अटक केली आहे.
हेही वाचा >>>डोंबिवली-कल्याणमधील १५०० वाहन चालकांवर वाहतूक विभागाची कारवाई
कनू राजू वाघरी (३०, रा. फुलेनगर झोपडपट्टी, ठाकुरवाडी, डोंबिवली पश्चिम) असे आरोपीचे नाव आहे. डोंबिवली पश्चिमेत गेल्या काही महिन्यांपासून सकाळ, संध्याकाळ फिरण्यासाठी, बाजारपेठेत जाणाऱ्या महिलांच्या गळ्यातील सोन्याचा ऐवज लुटून नेण्याचे प्रकार वाढले होते. याप्रकारांनी विष्णुनगर पोलिसांची डोकेदुखी वाढली होती. बंदोबस्त, गस्त वाढवुनही या चोऱ्या होत असल्याने अशा चोरट्यांच्या मागावर पोलीस होते.
हेही वाचा >>>ठाणे: दुचाकींची एकमेकांना धडक, भीषण अपघातात वडिलांचा मृत्यू; मुलगा जखमी
डोंबिवली पश्चिमेत देवी चौकात राहणाऱ्या कमल चौधरी (८५) या सकाळी सात वाजता मोकळ्या वातावरणात फिरण्यासाठी गेल्या होत्या. पंडित दिनदयाळ रस्त्याने माॅर्डन शाळेच्या पाठीमागील बाजुने त्या घरी चालल्या होत्या. अचानक पाठीमागून आलेल्या एका इसमाने त्यांना काही कळण्याच्या आत कमल यांचे तोंड पाठीमागून येऊन दाबले. त्यांना जमिनीवर पाडले. त्यांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र खेचून इसम पळून गेला. अचानक घडलेल्या या प्रकाराने कमल घाबरल्या. विष्णुनगर पोलीस ठाण्यात जाऊन त्यांनी तक्रार केली.
हेही वाचा >>>डोंबिवलीत पलावामध्ये घर मालकाकडून भाडेकरूला धमकी; घरातील सामान फेकले
वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरीनाथ भालेराव यांनी गुन्हे शोध पथकाचे उपनिरीक्षक कुलदीप मोरे, पी. के. भामरे यांचे तपासणी पथक तयार केले. घटना घडली त्या ठिकाणचे सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले असता त्यामध्ये चोरट्याचा चेहरा स्पष्ट दिसत होता. चित्रीकरणात दिसणारा इसम हा ठाकुरवाडीतील फुलेनगर भागात राहतो अशी गुप्त माहिती भामरे यांना मिळाली. साध्या वेशात जाऊन पोलिसांनी आरोपी कूनच्या घराच्या परिसराची पाहणी आणि तो तेथेच राहतो का याची खात्री केली. खात्री पटल्यावर वरिष्ठ निरीक्षक भालेराव, मोरे, भामरे, आर. डी पाटणकर यांच्या पथकाने सोमवारी रात्री कूनच्या घरावर छापा टाकून त्याला अटक केली. त्याच्याकडून सोन्याचे चोरलेले मंगळसूत्र ताब्यात घेण्यात आले.