भारताच्या माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांचं मंगळवारी रात्री हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. मंगळवारी रात्री सुषमा स्वराज यांना छातीत दुखण्याचा त्रास व्हायला लागला होता. यानंतर त्यांना तात्काळ दिल्लीच्या एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं. एम्स रुग्णालयात डॉक्टरांनी सुषमा स्वराज यांच्यावर उपचार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याला स्वराज यांनी प्रतिसाद दिला नाही. अखेरीस त्यांची प्राणज्योत मालवली. सुषमा स्वराज यांची राजकीय कारकिर्द अतिशय मोठी आहे. तसेच त्यांच्या नावे अनेक विक्रम आहेत. त्यांची कारकिर्द कायमच देशवासीयांच्या आठवणीत राहिल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

१९७७ साली वयाच्या २५ व्या वर्षी सुषमा स्वराज या कॅबिनेट मंत्री बनल्या होत्या. सर्वात कमी वयाच्या त्या कॅबिनेट मंत्री ठरल्या होत्या. १९७७ ते १९७९ दरम्यान त्यांच्या खांद्यावर सामाजिक कल्याण, रोजगार यांसारख्या ८ महत्त्वाच्या खात्यांचा कार्यभार सोपवण्यात आला होता. यानंतर १९७९ मध्ये २७ व्या वर्षी त्या हरियाणाच्या भाजपाच्या अध्यक्षा बनल्या होत्या.

सुषमा स्वराज यांना एका राष्ट्रीय पक्षाच्या पहिल्या महिला प्रवक्त्या होण्याचाही मान मिळाला आहे. याव्यतिरिक्त राज्याच्या पहिल्या मुख्यमंत्री, केंद्रीय कॅबिनेट मंत्री आणि विरोधी पक्षाच्या पहिल्या महिला नेत्या होण्याचाही मान त्यांना मिळाला होता. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यानंतर परराष्ट्र मंत्रालयाची धुरा सांभाळणाऱ्या त्या दुसऱ्या महिला होत्या. गेल्या चार दशकांमध्ये त्यांना ११ निवडणुका लढवल्या होत्या. त्यातून तीन वेळा त्यांनी विधानसभेची निवडणूक लढवली होती. त्यात त्यांना विजय मिळाला होता. तसेच त्या सात वेळा खासदारही राहिल्या होत्या.

पंजाबमधील अंबाला येथे सुषमा स्वराज यांचा जन्म झाला होता. त्यांनी पंजाब विद्यापीठातून कायद्याचे शिक्षण घेतले होते. आपलं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी जयप्रकाश नारायण यांच्या आंदोलनात सहभाग घेतला होता. आणीबाणीनंतर त्या राजकारणात अधिक सक्रिय झाल्या होत्या. सुषमा स्वराज या पहिल्या आणि एकमेव महिला खासदार ठरल्या ज्यांना आऊटस्टॅंडिंग पार्लिमेन्टेरियन सन्मानाने गौरविण्यात आले होते.

नरेंद्र मोदी सरकारच्या पहिल्या ५ वर्षांच्या कार्यकाळात स्वराज यांनी परराष्ट्र मंत्रालयाचा पदभार सांभाळला. भारताचं परराष्ट्र धोरण मजबूत करण्यामध्ये स्वराज यांचा मोलाचा वाटा होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन, भारतीय राजकारणातलं एक तेजोमय पर्व हरपलं अशा शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp former external affairs minister sushma swaraj records on her name jud