Indian Railway Viral Video : भारतीय रेल्वेने प्रवास करणे सोईचे असले तरी त्यातील खाद्यपदार्थांच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाते. कारण- अनेकदा ट्रेनमधील जेवणात अळी, कीटक सापडल्याचे अनेक प्रकार समोर आले आहेत. याचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावरही अधूनमधून व्हायरल होत असतात. अशाच प्रकारे मुंबई- गोवा एक्स्प्रेसमधील (11099 LTT MAO Express) जेवणावर जवळपास सहा ते सात उंदीर फिरताना आढळल्याचा किळसवाणा प्रकार उघडकीस आला आहे. त्यानंतर संतापलेल्या प्रवाशाने सोशल मीडियावर या संदर्भातली पोस्ट शेअर केली आहे.
घडलेल्या या प्रकारामुळे भारतीय रेल्वेच्या प्रवासी सुरक्षा आणि स्वच्छता मानकांबद्दल चिंता निर्माण होत आहे. प्रवाशाला ट्रेनच्या पॅन्ट्री कारमधील जेवणावर जवळपास सहा ते सात उंदीर फिरताना दिसले. एक युजर आपल्या कुटुंबासह रेल्वेने प्रवास करीत होता. त्यादरम्यान त्याला पॅन्ट्रीमध्ये उंदीर पळताना दिसले. मग त्याने ही घटना आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात रेकॉर्ड केली.
त्यानंतर त्या प्रवाशाने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करीत लिहिले की, एक रेल्वे प्रवासी म्हणून माझ्यासाठी हा मोठा धक्का आहे. १५ ऑक्टोबर रोजी मी माझ्या कुटुंबासह ११०९९ मडगाव एक्स्प्रेसने प्रवास करीत होतो. त्या ट्रेनची नियोजित वेळ दुपारी १.४५ वाजता होती; पण ट्रेन ३.३० वाजता आली. रेल्वेचा फॅन असल्याने ट्रेनचे इंजिन कपलिंग (इंजिन ट्रेनला कसे जोडतात) कसे करतात हे रेकॉर्ड करण्याचा विचार केला. त्यानंतर ट्रेनच्या मागच्या दिशेने चालू लागलो; जिथे जाताना एक गोष्ट पाहून मला धक्काच बसला. पॅन्ट्री कार ट्रेनच्या मध्यमागी मला किमान सहा ते सात उंदीर दिसले; पण फक्त चार उंदरांचाच व्हिडीओ रेकॉर्ड करू शकलो.
याबाबत त्या प्रवाशाने आरपीएफकडे तक्रार करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा ते म्हणाले की, ट्रॅकखाली ४००- ५०० उंदीर आहेत. त्यातील चार ते पाच ट्रेनमध्ये घुसले, तर काय अडचण आहे? त्यानंतर तो असिस्टंट स्टेशनमास्तर मीना सर यांच्याकडे गेला. त्यांनी नंतर पॅन्ट्री मॅनेजरला बोलावले. त्यावर त्याने त्यांना झालेला सगळा प्रकार सांगितला. तेव्हा तो म्हणाला की, पॅन्ट्रीमध्ये खूप उंदीर आहेत. आता आपण काय करायचे? रेल्वे नेहमीच खटारा डबे पाठवते.
मंगिरीश तेंडुलकर नामक युवकाने ही घटना शेअर केली आहे. त्याने पुढे सांगितले की, शेवटी त्याने रेल मदत अॅपमध्ये तक्रार केली. त्यानंतर रेल मदतच्या अधिकाऱ्याने त्यांना आश्वासन दिले की, ते याबाबत आयआरसीटीसीला दंड ठोठावतील.
पहिल्या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, पॅन्ट्री कारमधील एका जेवणाच्या भांड्यात एक उंदीर काहीतरी खात आहे. मग दुसरा उंदीर त्या भांड्यावर झेपावतो आणि भांड्यात तोंड घालतो आणि मग पळून जातो. दुसऱ्या व्हिडीओमध्ये उंदीर पॅन्ट्रीच्या प्लॅटफॉर्मवर धावताना दिसत आहेत; जिथे कापलेल्या भाज्या उघड्यावर ठेवण्यात आल्या होत्या. जेवणाची अनेक भांडी, प्लॅटफॉर्म आणि खाद्यपदार्थांची उघडी पाकिटे पॅन्ट्रीमधील कपाटावर ठेवलेली होती.
हा व्हिडीओ ट्विटरवर @mumbaimatterz नावाच्या पेजने १८ ऑक्टोबरला शेअर करण्यात आला होता. त्यावर उत्तर देताना मुंबई विभाग मध्य रेल्वेने लिहिले की, सर, तुम्हाला झालेल्या गैरसोईबद्दल क्षमस्व! ऑन-बोर्ड कर्मचारी आणि पॅन्ट्री कर्मचाऱ्यांना स्वच्छतेबाबत जागरूक करण्यात आले आहे. पॅन्ट्री कारमध्ये पेस्ट कंट्रोल सुविधा वाढवली जात आहे.
या पोस्टला प्रतिसाद देत आयआरसीटीसीने लिहिले की, या प्रकरणाची गंभीर दखल घेण्यात आली असून, योग्य ती कारवाई करण्यात आली आहे. पॅन्ट्री कारमधील स्वच्छता आणि सुनिश्चित करण्यासाठी पॅन्ट्री कार कर्मचाऱ्यांना जागरूक करण्यात आले आहे. स्वच्छतेसाठी पेस्ट कंट्रोलची सुविधा वाढवण्याचा सल्ला दिला जात आहे. पण, घडलेल्या घटनेवर प्रवाशांनी मात्र संताप व्यक्त केला आहे.
एका प्रवाशाने लिहिले की, प्रत्येक पॅन्ट्री कारमध्ये समान परिस्थिती असेल. तर, दुसऱ्या एका युजरने ट्रेन प्रवासादरम्यान आलेल्या अनुभवाबद्दल लिहिलेय की, १२ ऑक्टोबरला मी कोणार्क एक्स्प्रेसने मुंबईला जात असताना मला उपमामध्ये कीटक सापडला. अशा प्रकारे अनेकांनी कमेंट्स करीत तक्रारी केल्या आहेत.