हार्मोन्स हे व्यक्तीच्या शरीरामध्ये असणारे रासायनिक संदेशवाहक असतात. ते शरीरातील विविध ऊती आणि अवयवांना परिस्थितीनुसार प्रतिसाद देण्यासाठी प्रोत्साहन देतात. उदाहरण द्यायचे झालेच तर, प्रोलॅक्टिन नावाचा हार्मोन हा स्त्रियांमध्ये दूध निर्माण करण्यास उत्तेजन देतात. हार्मोन्स एकापेक्षा अनेक कामे करण्यास सक्षम असतात. असे हे वर्तनात्मक हार्मोन्स, परिस्थिती व वातावरण यानुसार काम करीत असतात. बऱ्याचदा हार्मोन्सची चर्चा ही इस्ट्रोजेन आणि टेस्टोस्टेरॉनसारख्या 'सेक्स हार्मोन्स'वर केंद्रित केली जाते. मात्र, प्रत्यक्षात दैनंदिन जीवनात शरीराला योग्य पद्धतीने कार्यरत ठेवण्याचे काम हे हार्मोन्स करीत असतात. त्यामध्ये, चालणे, झोपणे, पचन, पोषक घटक शरीरात शोषून घेणे, मूड यासांरख्या विविध क्रियांचा समावेश आहे. हार्मोन्स व्यक्तीच्या शरीरातील विविध ऊती आणि अवयवांना संदेश पोहोचविणारे रासायनिक संदेशवाहक असून एंडोक्रायनोलॉजी (अंतःस्रावी) प्रणालीचा एक भाग आहेत. या हार्मोन्सची दोन महत्त्वाच्या कामांपैकी एक काम म्हणजे हार्मोन्स निर्माण करणाऱ्या दोन अंतःस्रावी ग्रंथींमध्ये संवाद साधणे. हेही वाचा : सुजाता सौनिक ठरल्या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्य सचिव! कसा होता त्यांचा प्रवास पाहा…. इतकेच नाही तर, स्वादुपिंड जेव्हा रक्तप्रवाहातून ग्लुकोज शोषून घेण्यासाठी इन्सुलिन सोडते तेव्हा हे हार्मोन्स अंतःस्रावी ग्रंथींमधून अवयव किंवा ऊतींना खास संदेशदेखील पाठवू शकतात. शास्त्रज्ञांनी केलेल्या संशोधनानुसार, मनुष्याच्या शरीरात तब्बल ५० पेक्षा जास्त हार्मोन्स असू शकतात, असे स्पष्ट होते. मात्र, त्यापेक्षाही अधिक हार्मोन्स अस्तित्वात असण्याची शक्यता असल्याचे मेडिकल न्यूज टुडेच्या एका लेखावरून समजते. अंतःस्रावी ग्रंथी हार्मोन्स तयार करतात. त्यामध्ये थायरॉईड हार्मोन्स, पिट्युटरी ग्रंथी, टेस्टोस्टेरॉन, एस्ट्रोजन सोडणारे अंडाशय, इन्सुलिन अशी हार्मोन्सची विविध उदाहरणे आहेत. तर, वैद्यकीय वापरासाठी शास्त्रज्ञांनी कृत्रिम हार्मोन्सदेखील तयार केले आहेत. जसे की, सिंथेटिक ऑक्सिटोसिन हे प्रसूतीदरम्यान वापरले जाणारे कृत्रिम हार्मोन आहे. शरीरामध्ये असणारे महत्त्वाचे हार्मोन्स स्टिरॉइड हार्मोन्स : शरीरातील कोलेस्ट्रॉलपासून हे हार्मोन्स तयार होतात. इस्ट्रोजेन आणि टेस्टोस्टेरॉन यांसारखे अनेक सेक्स हार्मोन्स हे स्टिरॉइड हार्मोन्स असतात. पेप्टाइड हार्मोन्स आणि अँटीड्युरेटिक हार्मोन : पेप्टाइड हार्मोन्समध्ये तीन किंवा त्याहून अधिक अमिनो अॅसिडचा समावेश असतो; तर अँटीड्युरेटिक हार्मोन हे चयापचय क्रियेसाठी मदत करीत असतात. ऑक्सिटोसिन हार्मोन [cuddle hormone] : ऑक्सिटोसिन हार्मोन किंवा ज्याला कडल हार्मोन, असे म्हणतात. हे हार्मोन्स बाळंतपणामध्ये अतिशय महत्त्वाची भूमिका बजावतात. हेही वाचा : एकोणिसाव्या वर्षी झाली ‘CA’! गिनीज बुकातदेखील नोंद! कोण आहे ही तरुणी ते घ्या जाणून…. स्त्रियांमधील