फारुक नाईकवाडे

नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षेमध्ये भूगोल या घटक विषयाचा अभ्यासक्रम पुढीलप्रमाणे विहीत करण्यात आला आहे: ‘महाराष्ट्र, भारत व जगाचा भौतिक, सामाजिक व आर्थिक भूगोल’

भूगोल विषयाचे भौतिक, सामाजिक व आर्थिक असे ठळक तीन उपविभाग पूर्व परीक्षेच्या अभ्यासक्रमात आयोगाने निर्धारित केले आहेत. या अभ्यासक्रमामध्ये जगाचा, भारताचा आणि महाराष्ट्राचा प्राकृतिक, सामाजिक, आर्थिक भूगोल अशी या घटकाची व्याप्ती विहीत केलेली आहे. अर्थव्यवस्था आणि पर्यावरण या दोन विषयांच्या अभ्यासामध्ये भूगोलाचे बेसिक्स व पायाभूत संकल्पना माहीत असणे आवश्यक आहे. मागील लेखामध्ये या घटकावरील पूर्व परीक्षेतील प्रश्नांचे विश्लेषण व त्या आधारे तयारी करताना लक्षात घ्यायचे मुद्दे याबाबत चर्चा करण्यात आली आहे. या विश्लेषणाच्या आधारे प्रत्यक्ष तयारीचे नियोजन कसे असावे ते या लेखात पाहू.

महाराष्ट्राच्या विशेष संदर्भात भूगोलाचा दोन प्रकारे अभ्यास करावा लागणार आहे. एक भाग पूर्णपणे महाराष्ट्राच्या भूगोलाचा आहे आणि दुसरा भाग भारताच्या भूगोलातील एकक म्हणून महाराष्ट्राच्या अभ्यासाचा आहे. पहिल्या भागामध्ये महाराष्ट्राच्या आदिम जमाती, खनिज संपत्ती, भौगोलिक विभाग, आर्थिक भूगोल, लोकसंख्येचे पैलू, कृषी हवामान विभाग, नदीप्रणाली इत्यादीचा अभ्यास ठेवायचा आहे. दुसज्या भागामध्ये भौगोलिक, प्राकृतिक, आर्थिक, लोकसंख्या इत्यादी बाबींचा संपूर्ण भारतातील या वैशिष्ट्यांशी संबंधित एक घटक म्हणून आणि इतर घटकांशी तुलना करून विश्लेषणात्मक असा अभ्यास अपेक्षित आहे.

हेही वाचा >>> चौकट मोडताना : सहज स्वीकार नाहीच

भूगोलाच्या पायाभूत महत्त्वाच्या संकल्पना वैज्ञानिक आहेत. त्यांचा वैज्ञानिक पद्धतीने अभ्यास करायला हवा. सगळ्यात आधी महत्त्वाच्या संज्ञा व संकल्पना समजावून घ्यायला हव्यात. यानंतर निरनिराळ्या भौगोलिक प्रक्रिया समजून घेणे आवश्यक आहे.

भूगोलाच्या शाखा, पृथ्वीची उत्पत्ती, रचना, पृथ्वीचे कलणे, वातावरण, अक्षांश, रेखांश, हवामानाचे घटक, प्रमाण वेळ इत्यादी पायाभूत संकल्पना व्यवस्थित समजून घ्याव्यात. पृथ्वीचे वजन, वस्तुमान, ढगांचे प्रकार इत्यादी बाबी सोडता येतील.

जगातील हवामान विभाग व त्यांची थोडक्यात वैशिष्ट्ये समजून घ्यावीत. जगाच्या वेगवेगळ्या प्रदेशांमध्ये हवामान विभागांना असलेली वेगवेगळी नावे तसेच वादळे, विशिष्ट भूरूपे, वा-यांचे प्रकार यांचेसाठी असलेली वेगवेगळी नावे यांच्या टेबलमध्ये नोट्स काढता येतील.

भारतामध्ये असणारे हवामान विभाग व त्यांची वैशिष्ट्ये समजून घ्यावीत. महाराष्ट्राच्या मुख्य हवामान विभागांचा नकाशाच्या आधारे अभ्यास करणे अवश्यक आहे. प्रत्येक विभागाची भौगोलिक वैशिष्ट्ये, हवामानाचे वैशिष्ट्यपूर्ण घटक, त्यामुळे होणारी मृदा, पिके, इतर आर्थिक उत्पादनांमध्ये या वैशिष्ट्यांचे योगदान या बाबी समजून घ्याव्यात. महाराष्ट्राचे हवामान विभाग हे दक्षिणोत्तर पसरले आहेत. त्यांचा पश्चिम ते पूर्व अशा क्रमाने अभ्यास केल्यास मान्सून, पर्जन्याचे वितरण, तापमानातील फरक यांचा तुलनात्मक अभ्यासही शक्य होईल.

