नागपूर : राज्याचे अर्थमंत्री व विदर्भाचे पुत्र देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी सादर केलेल्या २०२३-२४ च्या अर्थसंकल्पात राज्याची उपराजधानी नागपूरसह विदर्भाला झुकते माप देण्यात आले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कृषी, शिक्षण ,आरोग्य, सिंचन, पर्यटन, पायाभूत सुविधांसह उद्योगवाढीसाठी या अर्थसंकल्पात अनेक घोषणा करण्यात आल्या आहेत. त्यात प्रामुख्याने नागपूर, अमरावती व बुलढाणा जिल्ह्यात एकूण चार संत्री प्रक्रिया केंद्र, नागपुरात २२८ कोटींचे आंतरराष्ट्रीय कृषी सुविधा केंद्र, मिहान प्रकल्पासाठी १०० कोटींच्या तरतुदीसह रिद्धपूरला (अमरावती जिल्हा) मराठी विद्यापीठाची स्थापना आणि नागपूरच्या एलआयटीसह अमरावतीची शासकीय विज्ञान संस्था आणि हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाला अभिमत विद्यापीठाचा दर्जा देण्याच्या घोषणांचा समावेश आहे.

शिंदे-फडणवीस सरकारच्या काळात विदर्भातील विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत झालेला भाजपचा दणदणीत पराभव आणि पुढच्या वर्षी होणाऱ्या लोकसभा आणि महापालिका निवडणुका या पार्श्वभूमीवर वैदर्भीय अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस अर्थसंकल्पात विदर्भासाठी कोणत्या घोषणा करणार याकडे लक्ष लागले होते. फडणवीस यांनी विदर्भ आणि नागपूरला झुकते माप दिल्याचे स्पष्ट झाले आहे.

पायाभूत सुविधा..
नागपूर-गोवा महामार्ग, नागपूर मेट्रो टप्पा-२ नागपूर, अकोला, अमरावती येथील विमानतळाचा विस्तार, रखडलेल्या मिहान प्रकल्पाचा विचार अर्थसंकल्पात करण्यात आला आहे. नागपूर येथे एक हजार एकरवर लॉजेस्टिक हब, इकॉनॉमी पार्क निर्माण करण्यात येणार आहे.

आरोग्य..
अमरावती, भंडारा, गडचिरोली, वर्धा व बुलढाणा या पाच जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या बांधकामासाठी निधी देण्यात येणार असून नागपूरमध्ये नवीन व्यसनमुक्ती केंद्र सुरू करण्यात येणार आहे.

क्रीडा..
नागपूर विभागीय क्रीडा संकुलासाठी १०० कोटी तर अमरावतीच्या हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाला अभिमत विद्यापीठाचा दर्जा देण्याची घोषणा करण्यात आली आहे.

आफ्रिकन सफारी व पक्षी उद्यान..
पर्यटन विकासासाठी नागपूरच्या गोरेवाडा प्राणी संग्रहालयात आफ्रिकन सफारी व पक्षी उद्यान उभारण्याची घोषणा करण्यात आली आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त वर्धा जिल्ह्यातील आष्टी येथे तर विदर्भातील जंगल सत्याग्रहाचे स्मरण म्हणून तीन ठिकाणी स्मारके उभारण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे अमरावती येथे रा.सू. गवई स्मारकासाठी २५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

तीन शिक्षण संस्थांना अभिमत दर्जा
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, लक्ष्मीनारायण इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी नागपूर आणि शासकीय ज्ञान, विज्ञान संस्था अमरावती यांना अभिमत विद्यापीठाचा दर्जा देण्यात आला आहे. तसेच नागपूरच्या महाराष्ट्र विधि विद्यापीठाला इमारत बांधकामासाठी निधी देण्यात येणार आहे.

कृषी, सिंचन क्षेत्र..
विदर्भात चार संत्रीप्रक्रिया केंद्रे (नागपूर जिल्ह्यात दोन व अमरावती व बुलढाणा प्रत्येकी एक), नागपूरच्या डॉ. पंजाबराव देशमुख कृषी महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय कृषी सुविधा केंद्र (२२८ कोटी) सुरू करण्यात येणार आहे. गोसे खुर्द प्रकल्पाला १५०० कोटी, वैनगंगा-नळगंगा-पैनगंगा नदीजोड प्रकल्पातून नागपूर, वर्धा, अमरावती, यवतमाळ, अकोला, बुलढाणा, वाशीम, जिल्ह्यांना पाणी देण्याची घोषणा, विदर्भ-मराठवाडय़ातील ११ जिल्ह्यात दुग्ध विकासासाठी १६० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

मराठीतील सर्व अर्थसंकल्प २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Announcement of establishment of international agricultural facility center in nagpur amy