रोहित पाटील

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हैद्राबादच्या एलबी स्टेडियमवर तेलंगणाचे नवे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्याबरोबर काँग्रेस पक्षाच्या अन्य ११ आमदारांनीही मंत्रीपदाची शपथ घेतली. या शपथविधीच्या वेळी दानसारी अनसूया- अर्थात मुलुगुतल्या आमदार सीथाक्का यांचं नाव पुकारलं गेलं, तेव्हा उपस्थित जनसमुदायानं एकच जल्लोष केला. अर्थात त्यामागचं कारण म्हणजे लोकांमध्ये त्यांची असलेली लोकप्रिय नेत्याची छबी.

सीथाक्का या आदिवासी कुटुंबातून आलेल्या. त्यात त्यांना नक्षलवादाची पार्श्वभूमी. पण आज त्यांनी आपल्या कामातून तीन वेळा निवडून येण्याचा पराक्रम केला आहे. पैशांच्या बळावर, धाकदपटशाचा वापर करून मतं मिळवण्याच्या काळात स्वत:च्या कामावर श्रद्धा ठेवून त्याच्या बळावर निवडून येण्याची उदाहरणं विरळा आहेत. सीथाक्कांच्या प्रचाराला ना कोणी स्टार प्रचारक होता, ना कोणी काँग्रेसचा मोठा राजकीय नेता. त्यांचं काम हाच त्यांचा प्रचार होता. अशा परिस्थतीत ५२ वर्षांच्या सीथाक्का तिसऱ्यांदा निवडून आल्या आणि त्यांनी मंत्रपदाची शपथ घेतली. त्यांना अनुसूचित जमाती (एस.टी.) कल्याण मंत्रालयाची जबाबदारी सोपवण्यात येईल अशी चर्चा आहे.

आणखी वाचा-“तू गरोदर दिसतेयस”, बॉडी शेमिंगविरोधात अँकरने दिलं अंतर्मुख करणारं उत्तर! दिसण्यावरून डिवचण्याआधी हे वाचाच!

नक्षलवादी ते आमदारकीची तिसरी टर्म, हा सीथाक्कांचा प्रवास खडतर आहेच, पण त्यांनी तो यशस्वीपणे पार केला. आदवासीबहुल भागातून आलेल्या व्यक्तीसाठी ते सोपंही नव्हतं. वयाच्या १४ व्या वर्षी नक्षली आंदोलनानं प्रेरित होऊन आपल्या समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी त्या नक्षली चळवळीत सहभागी झाल्या होत्या. १० वर्षं नक्षली चळवळीत काम करत असतानाच गरीब लोकांसाठी काम करत होत्या. त्यामुळे अल्पावधीतच त्या वंचित आदिवासी समाजात लोकप्रिय झाल्या. नक्षली संघटनेत कार्यरत असताना सहा ते सात वेळा पोलिसांशी झालेल्या चकमकीतून त्या वाचल्या. तरीही आपल्या समाजाला न्याय मिळवून देण्याच्या भावनेतून मागे हटल्या नाहीत. नंतर सरकारनं नक्षलींविरोधात कडक पावलं उचलल्यानं त्यांनी वयाच्या २५ व्या वर्षी आत्मसमर्पण केलं. पण आपल्या समाजासाठीचं कार्य चालू ठेवलं. पुढे आपलं शिक्षण पूर्ण करून त्या वकील झाल्या. वरंगल जिल्हा न्यायालयात काही काळ वकिलीसुद्धा केली. त्यांचं सामाजिक काम पाहून आंध्र प्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी त्यांना राजकारणात येण्याचा सल्ला दिला आणि त्या ‘तेलुगू देसम्’ पक्षात सहभागी झाल्या. पहिल्या निवडणुकीत त्यांना हार पत्कारावी लागली. पुन्हा २००९ ला त्याच पक्षातून निवडणूक लढवली आणि मोठ्या फरकानं त्या निवडून आल्या. इथूनच त्यांचं दानसारी अनसूया पासून ‘सीथाक्का’ (मोठी बहीण) असं नामकरण झालं. पक्षातील अंतर्गत कलहामुळे त्यांनी २०१७ मध्ये तेलुगू देसम् पक्ष सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला. दुसऱ्यांदा निवडून आल्यावर सीथाक्का यांची एक लोकप्रिय नेता म्हणून ओळख निर्माण झाली.

आणखी वाचा-खडतर परिस्थिती, प्रशिक्षणादरम्यान वडिलांचं निधन, IAS अधिकारी रितिका जिंदलचा प्रेरणादायी प्रवास

सीथाक्का यांचा जन्म ९ जुलै १९७१ चा. एका आदिवासी कुटुंबातला. आई-वडील हे शेतकरी. त्या वेळी त्यांच्या आदिवासीबहुल भागात जमीनदार, वतनदार, जमीनीची दलाली करणारे, यांचं वर्चस्व होतं. शेतकऱ्यांचा ते अमानुष छळ करीत. आदिवासी असल्यानं त्यांचं कोणत्याही बँकेत खातं नसे. त्यामुळे शेतीसाठी जमीनदार, वतनदार लोकांकडून आदिवासींना कर्जं घ्यावी लागत. कर्ज वेळेवर न फेडल्यास आदिवासींकडून जमीनी हडपण्याचे प्रकार चालत. सीथाक्का हे सर्व लहानपणापासून बघत असल्यानं त्यांच्या मनात त्याबद्दल चीड होती. आपण आपल्या समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे, या विचारानं त्या पेटून उठल्या आणि त्यांनी काम सुरू केलं.

करोनाकाळात सीथाक्का यांनी ‘गो हंगर गो’ कॅम्पेनद्वारे स्थलांतरित मजुरांसाठी मोफत जेवण पुरवलं. आपल्या मतदारसंघात समाविष्ट असणाऱ्या प्रत्येक गावागावात जाऊन अगदी डोंगराळ भागातही, कधी बैलगाडी, तर कधी धान्याची पोती स्वत:च्या डोक्यावर घेऊन चालत जाऊन घराघरांत मोफत शिधा, औषधं, सॅनिटायझर, मास्कचं वाटप केलं. गावांत प्रत्येक घर, शाळा, कॉलेजात प्रत्यक्ष जाऊन सॅनिटायझेशन करून घ्यायला सुरूवात केली. काम करताना सहकारी थकले, तर त्यांनी स्वत:सुद्धाही सॅनिटायझेशन करण्यास मदत केली. करोनाकाळात आपल्या मतदारसंघात, तसंच आजूबाजूच्या परिसरात जवळपास ५०० गावांत त्यांनी सामाजिक काम पार पाडलं. या काळातील सीथाक्का यांच्या कामाची दखल The huffpost.com या अमेरिकेच्या माध्यमानंही घेतली. सीथाक्का यांना देशपातळीवरच नाही, तर आंतरराष्ट्रीय पातळीवरही त्यांना त्यांच्या कामाची पावती मिळाली. त्यांनी असंख्य सामाजिक, आर्थिक अडचणींमधून पार केलेला आजवरचा प्रवास दखल घेण्याजोगाच.

lokwomen.online@gmail.com

मराठीतील सर्व चतुरा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Naxalites lawyers and mlas for a third term the story of sithakka mrj