कडक उन्हाळा, शहरातील वाढती लोकसंख्या आणि झपाटय़ाने होत असलेला विस्तार बघता महापालिकेच्या अग्निशमन विभागाकडे आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पुरेशी यंत्रणा नसल्याचे समोर आले आहे. शहरात आठ अग्निशमन केंद्रे आहेत. ४० ते ४५ मोठय़ा गाडय़ांची आवश्यकता आहे. मात्र, प्रत्यक्षात आगीचे बंब केवळ २३ असून त्यातील अनेक नादुरुस्त आहेत तर काही केंद्रांवर गाडय़ा असताना चालक नसल्याचे समोर आले आहे.
महापालिका शहरातील आपत्ती व्यवस्थापनाबाबत अनेक दावे करीत आहे. अग्निशमन यंत्रणा सक्षम असल्याचे सांगत असली तरी दरवर्षी उन्हाळ्यामध्ये लागणाऱ्या आगी आणि शहरातील जीर्ण इमारतींची पडझड बघता महापालिकेचा अग्निशमन विभाग सक्षम नसल्याचे दिसून येते. महापालिकेचे अधिकृत पाच केंद्र आणि तीन उपकेंद्र आहेत. साधारणत: शहराची लोकसंख्या बघता प्रत्येक केंद्रात किमान ३ गाडय़ा असणे आवश्यक आहे तर लकडगंज आणि सिव्हील लाईन केंद्र सोडले तर अन्य केंद्रात केवळ २ आगीचे बंब असल्यामुळे अनेकदा घटना घडल्यानंतर दुसऱ्या केंद्रातून गाडय़ा बोलविण्याची वेळ येते. जवळपास १५ पेक्षा अधिक आगीचे बंब हे नादुरस्त आहेत. ते भंगारात काढल्यानंतरही नवीन खरेदी केले जात नाहीत.
गेल्यावर्षी शहरात आगीच्या ११० पेक्षा जास्त घटना घडल्या. आगीचे बंब पुरेसे नसल्यामुळे आणि कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी असल्यामुळे आग विझवण्यासाठी आहे त्या कर्मचाऱ्यांना चांगलीच कसरत करावी लागली. महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागातही कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी असल्यामुळे अनेकदा गाडी तयार असली तरी चालक मिळत नसल्यामुळे आगीवर नियंत्रण मिळविणे कठीण होत असते. नादुरस्त असलेल्या अनेक गाडय़ा अग्निशमन विभागाच्या विविध केंद्रात धूळखात पडून आहेत. मात्र त्याबाबत काहीच निर्णय घेतला जात नाही. महापालिका प्रशासनाला अनेकदा नवीन आगीचे बंबासह अन्य साधनांसाठी प्रस्ताव देण्यात आले. मात्र, त्याबाबत गेल्या दोन वर्षांत कुठलीच कारवाई करण्यात आली नाही. पंधरा वषार्ंपूर्वीची यंत्रणेचा वापर आजही केला जात असल्यामुळे ती यंत्रणा खराब झाली आहे. त्याच्या दुरुस्तीवर लाखो रुपये खर्च केले जातात. मात्र, नवीन यंत्रसामुग्री विकत घेतली जात नाही.
शहराचा विस्तार होत आहे. लोकसंख्या ३० लाखांच्यावर आहे. जिल्ह्य़ात एखादी आगीची घटना घडली की अग्निशमन विभागाला बोलविले जाते. मात्र, त्या तुलनेत यंत्रसामुग्री आणि मनुष्बळ पुरेसे नसल्याचे समोर आले आहे. उंच इमारतीला लागलेली आग विझविण्यासाठी टीटीएल मशीनची गरज असताना गेल्या पाच वषार्ंपासून त्यासाठी केवळ निविदा काढली जाते. मात्र, प्रत्यक्षात त्याबाबत काहीच निर्णय होत नाही. आगीच्या घटनांवर मात करण्यासाठी एकूण पाचशे कर्मचारी हवे. गेल्या अनेक वषार्ंपासून तोकडय़ा कर्मचाऱ्यांच्या बळावर अग्निशमन विभाग धापा टाकत आहे. अनेकदा या संदर्भात महापालिका प्रशासनाला सांगण्यात आले मात्र, या विभागाचे बळकटीकरण करण्यात आले नाही.
अनेक गाडय़ा नादुरुस्त, अपुरे मनुष्यबळ अत्याधुनिक यंत्रसामुग्रीची गरज -उचके
या संदर्भात अग्निशमन विभागाचे अधिकारी राजेंद्र उचके यांनी सांगितले, शहराच्या तुलनेत आगीच्या बंबांची संख्या कमी असली तरी विभागासमोर पर्याय नाही. लकडगंज आणि सिव्हील लाईन या केंद्रांमध्ये चार गाडय़ा आहेत. मात्र, चालक केवळ दोन आहेत. त्यामुळे एखादी मोठी घटना घडली तर दोनच गाडय़ा पाठविल्या जाऊ शकतात. भंगारात असलेल्या आगीच्या बंबांबाबत प्रशासन निर्णय घेत नाही. त्यामुळे ते केंद्रात पडून आहेत. आगीच्या घटना बघता आगीच्या बंबांसह अत्याधुनिक यंत्रसामुग्रीची गरज आहे.