सोलापूरमध्ये प्रणिती शिंदेंच्या प्रचारार्थ उद्धव ठाकरेंनी सभा घेतली. महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांना निवडून द्या हे सांगत असताना उद्धव ठाकरेंनी भाजपावर, नरेंद्र मोदींवर आणि देवेंद्र फडणवीसांवर जोरदार टीका केली. तसंच नकली शिवसेना या मोदींनी केलेल्या टीकेचाही खास आपल्या शैलीत समाचार घेतला. या सभेत उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख टरबूज असा केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काय म्हणाले उद्धव ठाकरे?

“भाजपा म्हणजे काही ब्रह्मदेव नाही. भाजपा म्हणेल तेच हिंदुत्व, भाजपा म्हणेल तोच देशप्रेमी आणि भाजपाच्या विरोधात बोलणारा देशद्रोही असं नाही. मोदींना मी सांगू इच्छितो की नकली शिवसेना जे काही आम्हाला हिणवत आहात तसं म्हणायला ती तुमची डिग्री नाही. ४ जूनला तुम्हाला महाराष्ट्राच्या मतपेट्या उघडल्यानंतर कोण असली कोण नकली ते समजेल. आज सोलापूरचे प्रश्न आहेत, राज्याचे प्रश्न आहेत. त्याकडे लक्ष कुठे आहे? प्रणितीचाच आवाज लोकसभेत पाठवायचा आहे हे विसरु नका.”

“वापरा आणि फेकून द्या ही यांची नीती आहे. २०१४ मध्ये देशात पंतप्रधान झाले ऑक्टोबरमध्ये युती तोडून टाकली. त्यामागचं कारण काय होतं? २०१९ मध्येही पंतप्रधानपदी बसले तेव्हाही अमित शाह यांना वचन सांगितलं होतं. त्यांनी शब्द मोडला. वापरा आणि फेका ही भाजपाची नीती आहे.”

हे पण वाचा- उद्धव ठाकरेंची मोदी-फडणवीसांवर टीका, “मशालीच्या धगीने कमळ कोमेजणार, टरबुजाचं चिराट झालं”

मी टरबुजाला फडतूस, कलंक म्हणणार नाही

“तुम्ही कुणाबद्दल बोललात? टरबूज? म्हणजे कोण? मी ज्यांना मागे फडतूस म्हणालो होतो ते का? आता मी बोलत नाही. मी फडतूस म्हटलं होतं आता म्हणत नाही. मी त्यांना कलंक बोललो होतो पण आता बोलत नाही. कारण त्यांना फार वाईट वाटतं. त्यांनीच परवा रायगडमध्ये एक विनोद केला. बाकीची कामं सोडून द्या मोदींची, म्हणजेच मोदींनी कामं केली नाही हे त्यांनी मान्य केलं. पण ते म्हणाले निदान मोदींनी आपल्याला करोना काळात लस दिली म्हणून आपण जिवंत राहिलो. जे काही संशोधक आहेत ते काय गवत उपटत होते का? मोदींनी लस बनवली असेल तर ते काय करत होते? लस पुण्यात तयार झाली आहे. मोदींनी लस हवेत सोडली नाही. ” असं म्हणत उद्धव ठाकरेंनी घणाघाती टीका केली आहे.

टरबुजाचं काय करायचं?

टरबुजाचं काय करायचं? तुम्हाला चांगलंच माहीत आहे. टरबुजाचं काय करायचं तुम्हाला माहीत आहे. टरबूज उन्हाळ्यात कामी तरी येतं. हे म्हणजे दुष्काळात तेरावा महिना आहे. हे टरबूज नाहीच दिवाळीत चिरडता ते चिराट झालेत. आले तेव्हा टरबूज होते आता पाव उपमुख्यमंत्री झालेत म्हणजेच चिराट झाले आहेत. होता केवढा झाला केवढा? असं सगळं थापेबाजीचं राजकारण सुरु आहे. असं म्हणत उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीस आणि नरेंद्र मोदींना खडे बोल सुनावले.

मराठीतील सर्व निवडणूक २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Uddhav thackeray slams devendra fadnavis also called him fadtus again in solapur speech scj