महत्त्वाचे सेक्स हार्मोन्स : पुरुषांच्या तुलनेमध्ये स्त्रियांमध्ये सेक्स हार्मोन्सचे प्रमाण अधिक असते. महिलांच्या शरीरातील हे हार्मोन्स प्रजनन क्षमता, पौगंडावस्था, कामवासना यांसारख्या विविध लैंगिक विकासात मदत करतात. खरे तर स्त्रियांमध्ये अंडाशय ही हार्मोन्स तयार करणारी महत्त्वाची अंतःस्रावी ग्रंथी असली तरीही इतर उतीदेखील हे काम करू शकतात. महिलांमधील हार्मोन्स हे परिस्थिती आणि आरोग्यानुसार बदलत असतात. उदाहरण द्यायचे झाले तर, मासिक पाळीत स्त्रियांमधील सेक्स हार्मोन्समध्ये मोठ्या प्रमाणात बदल होत असतात; विशेषतः 'मेनोपॉज'दरम्यान. मेनोपॉजच्या वेळी स्त्रियांच्या शरीरात इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉनची मोठ्या प्रमाणात घट होते. वयाच्या साधारण ४५ ते ५६ वर्षांच्या टप्प्यात असताना स्त्रियांमध्ये ही प्रक्रिया होत असते. मात्र, हार्मोन्सची संख्या कमी होण्यासाठी वय हे एकमेव कारण नसून, इतर गोष्टींचादेखील शरीरावर प्रभाव पडत असतो. त्या शरीरावर प्रभाव टाकणाऱ्या बाबी खालीलप्रमाणे : शस्त्रक्रिया : शस्त्रक्रियेदरम्यान अंतःस्रावी ग्रंथी काढून टाकल्यास, त्याचा हार्मोन्सच्या निर्मितीवर त्वरित परिणाम होतो. उदाहरणार्थ, शस्त्रक्रियेदरम्यान अंडाशय काढून टाकल्यास शरीर सेक्सच्या हार्मोन्सची निर्मिती करू शकणार नाही. वैद्यकीय उपचार : शस्त्रक्रियेप्रमाणेच जर व्यक्ती काही वैद्यकीय उपचार घेत असेल, तर त्यांचा दुष्परिणाम हार्मोन्सवर होत असतो. हा औषधोपचार अथवा जाणीवपूर्वक केलेल्या वैद्यकीय उपचाराचा परिणाम असू शकतो. स्वयंप्रतिकार रोग : अशा आजारांमध्ये शरीर स्वतःहून व्यक्तीच्या निरोगी उतींवर हल्ला करीत असते. त्यामुळे अशा परिस्थितीत अंतःस्रावीवर हल्ला झाल्यास त्याचा थेट परिणाम हार्मोन्सच्या निर्मितीवर होऊ शकतो. असंतुलित हार्मोन्सची लक्षणे : गर्मभधारणा, अनियमित मासिक पाळी, झोपेच्या तंत्रातील बिघाड, विविध त्वचाविकार, असंतुलित शारीरिक तापमान, वजन अचानक कमी होणे वा वाढणे यांसारख्या इतर गोष्टीदेखील असंतुलित हार्मोन्सची लक्षणे आहेत. हेही वाचा : मातृभाषेत पुस्तक लिहून कमावले ‘आंतरराष्ट्रीय बुकर पारितोषिक!’ पाहा कसा होता गीतांजली श्री यांचा प्रवास…. हार्मोन्स व्यक्तीच्या आयुष्यातील अतिशय महत्त्वाचा घटक आहे. हार्मोन्स केवळ लैंगिक जीवनासाठी महत्त्वाचे ठरत नाहीत. तर, मनुष्याला भूक लागणे, त्याची चयापचय क्रिया व्यवस्थित राखणे, शरीराचे तापमान संतुलित ठेवणे यांसारख्या इतर अनेक आवश्यक कार्यांसाठीदेखील ते महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असतात. त्यामुळे आरोग्य जपण्यासाठी हार्मोन्स संतुलित आहेत की नाही हे समजणे आवश्यक आहे. त्यासाठी डॉक्टरांचा सल्ला आवर्जून घ्यावा. कोणत्याही प्रकारे स्वतःच स्वतःची तपासणी करून, आरोग्यविषयक अंदाज करू नये. अशा स्वरूपाची सर्व माहिती मेडिकल न्यूज टुडेच्या [medical news today] एका लेखावरून मिळाली आहे.