मुंबई : राज्याच्या अर्थसंकल्पात अनेक नवी मंडळे आणि योजनांची घोषणा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नमो शेतकरी महासन्मान निधी
पंतप्रधानमंत्री कृषी सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर राज्यातील शेतकऱ्यांसाठी ‘नमो शेतकरी महासन्मान निधी योजना’ जाहीर केली आहे. यामध्ये प्रतिवर्ष प्रति शेतकऱ्यासाठी राज्य सरकार सहा हजार रूपये अनुदान देणार आहे. केंद्राचे सहा आणि राज्याचे सहा असे बारा हजार राज्यातील प्रत्येक शेतकऱ्याला मिळणार आहेत. यासाठी २०२३-२४ मध्ये सहा हजार ९०० कोटी रूपयांची तरतूद केली आहे. याचा एक कोटी १५ लाख शेतकऱ्यांना लाभ होणार आहे.

एक रुपयात पीक विमा
राज्यातील शेतकऱ्यासाठी एक रूपयात पीक विमा योजना जाहीर केली आहे. शेतकऱ्यांना केवळ एक रुपया भरून प्रधानमंत्री पीक विमा संकेतस्थळावर नोंदणी करता येईल. यासाठी तीन हजार कोटी ३१२ कोटी रुपये निधीची तरतूद केली आहे.

महाकृषिविकास योजना
शेतीच्या शाश्वत विकासासाठी ‘महाकृषिविकास अभियान’ योजना जाहीर केली आहे. यामध्ये पीक, फळपीक या मुलभूत घटकाच्या उत्पादनापासून ते मुल्यवर्धनापर्यंतची प्रक्रिया याचा समावेश आहे. यासाठी पुढील पाच वर्षांसाठी तीन हाजर कोटी तरतूद केली आहे.

महाराष्ट्र श्री अन्न अभियान
संयुक्त राष्ट्र संघाच्या धर्तीवर तृणधान्याचा प्रचार, प्रसार, उत्पादकता वाढवण्यासाठी महाराष्ट्र श्री अन्न अभियान प्रारंभ केले आहे. यासाठी २०० कोटींची तरतूद केली आहे.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवन
कृषी उत्पन्न बाजार समिती असलेल्या ठिकाणी शेतकरी बांधवांना मुक्कामासाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवन बांधण्यात येणार आहेत.

गोसेवा आयोग
देशी गोवंशाचे संवर्धन, संगोपन व संरक्षण व्हावे यासाठी महाराष्ट्र गोसेवा आयोगाची स्थापना करण्यात येणार आहे.

युनिटी मॉल
ग्रामीण महिला सक्षमीकरणासाठी बचत गटातील ३७ लाख महिलांसाठी उपजिविकेचे साधन म्हणून ‘बांबू क्लस्टर’ व कोल्हापूर जिल्ह्यत ‘कोल्हापुरी चप्पल क्लस्टर’ विकसित करण्यात येणार आहे. केंद्र शासनाने अर्थसंकल्पात घोषित केल्याप्रमाणे मुंबई येथे युनिटी मॉलची स्थापना करण्यात येणार आहे.

मोदी आवास घरकुल योजना
इतर मागासवर्गीय घटकातील लाभार्थ्यांसाठी पुढील तीन वर्षांत १० लाख घरे ‘ मोदी आवास’ योजनेच्या नावाने बांधण्यात येणार आहेत.

विविध समाज घटकांसाठी महामंडळे
विविध समाजासाठी महामंडळांची स्थापना करण्यात आली असून प्रत्येक महामंडळासाठी ५० कोटी भागभांडवल देण्यात आले आहे.
लिंगायत समाजातील तरुणांसाठी जगदज्योती महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महांडळ
गुरव समाजासाठी संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महांडळ
रामोशी समाजातील युवकासाठी राजे उमाजी नाईक आर्थिक विकास महांडळ
वडार समाजातील युवकासाठी कै. मारूती चव्हाण आर्थिक विकास महांडळ

नवी प्राधिकरणे
श्री क्षेत्र ज्योतिबा परिसर संवर्धन प्राधिकरण स्थापन करून विकास केला जाईल. यासाठी ५० कोटींची तरतूद केली जाणार आहे.
मराठी भाषेचा प्रचार-प्रसार करण्यासाठी मराठी भाषा युवक मंडळे स्थापन करण्यात येणार आहेत.

रिक्षा चालकांसाठी महामंडळ
राज्यातील ऑटोरिक्षा, टॅक्सीचालक व मालकांसाठी महाराष्ट्र राज्य ऑटोरिक्षा व टॅक्सी चालक-मालक कल्याणकारी महामंडळ स्थापन करण्यात येणार आहे.

मराठीतील सर्व अर्थसंकल्प २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Finance minister devendra fadnavis announced many new boards and schemes in the state budget mumbai amy