मान्सूनची निर्मिती, वितरण, भारताच्या / महाराष्ट्राच्या दृष्टीने महत्त्व, ?तूंची निर्मिती, मृदा निर्मिती, समुद्री प्रवाह, भूकंप, ज्वालामुखी इत्यादी महत्त्वाच्या भौगोलिक प्रक्रिया समजून घेणे आवश्यक आहे.

● कोणत्याही भौगोलिक घटना / प्रक्रियेच्या अभ्यासामध्ये पुढील मुद्दे समजून घ्यायला हवेत-

भौगोलिक व वातावरणीय पार्श्वभूमी; घटना घडू शकते/घडते ती भौगोलिक ठिकाणे.; प्रत्यक्ष घटना/प्रक्रियेचे स्वरूप; घटनेचे/प्रक्रियेचे परिणाम; पर्यावरणीय बदलांमुळे घटनेवर/प्रक्रियेवर होणारे परिणाम; असल्यास आर्थिक महत्त्व; भारतातील, महाराष्ट्रातील उदाहरणे; नुकत्याच घडलेल्या महत्त्वाच्या घटना / प्रक्रिया ( current events)

नैसर्गिक आपत्ती, चक्रीवादळांची नावे यांचा आढावा घेणे आवश्यक आहे.

हेही वाचा >>> UPSC-MPSC : भारतामध्ये जमीन सुधारणांची गरज का पडली? त्यासाठी सरकारकडून कोणते प्रयत्न करण्यात आले?

भूरूप निर्मितीचा वारा, नदी, हिमनदी व समुद्र या चार कारकांच्या शीर्षकाखाली मुद्द्यांच्या वा टेबलच्या स्वरूपात नोट्स काढता येतील. यामध्ये प्रत्येक कारकासाठी खनन/अपक्षरण आणि संचयन कार्यामुळे होणारी भूरूपे, त्यांचे आकार, वैशिष्ट्ये, असल्यास आर्थिक महत्त्व, प्रत्येक भूरुपासाठी उपलब्ध असल्यास जागतिक पातळीवरील प्रसिद्ध उदाहरण, भारतातील व असल्यास महाराष्ट्रातील उदाहरण असे मुद्दे लक्षात घ्यावेत. या मुद्द्यांच्या आधारे तुलनात्मक टेबल करता आल्यास लक्षात राहणे सोपे जाईल.

भौतिक/ प्राकृतिक भूगोलामध्ये नकाशावर आधारित किंवा बहुविधानी किंवा जोड्या लावणे अशा प्रकारचे संकल्पनात्मक प्रश्न विचारले जातात. यासाठी भूगोलाचा अभ्यास नकाशा समोर ठेवून करायला हवा. नदीप्रणाली, पर्वतप्रणाली, प्राकृतिक विभाग, मान्सूनचे वितरण, मृदेचे वितरण, वनांचे प्रकार इत्यादी बाबत संकल्पनात्मक आणि नकाशावर आधारीत असे प्रश्न विचारले जाऊ शकतात. जगातील भूरुपांपैकी केवळ प्रसिद्ध नद्या, पर्वत, सरोवरे, इत्यादींचाच अभ्यास पुरेसा ठरेल.

भारतातील हिमालयीन व द्विकल्पीय नदी प्रणालींचा तुलनात्मक अभ्यास आवश्यक आहे.

भारतातील पर्वतप्रणालीचा नकाशावरील अभ्यास करतानाच त्यांचे आर्थिक महत्त्व, पर्जन्यनिर्मिती व हवामान इत्यादी मधील महत्त्व या बाबींचाही अभ्यास आवश्यक आहे. या नदी व पर्वतप्रणालीची उत्तर ते दक्षिण क्रमाने सलगता समजून घ्यायला हवी.

भारतातील व महाराष्ट्रातील खडकांचे प्रकार आर्थिकदृष्ट्या महत्त्वाचे असल्याने या भागाचा परिपूर्ण अभ्यास करायला हवा. खडकांचा प्रकार, निर्मिती, रचना, भौतिक व रासायनिक वैशिष्ट्ये, निर्मितीसाठी आवश्यक भौगोलिक / भूशास्त्रीय घटक, कोठे आढळतो, भौगोलिक व आर्थिक महत्त्व या मुद्द्यांच्या अनुषंगाने अभ्यास करावा. जागतिक भूगोलाचा अभ्यास करताना प्रसिद्ध नद्या, पर्वत, भूरूपे, प्राकृतिक विभाग इत्यादीचा टेबल फॉरमॅटमध्ये factual अभ्यास पुरेसा आहे.