मुंबई : मुंबईसह राज्यात पायाभूत सुविधा विकसित करण्यासाठी राज्याच्या अर्थसंकल्पात भरीव तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे पायाभूत सुविधा प्रकल्पांना गती मिळणार आहे. मात्र आगामी अर्थसंकल्पात एकही मोठा नवीन प्रकल्प जाहीर करण्यात आला नसून जुने आणि काम सुरू असलेले प्रकल्प पूर्णत्वास नेणे, तसेच घोषित प्रकल्पांच्या कामास सुरुवात करणे यावर अर्थसंकल्पात भर देण्यात आला आहे. त्यानुसार मुंबई-नागपूर समृद्धी महामार्ग, बाळासाहेब ठाकरे स्मारकाचा पहिला टप्पा आणि मुंबई पारबंदर प्रकल्प या वर्षांत पूर्ण करण्याकडे राज्य सरकारचा कल आहे, तर मुंबई महानगर प्रदेशातील मेट्रो मार्गिकांची कामे सुरू करणे, तसेच विरार- अलिबाग बहुउद्देशीय महामार्गिकेचे काम मार्गी लावणे हाही प्राधान्यक्रम आहे.
अर्थमंत्र्यांनी मुंबई वा राज्यासाठी एकही नवीन मोठा प्रकल्प घोषित केलेला नाही. मात्र त्याच वेळी काम सुरू असलेले आणि जुने प्रकल्प पूर्णत्वास नेण्यासाठी आणि घोषित प्रकल्प सुरू करण्यासाठी अर्थसंकल्पात भरीव तरतूद करण्यात आली आहे. राज्यातील सध्याचा सर्वात मोठा आणि महत्त्वाकांक्षी असा मुंबई- नागपूर समृद्धी महामार्ग पूर्ण करणे हे मुख्य उद्दिष्ट आहे. ७०१ किमी महामार्गातील नागपूर- शिर्डी असा ५२० किमीचा टप्पा डिसेंबर २०२२ मध्ये सुरू झाला आहे. या मार्गावरून आतापर्यंत दहा लाखांहून अधिक वाहनांनी प्रवास केल्याची माहिती फडणवीस यांनी दिली. तर उर्वरित टप्प्याचे ८८ टक्के काम पूर्ण झाले असून संपूर्ण मार्ग डिसेंबरमध्ये सेवेत दाखल करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) इंदू मिल येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक बांधत आहे. या स्मारकाचे काम २०२५ मध्ये पूर्ण होईल, असे फडणवीस यांनी या वेळी जाहीर केले. यासाठी आगामी वर्षांच्या अर्थसंकल्पात ७४१ कोटी रुपयांहून अधिक निधीची तरतूद करण्यात आली आहे. बाळासाहेब ठाकरे स्मारकासाठी ३५१ कोटी रुपयांची तरतूद करून या प्रकल्पाचा पहिला टप्पा मे २०२३ मध्ये पूर्ण करण्याचा संकल्प सोडण्यात आला आहे. मुंबई, मुंबई महानगर प्रदेशातील वाहतूक व्यवस्था बळकट करण्यासाठी मेट्रो मार्गिकांची कामे सुरू करण्यावर सरकारने भर दिला आहे.

‘मेट्रो १०’ (गायमुख- शिवाजी चौक) आणि ‘मेट्रो १२’ (कल्याण- तळोजा) मार्गिकांची कामे लवकरच सुरू होतील. तसेच ‘मेट्रो १०’ मार्गी लावण्याच्या दृष्टीने कामाला सुरुवात होणार आहे. महत्त्वाचे म्हणजे मुंबई महानगराचा कायापालट करणारा आणि औद्योगिक, आर्थिक विकास साधणारा विरार- अलिबाग बहुउद्देशीय महामार्गिकेच्या कामाला या वर्षांत सुरुवात करण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे. या प्रकल्पासाठी मोठय़ा प्रमाणावर भूसंपादन करावे लागणार आहे. भूसंपादन पूर्ण करून ४० हजार कोटी रुपयांचा हा प्रकल्प मार्गी लावण्यात येईल, असेही फडणवीस यांनी जाहीर केले. मुंबई आणि राज्यात रस्ते विकसित करण्यासह उड्डाणपूल बांधण्यासाठी १४ हजार २२५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. येत्या काळात वाहतूक व्यवस्था बळकट करण्यावर अर्थसंकल्पात भर देण्यात आला आहे. मात्र हे उद्दिष्ट जुन्या, चालू आणि घोषित प्रकल्पाच्या माध्यमातूनच पूर्ण केले जाणार आहे.

नागपूर-गोवा शक्तिपीठ महामार्गाच्या आराखडय़ाचे काम सुरू
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) मुंबई- नागपूर समृद्धी महामार्गानंतर यापेक्षा मोठा असा शक्तिपीठ महामार्ग हाती घेतला आहे. २०२२ मध्येच ७६० किमीच्या नागपूर- गोवा महामार्गाच्या सविस्तर आराखडय़ाचे काम सध्या सुरू आहे. हे काम पूर्ण करून अंदाजे ८३ हजार कोटींच्या या मार्गाचे काम शक्य तितक्या लवकर सुरू करण्याचे सरकारचे नियोजन आहे.

जलवाहतूकही बळकट करणार
सरकारने जलवाहतुकीचे जाळे विस्तारण्यासाठी अर्थसंकल्पात तरतूद केली आहे. ठाणे आणि वसई खाडी एकमेकांना जोडण्यासाठी ४२४ कोटी रुपयांची कामे हाती घेण्यात येणार आहेत. गेट वे ऑफ इंडियाजवळ प्रवासी जलवाहतुकीसाठी जेट्टी आणि इतर सुविधा उभारण्यासाठी १६२.२० कोटी रुपयांच्या योजनेला मान्यता देण्यात आली आहे. यामुळे आता दक्षिण मुंबईतून कल्याण, डोंबिवली, वसई खाडी अशी जलवाहतूक शक्य होणार आहे.

मराठीतील सर्व अर्थसंकल्प २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Samriddhi highway completed by dec budget 2023 amy
First published on: 10-03-2023 at 03:27 IST