पुणे लोकसभा मतदारसंघासाठी काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेसने स्वतंत्र जाहीरनामा तयार केला असून या जाहीरनाम्याचे मंगळवारी चौकीदार अर्थात सुरक्षा रक्षकाच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. मोहम्मद इस्माईल शेख यांच्या हस्ते जाहीरनाम्याचे प्रकाशन करण्यात आले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पुणे लोकसभा मतदारसंघातून आघाडीकडून मोहन जोशी हे निवडणूक लढवत आहे. मंगळवारी समता भूमी येथे महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यास अभिवादन केल्यानंतर समाजातील विविध घटकातील नागरिकांना एकत्रित करून आघाडीच्या जाहीरनाम्याचे प्रकाशन करण्यात आले. याप्रसंगी पुणे लोकसभा मतदारसंघाचे आघाडीचे उमेदवार मोहन जोशी, विधान परिषदेचे आमदार शरद रणपिसे, माजी आमदार दीप्ती चौधरी आदी मंडळी उपस्थित होती.

आघाडीचे उमेदवार मोहन जोशी म्हणाले की, देशाची सत्ता ‘युपीए’च्या हाती दिल्यास आम्ही पुणे शहरातील सार्वजनिक वाहतूक सक्षम करणार, सुरळीत पाणी पुरवठा यासह अनेक समस्येतून पुणेकर नागरिकांना मुक्त करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

जाहीरनामा प्रकाशनादरम्यान समाजातील प्रत्येक घटकाला बोलावण्यात आले होते. ‘चौकीदार’वरून मागील काही महिन्यापासून देशात राजकारण सुरु आहे. काँग्रेसने जाहीरनाम्याच्या प्रकाशनासाठी पुण्यात चौकीदार म्हणजे सुरक्षा रक्षकाचे काम करणाऱ्या मोहम्मद इस्माईल शेख यांना बोलावले होते. यावेळी शेख यांच्याशी संवाद साधला असता ते म्हणाले की, मी मागील सात वर्षापासुन सुरक्षा रक्षक म्हणून काम करीत आहे. पण आमच्या कामावरून सध्या सत्ताधारी पक्षाकडून राजकारण केले जात आहे. हे पाहून खूप वाईट वाटते. तर आज काँग्रेस पक्षाच्या जाहीरनामा प्रकाशनास एका सुरक्षा रक्षकास बोलावल्यामुळे समाधान मिळाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Congress manifesto for pune published by security guard